तहसीलदारपदासाठी संगीत खुर्ची!

वडूज : खटाव तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या कार्यकालावधीचा फलक.
वडूज : खटाव तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या कार्यकालावधीचा फलक.

खटावला दहा वर्षांत १९ अधिकाऱ्यांकडे कार्यभार; मोठ्या गफल्याने कारभार उघड

वडूज - खटाव तहसील कार्यालयाचा कारभार सातत्याने काहीना काही कारणाने चर्चेत राहिलेला आहे. तहसीलदारपदाबाबत ‘संगीत खुर्ची’ सारखा खेळ सुरू असल्यामुळे या कार्यालयामध्ये गेल्या दहा वर्षांत तब्बल १९ अधिकाऱ्यांनी तहसीलदारपदाचा पदभार सांभाळला. कधी सेवानिवृत्तीला आलेले अधिकारी तर कधी परिविक्षाधीन अधिकाऱ्यांकडे तहसीलदारपदाचा कारभार राहिला. कायमस्वरूपी तहसीलदार नसल्यामुळे कार्यालयाच्या कारभाराचा गाडा रडतखडतच ढकलला जात आहे. 

तालुक्‍यात दरवर्षी टंचाई आढावा बैठक व जिल्हा परिषदेची खरीप हंगाम बैठक याशिवाय प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा घेणाऱ्या व लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी होणाऱ्या बैठकाही अपवादानेच होताना दिसत आहेत. त्यामुळे तालुका प्रशासनावर लोकप्रतिनिधींचाही नेमका किती अंकुश आहे, याबाबत साशंतकताच व्यक्त होत आहे. याशिवाय तालुक्‍यात बेसुमार वाळू उपशाचा विषय गेल्या काही वर्षांत गाजत आहे. तहसीलदारपदाच्या खुर्चीबाबत ‘संगीत खुर्ची’ सारखा खेळ सुरू असल्याने वाळू उपशाला मोठे पाठबळ मिळाले आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये तालुक्‍यामध्ये तब्बल १९ अधिकाऱ्यांनी तहसीलदारपदाची जबाबदारी सांभाळलेली. त्यातील काही अधिकारी हे सेवानिवृत्तीला आलेले होते, त्यामुळे काहींची सेवानिवृत्तीच याठिकाणी झाली. तर काहींची इतर ठिकाणी बदली झाली. याशिवाय काही भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या अधिकाऱ्यांना परिविक्षाधीन अधिकारी म्हणून याठिकाणी जबाबदारीही देण्यात आली. तसेच कार्यालयात नायब तहसीलदारपदावर काम करणाऱ्या काही अधिकाऱ्यांनाही अतिरिक्त कार्यभार म्हणून या पदावर जबाबदारी देण्यात आली. २०१४ नंतर मात्र येथील तहसीलदारपदावर अक्षरश: चार -दोन महिन्यांचेच अधिकारी राहिले आहेत. काही अधिकारी चार-दोन महिन्यांच्या रजेनंतर पुन्हा येथे सेवेत आल्याचेही दिसते. त्यामुळे तालुक्‍यामध्ये अधिक काळ काम केलेले तहसीलदार अभावानेच दिसून येत आहेत. त्यामुळे तालुक्‍यातील जनतेचा प्रशासनावर विश्वास उडू लागला आहे. खरीप हंगाम निधी घोटाळ्याच्या प्रकरणामुळे तालुका महसूल प्रशासनाची लक्तरे वेशीवरच टांगली गेली आहेत. तालुक्‍यात काम करण्यासाठी कार्यक्षम व पूर्ण वेळ अधिकारी असणे गरजेचे आहे.

सबकुछ ऑल इज वेल....
तालुक्‍याला कायमस्वरूपी तहसीलदारच गेल्या काही वर्षांत न मिळाल्यामुळे सर्व प्रशासकीय विभागांचा कारभार ‘ऑल इज वेल’ असाच आहे. बेसुमार वाळूउपसा, अनेक दाखल्यांना होणारा कमालीचा विलंब, शासकीय कामांत सर्वसामान्य लोकांची होणारी हेळसांड आदी समस्यांकडे पुरेशा गांभीर्याने पाहिले गेले नाही. त्यामुळे राजकीय व प्रशासकीय पातळीवर ‘ऑल इज वेल’ असाच तालुक्‍याचा कारभार राहिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com