बांबूच्या आकाशकंदिलांचे विविध प्रकार कोल्हापूर बाजारात

नंदिनी नरेवाडी
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

बुरूडकाम हा आमचा पारंपरिक व्यवसाय. सुरुवातीला कापडाचे आकाशकंदील बनवत होतो. तोच पॅटर्न आम्ही बांबूत वापरला. दरवर्षी दोन नवीन प्रकार यात आणतो. 
- संगीता वडे

कोल्हापूर - बांबूच्या काड्या, बांबूचे पेर, त्याला आकर्षक नक्षीकाम व रंगलेपन करून विशिष्ट कोनात केली जाणारी बांधणी आणि त्यातून तयार होणारे रंगीबेरंगी आकाशकंदिल यंदाच्या दिवाळीत रोषणाई विलोभनीय करणार आहेत. त्यासाठी बांबूचे चोवीसपेक्षा जास्त आकाशकंदील बनविणाऱ्या कणेरकरनगर येथील संगीता वडे यांच्या हाताला विलक्षण गती आली आहे. त्यांनी बनविलेले आकाशकंदील घरोघरी पर्यावरणपूरक अंगणात दीपोत्सवाचा प्रकाश अधिक लख्ख करणार आहे. 

संगीता वडे या आकाशकंदील बनविणाऱ्या निष्णात कलावंतांपैकी एक आहेत. बांबूपासून अनेकजण आकाशकंदील बनवतात; परंतु त्यापासून २४ पेक्षा जास्त आकाराचे व रंगसंगतीने ल्यायलेले आकाशकंदील बनविण्यात त्यांचा २० वर्षांतील अनुभव हाच आकाशकंदील बनविण्यात त्या माहिर बनल्याचे दिसते. डायमंड, चांदणी, डमरू, स्तंभ, फुल, फुलदाणी आदी प्रकारचे आकाशकंदील मांडले आहेत. प्रत्येक आकाशकंदिलाची बांधणी करताना साधलेला कोन, बांधणीतील पेरावर केलेले रंगलेपन तसेच कंदिलाला साजेश्‍या रंगातील दोऱ्याने केलेले भक्कम जोडकाम व सजावटीचा भाग म्हणून नक्षीकाम केलेल्या कापडाचा वापर करून आकाशकंदिल सजविले आहे.

अशा नटलेल्या, सजलेल्या आकाशकंदिलाच्या पोकळीत विद्युत बल्ब जोडण्यासाठी जागा आहे. कमीत कमी चार इंचापासून ते दीड दोन फुटांच्या आकाशकंदिलापर्यंत त्यांच्या संग्रही आहेत. त्यांचे हे आकाशकंदील राज्यात जातात. परदेशातही या आकाशकंदिलाला मागणी आहे. गेल्या वर्षी विविध प्रकारचे २४ आकाशकंदील ऑस्ट्रेलियात पाठवले होते. यंदा त्यांनी १५०० आकाशकंदील केले आहेत.

हे आहेत प्रकार
डमरू, घंटी, डमरू उलटी टोपी, डमरू डायमंड, तुळशी कट्टा, तुळशी वृंदावन, तबकडी, चौकोन, षटकोन, षटकोन चौकोन, त्रिकोण, मासा, शंकु, चौकोन पाकळी हे फोल्डींगचे आकाशकंदिल आहेत. तर लहान पाकळी, मोठी पाकळी, लहान चांदणी, मोठी चांदणी, बेल लॅंम्प असे विना फोल्डिंगचे आकाशकंदील त्या बनवितात. यांची किंमत २५० पासून ७५० रुपयांपर्यंत आहे.

बुरूडकाम हा आमचा पारंपरिक व्यवसाय. सुरुवातीला कापडाचे आकाशकंदील बनवत होतो. तोच पॅटर्न आम्ही बांबूत वापरला. दरवर्षी दोन नवीन प्रकार यात आणतो. 
- संगीता वडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Various types of bamboo lantern in Kolhapur market