Loksabha 2019 : ‘वंचित’चे राजकारण तिसरा प्रवाह ठरेल?

जयसिंग कुंभार
गुरुवार, 18 एप्रिल 2019

सांगली लोकसभा मतदारसंघाच्या आजवरच्या लढतींचे चित्र नेहमीच दुरंगीच राहिले आहे. यावेळी ते पहिल्यांदा तिरंगी होताना दिसत आहे. याचे श्रेय वंचित विकास आघाडीला जाते. चार-पाच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात प्रस्थापितविरोधी होत असलेल्या राजकीय मांडणीचेही आहे. या निवडणुकीत वंचित आघाडी भाजप व काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी या दोघांविरोधात  मैदानात तिसरा पर्याय म्हणून उभी आहे. या तिघांत चुरशीचा सामना आहे, पण यांपैकी ती कोणाला किती उपद्रव करेल यावरच या पक्षाची भविष्यातील राजकीय वाटचालीची गती ठरणार आहे? 

सांगली लोकसभा मतदारसंघाच्या आजवरच्या लढतींचे चित्र नेहमीच दुरंगीच राहिले आहे. यावेळी ते पहिल्यांदा तिरंगी होताना दिसत आहे. याचे श्रेय वंचित विकास आघाडीला जाते. चार-पाच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात प्रस्थापितविरोधी होत असलेल्या राजकीय मांडणीचेही आहे. या निवडणुकीत वंचित आघाडी भाजप व काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी या दोघांविरोधात  मैदानात तिसरा पर्याय म्हणून उभी आहे. या तिघांत चुरशीचा सामना आहे, पण यांपैकी ती कोणाला किती उपद्रव करेल यावरच या पक्षाची भविष्यातील राजकीय वाटचालीची गती ठरणार आहे? 

१९७८ च्या इंदिराविरोधी लाटेतही सांगलीत काँग्रेसचा गड शाबूत राहिला. मात्र २०१४ च्या मोदी लाटेत हा गड भुईसपाट झाला. त्यानंतर नेतृत्वहीन झालेल्या  जिल्ह्यातील काँग्रेसपुढे अस्तित्वाचेच आव्हान उभे  राहिले. भाजपने जिल्ह्यात मिळवलेले यश काँग्रेसच्या एकूण पडझडीतून हललेल्या जनाधाराचे आहे.  

जिल्ह्यातील भाजपचे अनेक नेते काँग्रेस-राष्ट्रवादीतून आयात केलेले आहेत. त्यामुळे आजची जिल्ह्यातील लढत काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस युक्‍त भाजप अशीच आहे. ही मांडणी पश्‍चिम महाराष्ट्रात या निवडणुकीतही घट्ट होताना दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांचा वंचित विकास आघाडी स्वतःची राजकीय स्पेस तयार करण्याच्या प्रयत्नात आहे, ते किती यशस्वी होतील हे या निवडणुकीच्या निकालानंतरच  समोर येईल.

उत्तर भारतात जातीआधारित राजकारणाला किमान पंचवीस वर्षे आधी यश आले आहे. तसे महाराष्ट्रात झाले नाही. याला कारणही महाराष्ट्रातील जातीय सलोखा हेच आहे. त्यामुळे पटेल-ठाकूर-क्षत्रिय या वरिष्ठ जातीविरोधात तिकडे यशस्वी झालेले वंचित जातिसमूहाचे संघटन महाराष्ट्रात येथील कोणत्याही  विशिष्ट समाजाविरोधात होऊ शकले नाही.

स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर मराठा नेतृत्वाचा अठरापगड जातिसमूहावर असलेला प्रभाव केवळ संख्येच्या आधारावर नव्हता तर तो वर्तन-व्यवहार-संस्थात्मक बांधणीतून तयार झालेला होता. हा महाराष्ट्र शाहू-फुले-आंबेडकरांचा आहे असं म्हणताना त्यातले सोशल इंजिनिअरिंग महाराष्ट्रात घट्ट होते.

