esakal | सरकारी अधिकारी मिळेनात, टेबल-खुर्च्या धूळ खात

बोलून बातमी शोधा

Vacancies of Government officers in shrigonde

श्रीगोंद्यातील सरकारी कार्यालयात कामे वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी रोजच्या झाल्या आहेत. तलाठ्यांपासून तर पाटकऱ्यांपर्यंत कुणी जागी सापडत नसल्याने लोकांची कामे रखडल्याचे चित्र गेल्या काही वर्षांत वाढले आहे.

सरकारी अधिकारी मिळेनात, टेबल-खुर्च्या धूळ खात
sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे : महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात वानवा आहे. काही कार्यालयांत तर अनेक वर्षांपासून खुर्च्या आणि टेबल कर्मचारी नसल्याचे धूळ खात पडले आहेत. कार्यालयाप्रमाणे फिरतीवर काम करणारे कर्मचारीही नसल्याने मोठा गोंधळ सुरू आहे. कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला असून, त्यातून प्रशासनासह सामान्यांचीही परवड सुरू आहे. 

जाणून घ्या- स्वच्छता केली, वसुली राहिली 

श्रीगोंद्यातील सरकारी कार्यालयात कामे वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी रोजच्या झाल्या आहेत. तलाठ्यांपासून तर पाटकऱ्यांपर्यंत कुणी जागी सापडत नसल्याने लोकांची कामे रखडल्याचे चित्र गेल्या काही वर्षांत वाढले आहे. त्याचे खरे कारण सरकारी कर्मचारी पगारापुरतेही काम करीत नाहीत, असे मुळीच नसून, महत्त्वाच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांसह अनेक अधिकाऱ्यांची पदेच रिक्त असल्याने सावळा गोंधळ सुरू आहे. जलसंपदा, महसूल, सार्वजनिक बांधकाम, पंचायत समिती, कृषी, पोलिस ठाणे या विभागात लोकांची नेहमीचीच कामे असतात. याच कार्यालयात मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहेत. तेथे प्रत्यक्षात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कार्यालयीन कामाचा मोठा ताण वाढल्याचे चित्र आहे. 

"कुकडी' प्रकल्पात 668 पदे रिक्त

श्रीगोंदे शहरात असणाऱ्या जलसंपदा विभागाच्या कुकडी विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या कोळवडी, घोड धरण, मढेवडगाव, श्रीगोंदे, सीना, खैरी, नगर लघुपाटबंधारे, करमाळा कालवा यावरील उपअभियंत्यांच्या जागा रिक्त आहेत. कुकडी प्रकल्पातील अधिकृत 33 अभियंते आहेत. त्यापैकी केवळ आठ जण कामावर आहेत. यातील "घोड'च्या पाचही शाखा अभियंतांच्या जागा रिक्त आहेत. "कुकडी'त एकूण 871 मंजूर पदे आहेत. त्यातील 668 पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. 

हेही वाचा - राम शिंदे यांच्या याचिकेवर आमदार रोहित पवार म्हणतात... 

कृषी विभागात 17 पदे रिक्त

महसूल विभागात 11 तलाठी, 9 लिपिक, 5 शिपाई, 3 अव्वल कारकून, 2 मंडलाधिकारी व 2 नायब तहसीलदार यांची पदे रिक्त आहेत. तालुका कृषी विभागात एकूण मंजूर पदे 65 असली, तरी त्यातील 17 पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. महत्त्वाच्या असणाऱ्या लेखा शाखेत पाच पदे असली, तरी तेथे एकच जण कामावर आहे. पंचायत समितीत आठ पदे रिक्त आहेत. सार्वजनिक बांधकाम उपविभागात 6 पदे रिक्त असून, यात 2 शाखा अभियंते अनेक वर्षांपासून नाहीत. 

पोलिसांवरही ताण

तालुक्‍यात संघटित व वाळूचोरांची गुन्हेगारी मोठी आहे. श्रीगोंदे व बेलवंडी असे दोन पोलिस ठाणी असली, तरी गुन्ह्यांचा वाढणारा आकडा पोलिसांचे मानसिक बळ कमी करीत आहे. जे कर्मचारी व अधिकारी आहेत ते झोकून काम करीत असले, तरी हवालदार व नाईक ही पदे गुन्ह्यांच्या तुलनेत कमी आहेत. गंभीर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी लागणारे तपासी अधिकारी कमी असल्याने हजर कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.