एलबीटीसाठी वसंतदादा कारखान्यावर फौजदारी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

सांगली - थकीत एलबीटी वसुलीपोटी दिलेले 80 लाख रुपयांचे धनादेश न वटल्याने वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांवर फौजदारी दाखल करण्यात आल्याची माहिती एलबीटी अधीक्षक अमर छाचवाले यांनी आज दिली. थकीत घरपट्टीसाठी दोन दिवसांपूर्वीच कार्यकारी संचालकांच्या दालनाला टाळे लावण्यात आले आहे.

सांगली - थकीत एलबीटी वसुलीपोटी दिलेले 80 लाख रुपयांचे धनादेश न वटल्याने वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांवर फौजदारी दाखल करण्यात आल्याची माहिती एलबीटी अधीक्षक अमर छाचवाले यांनी आज दिली. थकीत घरपट्टीसाठी दोन दिवसांपूर्वीच कार्यकारी संचालकांच्या दालनाला टाळे लावण्यात आले आहे.

विविध खरेदीपोटी देय असलेल्या एलबीटीच्या वसुलीसाठी 3 कोटी रुपयांची थकबाकी महापालिकेने कारखाना प्रशासनावर निश्‍चित केली आहे. एलबीटीच्या सुनावणीला कारखान्याच्या वतीने कोणीच हजर राहिले नाही. त्यामुळे एक्‍स पार्टी निकाल देत थकबाकी निश्‍चित केली होती. त्यापैकी 80 लाख रुपयांची थकबाकीपोटी कारखाना प्रशासनाने 80 लाखांचे धनादेश दिले होते. ते न वटल्याने फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आल्याचे श्री. छाचवाले यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी 16 लाख रुपयांच्या घरपट्टीसाठी कार्यकारी संचालकांच्या कार्यालयाला टाळे लावण्यात आले होते. महापालिकेने प्रथमच बड्या थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

शेतकरी व कामगारांच्याबद्दल...
दरम्यान, हा कारखाना सिक्‍युरिटायझेशन ऍक्‍टखाली ताब्यात घेण्याआधी शेतकरी व कर्मचाऱ्यांची देणी द्यावीत, अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांच्याकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे, की मागील तीन वर्षांपासूनची ऊसबिलापोटी 20 कोटी रुपयांची देणी कारखान्याकडे थकीत आहेत. 1991 पासून शेतकऱ्यांच्या ठेवी व त्यावरील व्याजापोटी 80 कोटी रुपये थकीत आहेत. चालू व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पगार, फंड, ग्रॅच्युइटी, वेतनवाढ, बोनस असे साठ कोटी देणे आहे. ही सर्व देणी आधी लावावीत. जिल्हा बॅंकेने पन्नास कोटींच्या कर्जासाठी साखर कारखाना ताब्यात घेऊन भाडे तत्त्वावर द्यायची तयारी सुरू केली आहे. मात्र त्याआधी कामगार शेतकऱ्यांची देणी द्यावीत.

कारवाईची कारणे अशी -
एलबीटीची थकबाकी तीन कोटींची
80 लाख रुपयांचा धनादेश वटला नाही
घरपट्टीची थकबाकी 16 लाख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vasantdada sugar factory crime for lbt