वसंतदादांचा पठ्ठ्या लढणारच

वसंतदादांचा पठ्ठ्या लढणारच

सांगली - हा पठ्ठ्या वसंतदादांचा नातू आहे. तो विकला जाईल एवढे पैसे गोळा करायला भारतीय जनता पक्षाला राफेलसारखे अजून लय घोटाळे करायला लागतील. ही जागा इतरांना सोडण्याच्या निर्णयात दिल्लीला बदल करावा लागेल. मी काँग्रेसचाच उमेदवार असेन आणि समजा ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली तरी सांगलीतून लढणार म्हणजे लढणारच, अशी गर्जना काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांनी आज वसंतदादा समाधिस्थळी केली. 

कृष्णा नदीकाठावर वसंतदादा, प्रकाशबापू, विष्णूअण्णा आणि मदनभाऊंच्या समाधीच्या साक्षीने विशाल यांनी आक्रमक भूमिका मांडताना खासदार संजय पाटील यांच्यावरही जोरदार आणि तीव्र शब्दांत टीकास्त्र सोडले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपात सांगलीचा जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जाहीर होईल, अशी दाट शक्‍यता असताना विशाल यांनी  शेवटच्या चेंडूवर षटकार खेचण्याचा प्रयत्न केला. तो निर्णायक ठरल्यास सांगली लोकसभा मतदारसंघात रंगपंचमीच्या मुहूर्तावर नव्यानेच रंग भरले जाणार आहेत. 

काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी मंत्री प्रतीक पाटील, सत्यजित देशमुख, शैलजा पाटील, जयश्री पाटील, महेंद्र लाड यांची प्रमुख उपस्थिती होती. 
विशाल पाटील म्हणाले, ‘‘दादा घराणे कसे संपविण्यासाठी खूप ताकदीने प्रयत्न सुरू झाले आहेत. पण, दादांचा विचार असा संपणार नाही. दादांचे घराणे संपविण्याच्या नादात काँग्रेस संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. घराणे संपले तरी दादांचा विचार संपणार नाही. देशात इंदिरा गांधींच्या विरोधात लाट असताना दादांनी सांगलीतून खासदार अण्णासाहेब गोटखिंडे यांना निवडून आणले होते. आम्ही ताकदीवर उमेदवार निवडून आणून पक्षाला ताकदच दिली आहे. बंडखोरी करायला धाडस लागत नाही तर लोकांचे प्रेम लागते. माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या कमी नाही.’’

ते म्हणाले, ‘‘मी उभे राहणार म्हटल्यावर इथल्या खासदारांना भीती वाटायला लागली आहे. ते प्रचंड घाबरले. ज्याला-त्याला भेटून विशालला उमेदवारी नको, यासाठी प्रयत्न करीत आहेत. बारक्‍या-बारक्‍यांना तू उभार म्हणून ते सांगत आहेत. सर्वांना उठवून-बसवून प्रयत्न करीत आहेत. स्वत:ची सीट वाचविण्यासाठी त्यांना पर्याय राहिला नाही. आम्ही भाजपमध्ये चालल्याबाबत वावड्या उठविल्या. परंतु, हा पठ्ठ्या दादांचा नातू आहे. आमची विकेट जाणार नाही. लोक आम्हाला मते देतील. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मीच काँग्रेसचा उमेदवार असेन. दिल्लीलाही बदल करावा लागेल. निवडणुकीत मीच निवडून येईन, अशी ग्वाही देतो.’’

या वेळी ‘खासदार विशाल पाटील यांचा विजय असो’ अशा घोषणांनी कृष्णाकाठ दणाणून गेला. दादांच्या समाधीस्थळावर झालेल्या मेळाव्यासाठी 

श्री. आवाडे म्हणाले, ‘‘वसंतदादांनी पाणी अडवा आणि पाणी जिरवा असा संदेश दिला. आज त्यांच्या घराण्याच्या आडवे येणाऱ्यांना अडवा आणि त्यांची जिरवा, असा मंत्र घेऊन काम करा. विशाल पाटील खासदार होण्यासाठी जे काही करावे लागेल ते करा. एकीकडे प्रचंड ताकद विरुद्ध पुण्याई अशी लढाई आहे. सांगलीचे तिकीट काँग्रेसलाच मिळावे, यासाठी आम्ही प्रदेशकडे मते मांडली. खासदार शेट्टींनाही सांगलीचा खासदार दादा घराण्याचा होणार, असे आम्ही सांगितले आहे. त्यामुळे येथे दादा घराण्याला कोणी डिवचले तर कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत. आज दादांच्या समाधीस्थळी विशालला निवडून आणण्याची प्रतिज्ञा घ्या.’’

प्रतीक पाटील, जयश्री पाटील, सत्यजित देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, सी. बी. पाटील, महेंद्र लाड, माजी महापौर हारून शिकलगार, जिल्हा बॅंकेचे संचालक सुरेश पाटील, अजित दुधाळ, डी. के. पाटील, पूजा पाटील, नितीन चव्हाण, महेश पाटील, आप्पासाहेब शिंदे, दिनकर पाटील, असिफ बावा, वहाब मुल्ला, सरपंच अनिल शेगुणशे, दत्तात्रय चव्हाण, नरेंद्र मोहिते, सागर डुबल, रामचंद्र भगत, डी. एम. पाटील आदींची भाषणे झाली. सदानंद कबाडगे यांनी प्रास्ताविक केले.

