‘गंध मातीचा’ मधून लोकसंस्कृतीचे दर्शन

‘गंध मातीचा’ मधून लोकसंस्कृतीचे दर्शन

सांगली - जात्यावरील ओवी, वासुदेवाचे आगमन, शेतकरी नृत्य, धनगरी नृत्य, दिंडी, भारूड अशा विविध लोककला प्रकारांतून सादर झालेल्या ‘गंध मराठी मातीचा’ कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडले. वसंतदादा महोत्सवात लोकरंजन प्रस्तुत आणि रितेश अग्रवालनिर्मित कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या अस्मितेचा महाविष्कार पाहायला मिळाला.

वसंतदादा महोत्सवास गेले दोन दिवस तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर आजच्या लोककला व संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या ‘गंध मराठी मातीचा’ कार्यक्रमाचीही उत्सुकता सांगलीकरांना होती. त्यामुळे सायंकाळी लवकरच गर्दीचे दर्शन घडले. सातच्या सुमारास गणेशवंदनाने सुरवात झाली. त्यानंतर महाराष्ट्राच्या एकेक लोककलेचे दालन उघडले गेले. ओवी, काकडआरती, तुळशीपूजन, गावाकडच्या तालमीतला हुंकार, जात्यावरील गाणी सादर झाली. पारंपरिक वेशभूषेत उत्कृष्ट सादरीकरण पाहून रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. वासुदेव नृत्य सादर झाले. ‘मृगातल्या सावल्यांना’ हे शेतकरी नृत्य कलाकारांनी सादर करत शेतीचे महत्त्व सांगितले. ‘सुंबरान गाऊ चला’ या धनगरी नृत्यातून त्यांची संस्कृती उलगडली गेली. ‘देवा जोतिबा चांगभलं’ नृत्यातून जोतिबाच्या सासनकाठीचे दर्शन झाले.

‘कानडा राजा पंढरीचा’ गीतानंतर दींडीतून वारकरी संप्रदायाचा प्रवास सुरू झाला. शेकडो वर्षांची परंपरा दिंडीतून सादर केल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. आदिवासी नृत्य आणि ‘नाचतो डोंबारी’ नृत्यातून संस्कृतीतील वैविधतेचे दर्शन झाले. पारंपरिक भारुडाला रसिकांनी दाद दिली. खास शैलीतून भारूड सादर करताना तरुण पिढीला व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश दिला. तसेच वारकरी संप्रदाय आणि अध्यात्माचे महत्त्व सांगितले. लोककला संस्कृतीचा प्रवास छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर संपला.

वसंतदादा महोत्सव समितीचे प्रमुख तथा वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, प्रतीक पाटील, श्रीमती शैलजा पाटील, नीता केळकर, उदय पवार, नगरसेवक मनोज सरगर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com