भाजीपाला मंडई कडकडीत बंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

कोल्हापूर - किरकोळ भाजीपाला व्यापाऱ्यांवर लादलेली ६ टक्के अडत रद्द करावी, बाजार समिती आवारात होणारे मोघम सौदे बंद करावेत तसेच भाजीपाला सौद्याच्या वेळा निश्‍चित कराव्यात या मागण्यांसाठी किरकोळ विक्रेत्यांनी आंदोलन सुरू केले आहे. 

कोल्हापूर - किरकोळ भाजीपाला व्यापाऱ्यांवर लादलेली ६ टक्के अडत रद्द करावी, बाजार समिती आवारात होणारे मोघम सौदे बंद करावेत तसेच भाजीपाला सौद्याच्या वेळा निश्‍चित कराव्यात या मागण्यांसाठी किरकोळ विक्रेत्यांनी आंदोलन सुरू केले आहे. 

यामुळे शहरातील भाजीपाला मंडईतील किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी बाजार समितीतील घाऊक भाजीपाला खरेदी केला नाही. परिणामी जवळपास २० ते २५ लाख रुपयांची भाजीपाल्याची उलाढाल ठप्प झाली. यामुळे शेतकऱ्यांकडून थेट भाजीपाला विक्री जोमाने सुरू असल्याचे चित्र आहे. सात महिन्यांपूर्वी पणन विभागाच्या आदेशाने व्यापाऱ्यांकडून ६ टक्के अडत घेण्यात यावी, असे आदेश दिले होते. त्यानुसार राज्यातील बाजार समितीमध्ये त्याची अंमलबजावणी सुरू झाली. कोल्हापुरात किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांकडून सहा टक्के अडत वसुली सुरू आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांची नाराजी आहे. 

यानंतर पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनाही निवेदन देत किरकोळ व्यापाऱ्यांवरील अडत रद्द करावी, अशी मागणी विक्रेत्यांनी केली होती.

या वेळी खोत यांनी सकारात्मक निर्णय घेऊ, असे अश्‍वासन दिले होते. पण प्रत्यक्षात अडत रद्द करण्याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. येथील बाजार समितीत भाजीपाला सौद्यासाठी येतो. त्या सर्व भाजीपाल्याचे सौदे बाजार समितीच्या नियमानुसार होणे गरजेचे आहे. प्रत्यक्ष बाजार समितीत मोजक्‍याच मालाचे सौदे होतात. त्यानंतर उर्वरित बहुतांशी माल परस्पर विक्रीस जातो. यामुळे किरकोळ विक्रेत्यांना चांगल्या दर्जाचा भाजीपाला पुरेशा प्रमाणात मिळत नाही. या पार्श्‍वभूमीवर किरकोळ विक्रेत्यांनी भाजीपाला खरेदी बंद आंदोलन केले. त्यानुसार आज बाजार समितीत ३० ते ४० टक्के भाजीपाला आला नाही तर उर्वरित भाजीपाला कोकणात पाठविण्यासाठी सौदे झाले. स्थानिक भाजीपाला मंडईतील किरकोळ विक्रेत्यांनी भाजीपाला खरेदी केला नाही. परिणामी कपिलतीर्थ, लक्ष्मीपुरी, पाडळकर मार्केट, शिंगोशी मार्केट, रुईकर कॉलनी, शिवाजी पुतळा, ऋणमुक्तेश्‍वर येथील मंडईमध्ये भाजीपाला विक्रीसाठी आलाच नाही. बहुतेक किरकोळ विक्रेत्यांनी आज व्यवहार बंद ठेवले. 

थेट शेतकऱ्यांकडून खरेदी
शहरातील विविध मार्गांवर शेतकरी आपल्या शेतातील भाजीपाला विक्रीसाठी बसतात. अशा शेतकऱ्यांकडून ग्राहकांनी भाजीपाला खरेदी केला. यात ऋणमुक्तेश्‍वर मंदिर, टाऊन हॉल, लक्ष्मीपुरी तसेच चिखली, केर्ली, हालोंडी, उजळाईवाडी येथे शेतकऱ्यांनी लावलेल्या भाजीपाला विक्री केंद्राला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला. शहरातील भाजी मार्केट बंद असल्याने अनेक ग्राहकांनी शहराशेजारील असलेल्या खेडगावांमध्ये जाऊन भाजीपाला खरेदी केला.

Web Title: vegetable market close