VALENTINESDAY प्रेमासाठी ती झाली शहनाजची शर्मिला, एका लव्ह मॅरेजची गोष्ट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

कोणत्याही दोन व्यक्तीत पटण्यासाठी आवश्यक असत ते म्हणजे त्यांच्यात मैत्री, त्यांचा एकमेकावर विश्वास, एकमेकांना समजून घेण्याची कुवत. एकमेकांचे विचार तंतोतंत नाही जुळले तरी चालेल, पण काहीअंशी तरी एकच असावेत. या सगळ्या गोष्टी आम्हा दोघात आहेत.

व्हॅलेंनटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस. आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाब दिला की झालं प्रेम. आपल्या भावना व्यक्त करण्याचा हा दिवस असे वाटत असले तरी वीस वर्षांपूर्वी ते इतकं सहजी नव्हतं. या वर्षी एकीला गुलाब दिला आणि दुसर्‍या वर्षी दुसरीला दिला जाणार नाही, याची खात्री देणं अवघड आहे. अड‍निड्या वयात झालेलं प्रेम कडेला जाईल, याची शाश्वती नाही. प्रेम हा शब्द उच्चारला लोकं कावरीबावरी होऊन पाहयची त्यात काळात त्या दोघांनी लग्न केलं. तेही आंतरधर्मीय. हे म्हणजे आपल्या शब्दगंधचे सुनील गोसावी आणि शर्मिला गोसावी. त्यांची लव्ह स्टोरी इंटरेस्टींग आहे. त्यांचं कसं जमलं आणि आणि आता कसं जमवून घेतात. आपल्या प्रेमाबद्दल सांगताहेत शहनाज म्हणजे शर्मिलाजी...

शेवगावच्या कॉलेजात झाली सुरूवात...
मी आणि सुनील दोघ एकाच म्हणजे शेवगावच्या न्यू आर्ट्स,कॉमर्स कॉलेजमध्ये शिकत होतो. ते कॉलेजचे सांस्कृतिक सचिव म्हणून निवडून आले. मग कॉलेजमध्ये नियमित वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम त्यांनी घेतले. त्या सर्व कार्यक्रमात आम्हा मैत्रिणींचा सहभाग असायचा. तेथेच आमची ओळख झाली. ग्रुपही तयार झाला. मग कार्यक्रमामुळे आमच्यात घनिष्ठ मैत्री झाली. त्यावेळी प्राचार्य शिवाजीराव देवढे तेथे प्राचार्य म्हणून कार्यरत होते. ते कथा, कविता लिहिणा-यांना सातत्याने प्रोत्साहन देत. संवेदनशील मनाचा सुनील कविता लिहित असे. त्यामुळे इतरांपेक्षा सुनीलशी मैत्री अधिक झाली. त्यावेळी मी कॉलेज सोबतच शेवगावच्या महात्मा सार्वजनिक वाचनालयात पार्टटाईम काम करत असे. सुनील नियमित वाचनालयात येत असे. वाचलेल्या पुस्तकावर चर्चा होई. एकदा आमच्या(एस.वाय.बी.ए .इंग्लिश) वर्गातील सर्वच विध्यार्थाना समान गुण पडले. त्यामुळे सर्वांनी विद्यापीठाकडे तक्रार केली. विद्यापीठावर मोर्चा काढायचे ठरले. त्यावेळी तो ऑल इंडिया स्टुडटन्स फेडरेशन या विद्यार्थी संघटनेचा तालुका सचिव होता. कॉ. सुभाष लांडे यांनी सुनीलला सदर मोर्चाचे नेतृत्व करण्याचे सांगितले. त्यानुसार आम्ही सर्व जण विद्यापीठात उपकुलगुरू डॉ.हापसे यांना भेटलो. विविध वृत्तपत्रातून त्याविषयी बातम्या आल्या. सुनीलविषयीचा आदर असा वाढतच होता. 

त्यांनी असं केलं प्रपोज...
त्यानंतर मी शेवगावच्या आदर्श कन्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी स्वीकारली तर सुनील एम.एस.डब्लू. करायला अहमदनगर येथे सी.एस.आर.डी. मध्ये आला. त्यावेळी विविध ठिकाणी होणा-या साहित्यिक कार्यक्रमात आम्ही सहभागी होत असू. सहवासाने प्रेम वाढते असे म्हणतात, ते खरं आहे. मैत्रीच रुपांतर प्रेमात व्हायला मग तिथं कितीसा वेळ लागणार. असच एकदा आम्ही मैत्रिणी गप्पा मारत होतो, तेव्हा अचानक मला सुनीलने मैत्रिणीकरवी लग्नासाठी विचारले. साहजिकच मी गोंधळले, विचारात पडले. मला काय उत्तर द्यावे तेच सुचेना. मी मग उत्तर न देताच निघून गेले. त्यानंतरही आम्ही साहित्यिक, सामाजिक कार्यांच्या निमित्ताने भेटत असू.

