ब्रिटिशकालीन तुरुंगात भरते प्राथमिक शाळा

आयाज मुल्ला
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

नऊ सप्टेंबरच्या आठवणी वडूजमध्ये आजही ताज्या
वडूज - देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी ‘त्या’ ठिकाणी तुरुंगवास भोगला. देशाला ब्रिटिशांच्या जोखडातून सोडविण्यासाठी नऊ सप्टेंबर १९४२ च्या रणसंग्रामात घडलेल्या अनेक घटनांचा हा तुरुंग आजही साक्षीदार आहे.

विशेषत: गेल्या ३० ते ४० वर्षांपासून या ठिकाणी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा भरते. या शाळेतून मिळालेल्या ज्ञानातून अनेक सक्षम पिढ्या घडल्या आहेत.

नऊ सप्टेंबरच्या आठवणी वडूजमध्ये आजही ताज्या
वडूज - देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी ‘त्या’ ठिकाणी तुरुंगवास भोगला. देशाला ब्रिटिशांच्या जोखडातून सोडविण्यासाठी नऊ सप्टेंबर १९४२ च्या रणसंग्रामात घडलेल्या अनेक घटनांचा हा तुरुंग आजही साक्षीदार आहे.

विशेषत: गेल्या ३० ते ४० वर्षांपासून या ठिकाणी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा भरते. या शाळेतून मिळालेल्या ज्ञानातून अनेक सक्षम पिढ्या घडल्या आहेत.

येथील ब्रिटिशकालीन तुरुंगात जिल्हा परिषदेची शाळा भरते. जुन्या कचेरीतील शाळा म्हणून ही इमारत ओळखली जाते. १८६५ च्या दरम्यान वडूजमध्ये इंग्रजांनी कातरखटाव रस्त्यानजीक असणाऱ्या एका मठात आश्रय घेतला. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी प्रशासकीय कामासाठी येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराजवळ इमारत बांधली. त्या ठिकाणी इंग्रजांची प्रशासकीय कामाची कार्यालये, कैद्यांना डांबण्यासाठी खोल्या अशा एकूण नऊ खोल्या होत्या. आतमध्ये जाण्यासाठी समोरील बाजूला फक्त एकच मोठा दरवाजा होता. कार्यालयाच्या खोल्या, तुरुंगाच्या खोल्या, अंधार कोठडीची दारे मजबूत होती.

सुमारे दोन फूट रुंदीच्या चुन्याच्या घडणीतील दगडी भिंतीचे बांधकाम, जाड गजांचे दरवाजे व त्यांना असणारे मजबूत कडी-कोयंडेच त्यांच्या मजबुतीची आजही साक्ष देतात. 

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी नऊ सप्टेंबर १९४२ रोजी ब्रिटिशकालीन इमारतीनजीकच असणाऱ्या या परिसरात रणसंग्राम घडला. वडूज येथे झालेल्या या रणसंग्रामात तालुक्‍याच्या विविध भागांतील नऊ जणांनी बलिदान दिले. या रणसंग्रामातील अनेकांना याच तुरुंगात डांबण्यात आले होते. १९४२ च्या लढ्यानंतर या इमारतीमध्ये महसुलाची काही कागदपत्रे ठेवण्यात येत होती. 

देशाला स्वातंत्र्य मिळून ब्रिटिशांची सत्ता पालटली असली तरी ही इमारत आजही त्या घटनांची साक्षीदार आहे. गेल्या ३० ते ४० वर्षांपासून या ठिकाणी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा भरते. सध्या या ठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा क्रमांक दोन व तीनचे वर्ग भरविण्यात येत आहेत. आतमध्ये सुसज्ज प्रांगण करण्यात आले आहे.

इमारतीच्या किरकोळ दुरुस्तीची गरज
काही खोल्यांची डागडुजी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय आहे. ऐतिहासिक घटनांची साक्षीदार असणाऱ्या या इमारतीचे पावित्र्य व महत्त्व कायम ठेवण्यासाठी संरक्षक भिंत आहे. सध्या या इमारतीच्या काही खोल्यांचे लाकडी खांब निसटले आहेत. पत्र्यांची दुरवस्था झाली आहे. त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. काही खोल्यांची दारे, खिडक्‍यांचीही दुरुस्ती आवश्‍यक आहे.

Web Title: vaduj news Primary school filling in British jail

टॅग्स