गवंड्याची मुलगी झाली पोलीस उपनिरीक्षक

धर्मवीर पाटील
गुरुवार, 14 मार्च 2019

इस्लामपूर - अत्यंत गरीब परिस्थितीला सामोरे जात दुधगाव (ता. मिरज) येथील युवती वहिदा जमादार हिने पोलीस उपनिरीक्षकपद मिळवून यशाला गवसणी घातली. एका गवंडीकाम करणाऱ्या बापाच्या मुलीचे त्यानिमित्ताने परिसरात कौतुक होत आहे.

इस्लामपूर - अत्यंत गरीब परिस्थितीला सामोरे जात दुधगाव (ता. मिरज) येथील युवती वहिदा जमादार हिने पोलीस उपनिरीक्षकपद मिळवून यशाला गवसणी घातली. एका गवंडीकाम करणाऱ्या बापाच्या मुलीचे त्यानिमित्ताने परिसरात कौतुक होत आहे.
             
वहिदा ही दूधगाव या खेडेगावातील मुलगी. घरची अत्यंत बेताची परिस्थिती असताना अतिशय खडतर परिश्रम घेवून तिने यश मिळवले. वहिदाच्या वडिलांनी आयुष्यभर गवंडीकाम केले. ३ मुली, मुलगा, बायको असे ६ जणांचे कुटुंब असताना व हलाखीची परिस्थिती असतानाही वहिदाच्या वडिलांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून आपल्या सर्व मुलांना चांगले शिक्षण दिले.

वहिदा विवाहित आहे. तिला मुलगी आहे. तिला सांभाळत तिने अभ्यासात सातत्य ठेवले. एमपीएससीची परीक्षा देणे सुरू ठेवले. सुरवातीला अपयश येऊनही तिने न डगमगता अस्लम शिकलगार यांच्या मदतीने चिवटपणे प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत यश मिळवले.

वयोमानाच्या अटीनुसार परीक्षा देण्याची ही तिची शेवटची संधी होती. कोणत्याही परिस्थितीत यावेळी यश मिळवायचेच असा पक्का निर्धार तिने केला होता. आपण कुठे कमी पडतोय याचे स्वतः आत्मपरीक्षण करून तिने तयारी केली. तिचा लहान भाऊ सैन्यात भरती झाल्यावर घरची परिस्थिती थोडी सुधारली. त्यानेच वहिदाला स्पर्धा परीक्षेला बसण्याची प्रेरणा दिली.

भाऊ सध्या छत्तीसगढ येथे कार्यरत आहे. मायनॉरिटी फोरमचे अध्यक्ष झाकीर शिकलगार, वालचंद कॉलेजचे ग्रंथपाल श्री. इनामदार, मौलाअली ट्रस्टचे अध्यक्ष मुनाफ अत्तार, मुस्लिम अधिकार आंदोलनचे अध्यक्ष मुनीर मुल्ला, फईम मुजावर, महाराष्ट्र अकॅडमीचे संचालक असलम शिकलगार यांनी तिचा सत्कार केला. 

"मुस्लिम मुलींनी शिकले पाहिजे. उत्तम करियर घडविण्यासाठी स्पर्धा परीक्षांचा मार्ग मुलींनी धरला पाहिजे. ही प्रेरणा तिच्याकडून घ्यावी.

- अस्लम शिकलगार
संचालक, महाराष्ट्र अकॅडमी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vahida Jamadar success in MPSC PSI exam