शुभ मंगल....
एकदा घोडेगाव इथे काव्य संमेलन होत. ते संपल्यावर नगर मार्गे शेवगावला जायचे ठरले. त्यावेळी माझी एक विध्यार्थिनी सोबत होती. प्रवासात अनेक विषयावर चर्चा झाली, शिक्षण पूर्ण होऊन त्यान सामाजिक संस्था काढून त्याद्वारे सामाजिक काम चालू केल होत. सोबतच स्वत:ला उत्पन्नच स्त्रोत म्हणून त्याच विषयातील नोकरी सुरु ठेवली होती. माझी शाळेत आवश्यकतेनुसार बी.पी. एड. करून नोकरी पर्मनंट झाली होती. माझ्या आणि त्याच्याही घरी लग्नासबंधात चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यामुळ चर्चेत लग्नाचा विषय आलाच. अचानक तो म्हणाला ‘मी लग्नाबद्दल विचारल तु काहीच उत्तर दिल नाहीस? मी काय समजू?’ मी पुन्हा विचारात पडले, तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा तोच प्रश्न. दोन वर्षानंतर मी सुनीलला हो म्हणाले, माझा त्यांच्यावर असलेल्या विश्वासामुळेच मी त्यांना नाही म्हणूच शकले नाही. त्या ‘हो’ नंतर २५ नोव्हेंबर १९९७ ला तर मी ख-या अर्थान शहनाजची शर्मिला झाले.

दोनदा लग्न...
मग तिथूनच माझ्या आयुष्यातलं एक पर्व संपून दुसर पर्व सुरु झालं. आमच लग्न दोन पद्धतीने झाले. रजिस्टर व सत्यशोधक. त्यावेळी सुनील हिवरे बाजारच्या यशवंत ग्रामीण व पाणलोट विकास संस्थेत जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत होता. त्यामुळे सहाजिकच आदरणीय पोपटराव पवार नोंदणी करतांना हजर होते. तर प्रा.डॉ.विजयकुमार पोटे, प्रा.विलास साठे, नंदकुमार बेरड, सुनीलचे एम.एस  डब्लूचे वर्गमित्र रमेश वाघमारे, सुनील गायकवाड, भीमराज मंडलिक, संपदा बर्डे हे नियोजनात मग्न होते. ऐनवेळी अशोक कानडे, भगवान राऊत, विलास सोनवणे, तत्कालीन नगरसेवक अजय साळवे, जयंत येलूलकर, भास्करराव कोल्हे, प्रभाकर डाके यांनी सत्यशोधक पद्धतीने लग्न यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. मानसिक पाठबळ कॉ.गोविंदभाई पानसरे, कॉ.सुभाष लांडे, पवनकुमार साळवे, मन्सूरभाई शेख यांनी दिले.  

प्रेमामुळे पर्मनंट नोकरीवर पाणी
लग्नाला आता २० वर्ष झालीत,आम्ही लग्नाचे वाढदिवस मित्र-मैत्रिणी, नातेवाईका सोबत घरीच साजरे करतो. गरजेनुसार नोकरी बदलत गेली. सर्वांनी सहकार्य केले. पर्मनंट नोकरी केवळ आंतरजातीय विवाह केल्याने संस्था चालकांनी सोडायला भाग पडली. महर्षी प्रतिष्टानच्या माध्यमातून सामाजिक कार्यात कार्यरत असलेल्या अशोक कानडे, सुनील गोसावी व कैलास दिघे यांनी माझी नोकरी गेल्यावर मला पाठबळ तर दिलेच शिवाय आता आपणच शाळा काढू,असे मनोमन ठरवले. त्यानुसार श्री साई इंग्लिश मीडियम स्कुल माजी नगरसेवक अशोक कानडे यांच्या नेतृत्वाखाली आजही उत्तम प्रकारे कार्यरत आहे.

