वसंतदादा बॅंकेच्या कारभाऱ्यांवर जप्ती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

सांगली - येथील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅंकेच्या 26 माजी संचालक आणि दोन अधिकाऱ्यांच्या मालमत्तेच्या जप्तीचे आदेश चौकशी अधिकारी ऍड. आर. डी. रैनाक यांनी गुरुवारी दिला. त्यात जयश्री मदन पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, नगरसेवक सुरेश आवटी, माजी उपमहापौर किरण जगदाळे आदींचा समावेश आहे. या सर्वांच्या मालमत्तांची विक्री किंवा हस्तांतर रोखा, असा आदेश विविध शासकीय कार्यालयांना देण्यात आले आहेत. सुमारे 350 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणाची जबाबदारी निश्‍चित होईपर्यंत या सर्वांच्या मालमत्ता गोठवण्यात आल्या आहेत.

वसंतदादा बॅंकेची सहकार कायदा कलम 88 नुसार चौकशी सुरू आहे. त्यात कलम 73 (3) अन्वये माजी संचालक व अधिकाऱ्यांवर आरोपपत्र ठेवण्यात आले आहे. त्याच्या चौकशीचे काम सुरू आहे. त्यातील एका माजी संचालकाने 28 डिसेंबर 2016 रोजी त्यांच्या मालमत्तेच्या विक्रीची एक जाहिरात वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली. त्याची माहिती एका ठेवीदाराने चौकशी अधिकाऱ्यांना दिली. या जाबदारांवर आरोप निश्‍चिती केल्यानंतर वसुलीसाठी त्यांच्या मालमत्ता ताब्यात घेतल्या जातात; मात्र त्याआधी त्या विकल्या किंवा त्यांचे हस्तांतर केले तर वसुली अशक्‍य होणार आहे, हे लक्षात आणून दिले. त्यानंतर तातडीने रैनाक यांनी मालमत्ता जप्तीचा आदेश काढला. या मालमत्तांची कोणत्याही प्रकारे विक्री, हस्तांतर, तारण गहाण किंवा भाड्याने देणे, इतरांना हक्क व अधिकार बहाल करणे यास प्रतिबंध घालण्यात आला. या मालमत्ता लगेच ताब्यात घेतल्या जाणार नाहीत किंवा त्याच्या वापराला विरोध केला जाणार नाही. मात्र, या मालमत्ता चौकशी अधिकाऱ्यांच्या क्षेत्राबाहेर हलवण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे नोटिसीमध्ये म्हटले आहे.

Web Title: vasantdada bank director property seized