वटपौर्णिमा विशेष : पतीला दीर्घायुष्य देणारी आधुनिक सावित्री !

वटपौर्णिमा विशेष : पतीला दीर्घायुष्य देणारी आधुनिक सावित्री !

कोल्हापूर - पतीचे यकृत निकामी झाल्याने प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय. पतीनेही धीर सोडला होता; पण जन्मोजन्मीची साथ देण्याची शपथ घेतली असताना याच जन्मी आपली लवकर ताटातूट होणार, ही कल्पनाच मनाला पटत नव्हती. अखेर तिनेच निर्धार केला आणि पदर खोचला.

पतीच्या यकृत प्रत्यारोपणासाठी आवश्‍यक सर्व पूर्तता स्वतः अनेक हेलपाटे मारून पूर्ण केली आणि शस्त्रक्रियाही यशस्वी केली. आर. के. नगरातील निशा संदीप पोवाळकर हे या आधुनिक सावित्रीचे नाव. वटपौर्णिमेला पतीच्या दीर्घायुष्यासाठी फक्त वडाच्या झाडाला धागा गुंडाळून प्रार्थना करण्यापेक्षाही त्यांनी पुढचं पाऊल टाकलं आणि आपल्या पतीला पुन्हा नव्या आत्मविश्‍वासानं उभं केलं. 

निशा यांचे पती संदीप यांचे गोकुळ शिरगाव येथे मशिन शॉप आहे. दोघांचा सुखाचा संसार. वैभवी व विरेन अशी दोन मुलेही त्यांना आहेत, मात्र दहा वर्षांपूर्वी पतीला मधुमेहाचा आजार जडला. पायाला मार लागल्याचे निमित्त झाले आणि ताप भरला. प्रकृती ढासळू लागली. त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. यकृत निकामी झाल्याचे तपासात स्पष्ट झाले. संदीप यांची तब्येत खालावली, की डोनर शोधण्याइतका वेळही उपलब्ध नव्हता. घरात वडीलधारे कोणी नाही. निशा यांना एकटीनेच निर्णय घ्यायचा होता. पती कोमात असतानाच त्यांनी स्वतःचे यकृत त्यांना देण्याचा निर्णय घेतला. पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये जावे लागणार होते.

निशा यांच्या काही टेस्ट कराव्या लागणार होत्या. त्याचाच खर्च जवळजवळ दीड लाखांपर्यंत होता आणि यकृत प्रत्यारोपणाचा खर्च २५ लाखांपेक्षा अधिक होता. त्यांचे भाऊ जगदीश पाटील व बहीण डॉ. सविता पराग यांचा पाठिंबा होता. मुंबईमध्ये उपचारासाठी दाखल झाल्यानंतर निशा यांच्या वैद्यकीय तपासण्या सुरू झाल्या. सुरवातीला रक्तगट जुळल्यानंतर त्यांचा निर्णय पक्का झाला. तेथील डॉ. विनयकुमारन यांनी पुढील उपचारांची माहिती दिली. ३ मे २०१६ रोजी पंधरा तासांचे ऑपरेशन यशस्वीपणे झाले आणि निशा यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. उपचार सुरू असतानाच त्यांना मुख्यमंत्री सहायता निधी, टाटा ट्रस्ट व सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून मदत उपलब्ध होऊ शकतात, याची माहिती मिळाली आणि आमदार उल्हास पाटील व पराग पाटील यांच्या सहकार्याने ही मदतही उपलब्ध झाली. सध्या पोवाळकर कुटुंबाच्या संसाराचा गाडा पुन्हा नेटानं हाकला जाऊ लागला आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com