या  समीकरणाला छेद द्यायचे काम महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे, रामभाऊ म्हाळगी, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांनी १९९० च्या दशकात सुरू केले. त्याला आलेले मधुर फळ म्हणजे १९९४ मध्ये आलेली युतीची सत्ता. मात्र हा ट्रेंड पुढे कायम राहू शकला असता मात्र १९९९ मध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या स्थापनेमुळे जातीआधारित राजकीय मांडणीला महाराष्ट्रात शह बसला.

युतीची मराठेतर राजकारणाची मांडणीच जवळपास पंचवीस वर्षांनंतर प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा महाराष्ट्रात करू पहात आहेत. त्याचा आधार आहे  मराठेतर जनसमूहांचे राजकारण. या राजकीय मांडणीला स्पेस मिळाली ती मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखा-लाखांचे मोर्चांमुळे. त्यानंतर निघालेल्या बहुजन क्रांती मोर्चांमुळे महाराष्ट्र ढवळून निघाला. गावगाड्यातीलच नव्हे तर शहरांच्या आश्रयात आलेल्या अठरापगड जातिसमूह या मांडणीत- मोर्चात सहभागी झाले.

विविध जाती संघटनांना नेतृत्वाची संधी मिळाली. हाच आधार घेत प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात तिसऱ्या सत्ताकेंद्राचा पर्याय उभा करण्याचे उद्दिष्ट ठेवूनच वंचित विकास आघाडीचे व्यासपीठ जिल्ह्यात उभे केले. या आघाडीत अद्यापही प्रस्थापित काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजप-शिवसेनेतील मात्तबर राजकारणी दूरच आहेत. जर वंचित आघाडीने या लोकसभा निवडणुकीत निर्णायक मते घेतली तर मात्र आगामी विधानसभा निवडणुकीवेळी या प्रस्थापित  पक्षातील नेते मंडळी नक्की या आघाडीकडे आकृष्ट होतील.

गोपीचंद पडळकर सध्या आपल्या प्रचारसभांमध्ये राज्यातील शंभर आमदार आगामी निवडणुकीत वंचित आघाडीचे उमेदवार असतील असे जाहीरपणे सांगतात. त्यामागे हेच राजकीय गणित आहे. प्रकाश आंबेडकर यांनी भारीप बहुजन महासंघाच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यापुरता हा राजकीय प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे.

या प्रयोगाची पुनरावृत्ती करण्यासाठी अनुकूल असे वातावरण सध्या राज्यात तयार झाले आहे. याला कारण आहे ते सहकारी संस्थात्मक पाया असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीची पिछेहाट आणि दोन्ही काँग्रेसमधील प्रस्थापितांनीच व्यापत चाललेली भाजप-शिवसेना. विविध जातिसमूहांमध्ये झालेली शैक्षणिक जागृती, स्वतंत्रपणे राजकारण करण्याइतपत सुधारलेली आर्थिक पत असे घटक देखील वंचित विकास आघाडीच्या राजकारणाला वाव देणारे ठरत आहेत. या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर काँग्रेस-राष्ट्रवादीला किती उपद्रव करू शकतात यावर त्यांची राजकारणातील आगामी स्पेस ठरणार आहे.

पक्षीय नेटवर्कचा अभाव
शाहू-फुले-आंबेडकर चळवळीचा नारा देत काशीराम-मायावतींनी उत्तर प्रदेशात वंचित समूह स्वतंत्रपणे राजकारण सिद्ध करू शकतात हे सिद्ध करून दाखवले. असं सोशल इंजिनिअरिंग महाराष्ट्रात करण्याची इच्छा प्रकाश आंबेडकर यांची आहे. त्यासाठी त्यांनी आपला भारिप-बहुजन महासंघ वंचित आघाडीत कायमस्वरूपी विलीन केला आहे. वंचित आघाडीच्या उमेदवारांची घोषणा जातनिहाय करण्यामागे त्यांचे तेच धोरण आहे. अशा मांडणीला यश मिळेल असा सुपीक राजकीय अवकाश तयार झाला आहे; मात्र त्याचे राजकीय यशात रूपांतर करण्यासाठी गावागावात त्यासाठी मजबूत केडरबेस नेटवर्क वंचित आघाडीला निर्माण करावे लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vanchit Bahujan Agahdi Will the third stream in politics