विश्वास असला की जमतं सगळं

जेवणात मीठ आवश्यक.मिठाबरोबर लोणच,पापड,चटणी असे इतर पदार्थही आवश्यकच.अगदी तसचंसंसारात प्रेमाबरोबरच विश्वास तर अपरिहार्यच.पण छोटी छोटी भांडणही लोणची पापडाची भूमिका बजावतात.तसे तर सुनील अतिशय शांत व संयमी स्वभावाचे आणि मी स्पष्टवक्ती. मग अशा दोन वेग वेगळ्या स्वभावाची आम्ही दोन माणस एकाच छताखाली. कारण दोन भिन्न स्वभावानां एकत्र जखडून ठेवण्याच काम करतो तो आपसात असलेला विश्वास. जो माझा सुनीलवर आणि सुनीलचा माझ्यावर पराकोटीचा आहे. विश्वास सुद्रुड असेल तर मग आणखी काय हवंय! सुनीलचा स्वभाव मुळातच शांत असल्याने अनेकदा भांडणाचा प्रसंग ओढवला तरी ते गप्पच असतात माझी बडबड चालूच असते. 

SUNIL GOSAVI

 

शब्दगंध प्रेमाचा...
वेगवेगळ्या कारणामुळे सुनीलने सक्रीय समाजसेवा सोडली आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानमध्ये तात्पुरत्या स्वरुपाची सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून नोकरी स्वीकारली. पण मन स्वस्त बसू देत नसल्याने साहित्यिक कार्य करावयाचे ठरवून शब्दगंध चळवळ पुढे सुरु ठेवली. शब्दगंध साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य या संस्थेत आम्ही काम करतो. ग्रामीण भागातील नवोदितांना व्यासपीठ मिळवून देण्यात शब्दगंध यशस्वी झाले आहे. नवोदितांची पुस्तके प्रकाशित करण्यासाठी ‘शब्दगंध प्रकाशन’सुरु केले असून २५० पुस्तके आज वर प्रकाशित केली आहेत. प्रकाशक म्हणून त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. आज मला लेखिका, कवयित्री म्हणून जेवढ यश मिळालं, त्यांचे श्रेय मी त्यांनाच देते. माझ्या प्रत्येक साहित्य कृतीचे पहिले वाचक, समीक्षक व प्रेक्षक तेच असतात. मी लिहिलेल्या कृतीतले दोषही ते दाखवतात. चांगल्या कृतीच कौतुकही करतात. सुनील स्वत:ही एक उत्कृष्ट कवी-लेखक आहेत. दोघांचीही विचारसरणी एकच आहे. कुठलही बंधन आम्ही एकमेकावर लादत नाहीत. कुठलीही चाकोरी त्यांनी मला आखून दिलेली नाही की ज्यावर मी काटेकोरच चालायला हवे. त्यामुळेच तर आमचे पटते.        

दिशा देते दिशा...         
प्रगतीशील लेखक संघटना, महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारणीत सदस्य म्हणून सुनीलची आता निवड झाली आहे. आम्हाला एक मुलगी ‘दिशा’. ती दोघांचीही लाडकी. तिच्यामुळे दोन्ही परिवारातील अंतर एकदम कमी झाले. सामाजिक एकतेचा संदेश आम्ही तिघ मिळून देत आहोत. ती आता बारावी सायन्स झाली आहे. शेवगावच्या शास्त्रीनगरमधील घरी गेल्यावर कसं वागायचं आणि ‘बरात मंजिल’ जवळ गेल्यावर कसं वागायचं हे आपसूकच तिला कळत. मराठीतून हिंदीत कधी जाते, आम्हालाही कळत नाही. आता तर तिचं आम्हाला नव्यानव्या सूचना करत असते.

यशस्वी दांपत्य
कोणत्याही दोन व्यक्तीत पटण्यासाठी आवश्यक असत ते म्हणजे त्यांच्यात मैत्री, त्यांचा एकमेकावर विश्वास, एकमेकांना समजून घेण्याची कुवत. एकमेकांचे विचार तंतोतंत नाही जुळले तरी चालेल, पण काहीअंशी तरी एकच असावेत. या सगळ्या गोष्टी आम्हा दोघात आहेत. म्हणूनच तर एक यशस्वी दांपत्य म्हणून आम्ही समाज, मित्र परिवारामध्ये परिचित आहोत. हीच तर प्रेरणा देणारी गोष्ट आहे ! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: VALENTINESDAY Love story of Shahnaz and Sunil