तारकांच्‍या अदा, सांगलीकर फिदा

तारकांच्‍या अदा, सांगलीकर फिदा

सांगली - सिनेतारका सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक, श्रुती मराठे, माधवी निमकर यांच्या नृत्य अदांवर शिट्या, टाळ्यांचा पाऊस पाडत सांगलीकरांनी एकच जल्लोष केला, तर गायक स्वप्नील गोडबोले, मधुरा परांजपे, कविता राम यांच्या गाण्यांनी प्रेक्षकांना डोलायला लावले. हजारो प्रेक्षकांचा उत्साह आणि उधाणात सिनेतारका आणि गायकांच्या ‘नृत्यसंध्या’ कार्यक्रमाने वसंतदादा महोत्सवाची सांगता झाली.

महोत्सवाच्या समारोपप्रसंगी रविवारची सुटी आणि रुपेरी पडद्यावरील तारकांचे नृत्य व मधूर गाणी ऐकायला मिळणार असल्याने सायंकाळी लवकरच रसिकांनी आपापली जागा फिक्‍स केली. सातच्या सुमारास नृत्यसंध्येला सुरवात झाली.

वाहिनीवरील प्रसिद्ध निवेदिका आणि मिमिक्रीने हसायला लावणारी मेघना एरंडे यांनी बहारदार सूत्रसंचालन करीत ‘एंट्री’ केली. स्वप्नील गोडबोलने ‘मन उधाण वाऱ्याचे’ गीत गाऊन सुरवात केली. ‘रंगात रंग तो शाम रंग’वर प्रेक्षकांना डोलायला लावले. स्वप्नीलनंतर मधुरा परांजपेने ‘जीव रंगला... रंगला’ गाणे गात महोत्सवात चांगलाच रंग भरला. ‘गोऱ्या गोऱ्या गालावर चढली लाली’ म्हणत प्रेक्षकांना जिंकले.

वाहिनीवर चमकणाऱ्या माधवी निमकरने ‘मेरा घागरा’ गाण्यावर बहारदार नृत्य केले. ‘सारेगम’फेम रोहित राऊतने ‘हृदयात वाजते समथिंग’ हे आवडते गाणे म्हणत सर्वांना जिंकले. ‘मला वेड लागले प्रेमाचे’ गाण्यावर तरुणाईने एकच जल्लोष केला. मोबाईल टॉर्च लावून साथ दिली. ‘मेरे मन ए बता दे तू’ गाण्यालाही दाद दिली. श्रुती मराठेने ‘सोळावे वरीस धोक्‍याचे’ लावणीनृत्य करीत धमाल उडवून दिली. गायिका कविता राम हिने ‘जुळता जुळता जुळतंयकी’ हे मधुर आवाजात गीत सादर करीत चुणूक दाखवली. तिच्या ‘नेहमीच राया तुमची घाई’ लावणीवर शिट्यांचा पाऊस पडला. कविता-स्वप्नील जोडीने ‘सैराट झालं जी’ गाण्यावर सर्वांनाच सैराट करून सोडले. प्रेक्षकांनी खुर्च्यांवरून उठून नृत्य करीत साथ दिली. 

मानसी नाईक हिने ‘सोडा की हात माझा दाजिबा’ लावणीवर दमदार ‘एंट्री’ करीत शिट्या, टाळ्या वसूल केल्या. नृत्य करता-करता तिने चक्क प्रेक्षकांत जाऊन तरुणी-महिलांना नाचायला लावले. सिनेतारका सोनाली कुलकर्णीच्या आगमनाची उत्सुकता लागली असतानाच तिने ‘अप्सरा आली’ गाण्यावर नृत्य करीत सर्वांनाच जल्लोष करायला भाग पाडले. ‘मला जाऊ द्या ना घरी’ नृत्यालाही जोरदार प्रतिसाद मिळाला. सिनेतारका आणि गायकांची ‘नृत्यसंध्या’ कार्यक्रमातून सांगलीकरांना जिंकले. प्रेक्षकांबरोबर ‘सेल्फी’ घेत कलाकारांनी सांगलीच्या आठवणी जपत महोत्सवाच्या समारोपात रंगत आणली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com