वंचित आघाडीतर्फे रविवारी कवठेमहांकाळ येथे शक्तिप्रदर्शन

वंचित आघाडीतर्फे रविवारी  कवठेमहांकाळ येथे शक्तिप्रदर्शन

सांगली - वंचित बहुजन आघाडीने राज्यातील सर्व ४८ जागा लढवून लोकसभा निवडणुकीत ताकद दाखवून दिली. सांगलीतील उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी तीन लाखांहून अधिक मते घेऊन लक्ष वेधले. लोकसभेनंतर आता विधानसभेला देखील प्रस्थापित पक्षांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी आघाडी सज्ज झाली आहे. त्याची सुरवात कार्यकर्त्यांचा आभार मेळावा आणि गोपीचंद पडळकर यांच्या सत्कारातून रविवारी (ता. ९) कवठेमहांकाळ येथे होत आहे.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी ही राज्यातील प्रबळ राजकीय पक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीत उदयास आली. आघाडीला लोकसभा निवडणुकीत यश मिळाले नसले तरी त्यांनी विविध मतदारसंघांत ताकद दाखवून दिली आहे. आघाडीच्या उमेदवारांचा फटका प्रस्थापितांना बसला आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. त्याची तयारी देखील सुरू झाली आहे. वंचित आघाडी देखील त्यात मागे राहिली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी तसेच भाजप-शिवसेना यांनी आघाडी करून लोकसभा निवडणूक लढवली; तर राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघ लढवणारी आघाडी एकमेव पक्ष ठरली आहे. 

वंचित आघाडीचे सांगलीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी तीन लाखांहून अधिक मते घेऊन संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. मतदारांनी त्यांच्यावर विश्‍वास दाखवला. त्यासाठी कार्यकर्ते राबले. लोकसभेनंतर विधानसभेला देखील ताकद दाखवण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. त्याची सुरवात कवठेमहांकाळ येथील आभार मेळाव्यापासून सुरू होत आहे.

सगरे मंगल कार्यालयात सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या मेळाव्यात कार्यकर्त्यांचे आभार मानून त्यांना ‘रिचार्ज’ केले जाणार आहे. तसेच गोपीचंद पडळकर यांचा सत्कार करून त्यांनाही पुन्हा बळ दिले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर दुष्काळी पट्ट्यात होणाऱ्या या मेळाव्याकडे राजकीय मंडळींचे लक्ष लागले आहे.

बाजार समितीचे माजी सभापती प्रशांत शेजाळ म्हणाले, ‘‘गोपीचंद पडळकर यांनी तीन लाखांहून अधिक मते घेऊन मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा जाहीर सत्कार आघाडीचे संस्थापक सदस्य तसेच महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. अण्णाराव पाटील यांच्या हस्ते करण्यात येईल.

स्वागताध्यक्ष जयसिंग शेंडगे आहेत. तसेच आघाडीचे प्रवक्ते अमोल पांढरे, सचिन माळी, प्रा. सुकुमार कांबळे आदी उपस्थित राहणार आहेत.’’ नानासाहेब वाघमारे, डॉ. सुदर्शन घेरडे, निवांत कोळेकर, राहुल मदने, डॉ. विवेक गुरव, प्रमोद कांबळे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com