वनवासी कल्याण आश्रमाने जपला एकात्मभाव - देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

शिर्डी - 'वनवासी समाजाला सुवर्णमयी इतिहासाची परंपरा आहे. देशातील जल, जमीन आणि जंगलावर परकीयांनी आक्रमण केले, त्या वेळी हे देशरक्षणासाठी पुढे आले. विभिन्न चालीरीती व बोली भाषा जपल्या. आपण सारे भारतमातेचे सुपुत्र आहोत, असा एकात्मभाव केंद्रस्थानी ठेवून वनवासी कल्याण आश्रमाने देशभरातील वनवासी क्षेत्रात सेवाकार्याचे जाळे विणले. साईबाबांच्या भूमीत आजवरचे सर्वांत मोठे कार्यकर्ता संमेलन भरविले. त्यामुळे साईसमाधी शताब्दी वर्षातील कार्यक्रमांना एक वेगळी शोभा आली,'' असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

साईसमाधी शताब्दी वर्षानिमित्त साईबाबा संस्थानच्या सहकार्याने आयोजित वनवासी कल्याण आश्रमाच्या अखिल भारतीय कार्यकर्ता संमेलनाचा प्रारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज झाला. त्या वेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, 'श्रद्धा आणि सबुरी ही बाबांची शिकवण आहे. श्रद्धा नसलेली माणसे स्वतःकरिता जगतात, तर श्रद्धावान माणसे दुसऱ्यांसाठी. त्यांच्या जगण्याला मोल येते. सबुरी नसेल, तर अनेक प्रश्‍न निर्माण होतात. इंग्रजांचे आक्रमण परतविण्यासाठी वनवासी समाजाने सशस्त्र लढा दिला. इंग्रजांनी त्यांना मुद्दाम शिक्षणापासून वंचित ठेवले. वनवासी कल्याण आश्रमाने मात्र एकात्मतेचे भाव ठेवून त्यांच्यापर्यंत शिक्षण पोचविण्याचे काम सुरू ठेवले. त्यांच्या खेलकूद प्रकल्पाच्या क्रीडा स्पर्धेने विश्‍वविक्रम केला. देशाला चांगले खेळाडू मिळू लागले.''

जमिनीची मालकी देणार - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'वनवासी समाजाच्या जल, जमीन व जंगलावरील हक्क अबाधित ठेवणारा कायदा आणणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. पुढील दोन महिन्यांत जमिनीच्या पट्ट्यांची मालकी वनवासी बांधवांकडे सुपूर्त केली जाईल.''

Web Title: Vanvasi Kalyan Ashram Devendra Fadnavis