माजी महापौर कांचन कांबळे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण, वहिदा नायकवडी, उमेश पाटील, सुभाष खोत, किशोर जामदार आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

विश्‍वजितना गोंजारले
विश्‍वजित कदम आणि विशाल पाटील यांच्यात वाक्‌युद्ध रंगले होते. आज विशाल यांनी विश्‍वजित यांना गोंजारण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, ‘‘विश्‍वजित, मी तुम्हाला झारीतील शुक्राचार्य म्हटले नव्हते. झारीतील शुक्राचार्य कोण आहे, हे साऱ्या जनतेला माहिती आहे. पण, विश्‍वजित त्या दिवशी का चिडले माहीत नाही, कदाचित सकाळचा नाश्‍ता कमी पडला असेल.’’ दरम्यान, महेंद्र लाड हे या सभेला विश्‍वजित यांचा जाहीर पाठिंबा असेल, असा सांगावा घेऊन आले होते.

पैसे आणि मतही
प्रतीक पाटील यांनी काँग्रेसची उमेदवारी घेताना आर्थिक समस्या असल्याबद्दलचे वक्तव्य या वेळी केले. त्याला उद्देशून विशाल पाटील म्हणाले, ‘‘प्रतीकदादा, तुम्ही पैशांची काळजी करू नका. 
लोक मते देतील आणि पैसेही गोळा करतील. दादांच्या सांगलीतून राज्याचे उमेदवार ठरायचे. त्यांच्या समाधीस्थळी लोक काँग्रेसचा उमेदवार निश्‍चित ठरवतील. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मीच काँग्रेसचा उमेदवार असेन. दिल्लीलाही बदल 
करावा लागेल.’’

आमच्या दुधावर फणा
विशाल पाटील यांनी भाजपचे खासदार संजय पाटील यांचा एकेरी उल्लेख करीत सडकून टीका केली. ते म्हणाले, ‘‘मागील निवडणुकीत चुकून तीर लागला. जिल्ह्याचा मालक झाल्याप्रमाणे प्रचंड गुर्मीत वावरणारा, जिल्ह्यातील प्रत्येक सातबाऱ्यावर स्वत:चे नाव कोरून घेण्याचा प्रयत्न करणारा, आमच्या घराण्याने पाजलेल्या दुधावर फणा काढणारा हा येडा माणूस खासदार झाला आहे. त्याला पाडायचे असेल तर आपण सर्वांनी एकजुटीने ताकदीने उमेदवार उभा केला पाहिजे.’’

गावरान शैलीत भाषण
विशाल पाटील काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. १२ मिनिटांच्या भाषणात त्यांनी तुफान टोलेबाजी केली. ‘लोक पैसंबी देणार आणि मतबी देणार’ अशा गावरान शैलीत त्यांनी प्रतीकदादांना धीर दिला. त्यांची काहीशा गावरान आणि खास शैलीतील भाषणाची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाली.

शेट्टींना जागा सोडायला सांगा
माजी मंत्री आवाडे म्हणाले, ‘‘प्रतीकदादा आणि खासदार राजू शेट्टी यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. प्रतीकदादांनी आता त्याचा उपयोग करून घ्या. दोघांच्या जिव्हाळ्यातील संबंधाचा मी साक्षीदार आहे. प्रतीकदादांनी आता शेट्टींना जागा सोडा म्हणून सांगावं.’’

बंडखोरी कराच...
आजच्या मेळाव्यात दादा घराण्याला डावलले जात असल्याबद्दल नेते व पदाधिकाऱ्यांनी जोरदार टीका केली. पक्षाने एबी फॉर्म दिला नाही तर बंडखोरी कराच. डावलले तर राज्यात पक्ष जिवंत राहणार नाही. आता नाही तर कधीच नाही. तिकीट नाहीतर आघाडी करा. अपक्ष अर्ज भरून ताकद दाखवा. बंडखोरी करा... आजच नारळ फोडा, अशा शब्दांत अनेक वक्‍त्यांनी बंडखोरीचा आदेश दिला.

फूस... फूस...
प्रतीकदादांच्या मवाळ स्वभावाचा फायदा घेतला जातो. त्याचा संदर्भ घेत एका कार्यकर्त्याने पुराणातील शेषनागाच्या कथेचा संदर्भ दिला. प्रतीकदादांनी अस्तित्व टिकवायचे असेल तर आता शेषनागाप्रमाणे फूस... करायला शिकले पाहिजे, असा सल्ला दिला. तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांनी फूस... फूस... करून पाठबळ दिले. अधूनमधून फूस... फूस... करीत कार्यकर्त्यांनी जोश निर्माण केला.

विशाल ठाम राहा
प्रतीक पाटील यांनी आज वडीलकीच्या नात्याने विशालला सल्ला दिला. ते म्हणाले, ‘‘काँग्रेसमधील नेत्यांना दादा नको आहेत. आज इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांचा काँग्रेस राहिला नाही. विशाल, तू काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भर. पक्षाने एबी फॉर्म नाही दिला तरी अपक्ष म्हणून उमेदवारी राहीलच. तू तुझी जिद्द सुरू ठेव. पक्षाला ठरवू दे, उमेदवारी द्यायची की नाही. तू ठाम राहा. प्रत्येक जण तुझ्या पाठीशी राहील.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com