वैभव हाउसिंग सोसायटीजवळ स्पीड ब्रेकर कोणासाठी? 

वैभव हाउसिंग सोसायटीजवळ स्पीड ब्रेकर कोणासाठी? 

कोल्हापूर - शहरातील स्पीड ब्रेकर, मॅनहोलच अपघाताला निमंत्रण देत आहेत. एखादी मोहीम उघडावी त्या पद्धतीने शहरात स्पीड ब्रेकर करण्याचे काम सुरू आहे. त्यातच रस्त्याच्या मध्येच असलेले मॅनहोलसुद्धा वाहनधारकांना अडथळे ठरत आहे. वैभव हाउसिंग सोसायटीजवळ झालेले स्पीड ब्रेकर म्हणजे जीव घेण्यासाठीच तयार केलेला प्रकार आहे. तेथील रस्ता दुभाजक फोडला कोणी, स्पीड ब्रेकर केला कोणी आणि त्याला अशा पद्धतीने चुकीची परवानगी दिली कोणी, हे तपासण्याची आणि कारवाई करण्याची गरज आहे. 

शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी काही ठिकाणी स्पीड ब्रेकरची आवश्‍यकता असल्याचा मुद्दा पोलिस मुख्यालयातील एका बैठकीत चर्चेत आला. त्यानुसार महापालिकेने गल्लीबोळासह रिंगरोडवरसुद्धा स्पीड ब्रेकर तयार केले आहेत. काही ठिकाणी त्यांची खरोखरच गरज होती. पण ते किती आकाराचे असावेत, त्यांची उंची किती असावी याचेही काही गणित आहे. मात्र, त्याचा विचार न करता ठिकठिकाणी तयार केलेले स्पीड ब्रेकरच सध्या अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. काही ठिकाणी ते सलग दोन-तीन आहेत. काही ठिकाणी एकच आहे; पण त्याची उंची मोटारींना धोकादायक ठरत आहे. 

वैभव हाउसिंग सोसायटीजवळ केलेला प्रकार म्हणजे जीवघेणाच असल्याचे प्रत्येक वाहनधारकाला जाणवत आहे. या ठिकाणी विद्युत दिव्यांची सोय नसल्याचे रात्रीच्या वेळी स्पीड ब्रेकर दिसत नाही. रस्ता दुभाजक मध्येच तोडल्याने तो चुकीचा झाला आहे. काही दिवसांपूर्वी या स्पीड ब्रेकरमुळेच मोटार पेटण्याचा प्रकार घडला. कधी तरी कोणाचा तरी जीव गेल्यावर मगच हा धोकादायक स्पीड ब्रेकर आणि तो फोडलेला दुभाजक मिटवणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

सायबर ते रंकाळा हा रिंगरोड, टेंबलाई रेल्वे उड्डाणपुलाशेजारी, शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य रस्त्यावरून शाहू नाक्‍याकडे जाणाऱ्या रस्त्यावर, म.ल.ग. हायस्कूलशेजारी, जी.के.जी कॉलेज ते हॉकी स्टेडियम रोड अशा काही ठिकाणी असलेले स्पीड ब्रेकर अपघातास निमंत्रण देत आहेत. एसएससी बोर्ड ते आयसोलेशन हॉस्पिटल रस्त्यावरील मनीषानगरजवळील तीनही स्पीड ब्रेकरवर रोज अपघात ठरलेले आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरही आठवड्यापूर्वी मोठा अपघात झाला. वाहनांचे किरकोळ नुकसान किंवा वाहनधारकाला किरकोळ दुखापत होते म्हणून याबाबतच्या तक्रारी पोलिस ठाण्यापर्यंत पोचत नाहीत. स्पीड ब्रेकरला थांबताना काही वेळा मागे-पुढे असलेल्या दोन वाहनधारकांत अपघात होतात. तेथेही त्यांच्यात वाद होतो. नुकसानभरपाई देण्याच्या मुद्द्यावर वाद मिटविला जातो. 

शहरातील ड्रेनेजची व्यवस्था असलेल्या वाहिन्यांवर मॅनहोल आहेत. रस्त्याच्या बरोबरीने ते असणे अपेक्षित आहे. तरीही ते कधी डाव्या बाजूने, कधी उजव्या बाजूने रस्त्यावर आल्याचे दिसून येत आहेत. जरगनगरच्या रस्त्यावरील मॅनहोल तर वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरले आहेत. अशीच काहीशी अवस्था शिवाजी उद्यमनगर, स्टेशन रोड परिसर, गोखले कॉलेज रोड, महाद्वारजवळ, रंकाळा परिसरात दिसून येत आहे. येथेही तातडीने मॅनहोलची दुरुस्ती करणे आवश्‍यक आहे. 

फलक हवेतच 
आवश्‍यक ठिकाणी स्पीड ब्रेकर पाहिजेतच; पण ते किती उंचीचे असावेत, किती लांबीचे असावेत, याचाही विचार आवश्‍यक आहे. जेथे स्पीड ब्रेकर आहे तेथे पांढरे पट्टे आवश्‍यक आहेत. जवळच "पुढे स्पीड ब्रेकर आहे' असा फलकही आवश्‍यक आहे. मात्र, असा कोणताही इशारा नसतानाही शहरात अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर तयार केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com