वरदा वादळाने पळवली थंडी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

सांगली - चेन्नई किनारपट्टीवर गेल्या सोमवारी धडकलेल्या ‘वरदा’ वादळाच्या तडाख्याने सांगलीसह जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ झाली. त्यामुळे ऐन थंडीत आज सकाळी तापमानाने सरासरी गाठली. दोन दिवसांपूर्वी बोबडी वळवणारा गारठा पार पळून तर गेलाच; पण काल रात्री काहीसा उकाडा जाणवला. हवामानातील बदलाचा हा यू टर्न सांगलीकरांनी दोन दिवसांत अनुभवला.

सांगली - चेन्नई किनारपट्टीवर गेल्या सोमवारी धडकलेल्या ‘वरदा’ वादळाच्या तडाख्याने सांगलीसह जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ झाली. त्यामुळे ऐन थंडीत आज सकाळी तापमानाने सरासरी गाठली. दोन दिवसांपूर्वी बोबडी वळवणारा गारठा पार पळून तर गेलाच; पण काल रात्री काहीसा उकाडा जाणवला. हवामानातील बदलाचा हा यू टर्न सांगलीकरांनी दोन दिवसांत अनुभवला.

आंध्र आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीला दणका दिलेल्या या वादळाचे परिणाम आज सांगलीत प्रकर्षाने जाणवले. दुपारी १२ पर्यंत सूर्यदर्शनच झाले नाही. ढगाळ हवामानामुळे पावसाची शक्‍यता वाटत होती. मात्र दुपारी १२ नंतर सूर्यदर्शन झाले. त्यानंतर वातावरण बरेचसे पूर्ववत झाले. मात्र, नेहमीप्रमाणे थंडी जाणवली नाही. या ढगाळ हवामानाचा द्राक्ष पिकावर तत्काळ कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. पूर्वकाळजी म्हणून शेतकऱ्यांनी औषध फवारणी केली आहे, मात्र पावसाच्या शक्‍यतेने बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आज सकाळी आठ वाजता सांगलीत २१.७, कोल्हापुरात २२ तर सातारा येथे २१.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. राज्यात सर्वाधिक कमी तापमान नाशिक येथे ११.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. राज्यात सर्वत्रच तापमानात वाढ झाली आहे. पुढील दोन दिवस ही स्थिती राहील.

‘‘हवामानाचा अंदाज घेऊन डाऊनी आणि भुरीची शक्‍यता गृहीत धरून औषध व पावडर फवारणी शेतकऱ्यांनी केली आहे. सध्याच्या ढगाळ हवामानासाठी ही उपाययोजना पुरेशी आहे. पुणे, लातूर, उस्मानाबाद, कोल्हापूर येथे पाऊस पडला आहे; पण सांगली परिसरात ती शक्‍यता नाही. पाऊस झाला तर मात्र नुकसान होऊ शकते.’’
- सुभाष आर्वे, द्राक्ष बागायतदार

हवामान विभागाचा अंदाज
मराठवाड्याच्या संपूर्ण भागात, तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ, विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ व कोकण-गोव्याच्या काही भागात तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात सरासरीच्या जवळपास तापमान होते. उद्या दक्षिण कोकण-गोव्यात व दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. उत्तर कोकण व उत्तर मध्य-महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता. १६ डिसेंबरपासून गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता.

उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे आपल्याकडे थंडी असते. चक्रीवादळामुळे वाऱ्याची दिशा बदलते. समुद्रावरून येणारे वारे बाष्प घेऊन येते. त्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. आणखी दोन दिवस ही स्थिती राहील. त्यानंतर हवामान पूर्ववत होईल असा अंदाज आहे.
- अभिजित घोरपडे, हवामान अभ्यासक

Web Title: Vardah cyclone vulnerable to cold