पावसाने फुलल्या रानभाज्या

नीलेश दिवटे
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

भीषण दुष्काळानंतर परतीच्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. हा पाऊस रब्बी पिकास पोषक ठरला, तर खरिपाची पिके त्याने धुऊन नेली. दुसरीकडे, हा पाऊस रानभाज्यांसाठी पोषक ठरत आहे. गेल्या कित्येक वर्षांनंतर रानफुले आणि रानभाज्या बहरल्या आहेत.

कर्जत : भीषण दुष्काळानंतर परतीच्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. हा पाऊस रब्बी पिकास पोषक ठरला, तर खरिपाची पिके त्याने धुऊन नेली. दुसरीकडे, हा पाऊस रानभाज्यांसाठी पोषक ठरत आहे. गेल्या कित्येक वर्षांनंतर रानफुले आणि रानभाज्या बहरल्या आहेत. तालुक्‍यातील स्थापलिंग मंदिर डोंगरावर रानफुले आणि भाज्यांची भरमार आहे. या परिसरात वाहते झालेले धबधबेही मनास गारवा देत आहेत. 

पाथरी, कडवंची, तांदूळचा, चिगूळ, अंबाडा, कुंजीर अशा एक ना अनेक रानभाज्या तब्बल एका तपानंतर फुलल्या आहेत. अगदी सहज व फुकट मिळणाऱ्या या रानभाज्यांतून प्रथिने, विविध जीवनसत्त्वे मिळतात. आरोग्यासाठी या रानभाज्या खूप लाभदायक ठरतात. या परिसरात भटकंती करून अनेक जण रानभाज्यांचा आस्वाद घेत आहेत. 

तालुक्‍यात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या पावसाने रानोमाळ हिरवळ दाटली आहे. त्यामुळे शेताच्या बांधांवर, पडीक जमिनीवर, माळरानावर, ओढ्याच्या, नदीच्या काठांवर रानभाज्या फुलल्या आहेत. या भाज्यांवर कुठलीही रासायनिक औषधांची फवारणी अथवा त्यांचे रोपण केलेले नसते. केवळ 
नैसर्गिक वातावरणात या भाज्या येतात. त्यामुळे त्या शंभर टक्के निरोगी असतात.

या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात खनिजे, प्रथिने असतात. दैनंदिन भाजीपाला वर्षभर मिळतोच; परंतु बहुतांश रानभाज्या पावसाळ्यातच मिळतात. त्यामुळे अनेक जण या रानभाज्यांना पसंती देताना दिसतात. शेतकऱ्यांबरोबरच काही शहरी बाबूंनाही रानभाज्यांची नवलाई असल्याने, आसपासच्या खेडेगावांतील भाजीविक्रेत्यांकडे रानभाज्यांची मागणी ते करीत आहेत. 
या भाज्यांमुळे रोजगार तर मिळतोच; पण त्या खाल्ल्याने वात, पित्त, कफदोषांचा नाश होतो. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे काम या भाज्या करतात. 

पावसाळ्यात दलदल असल्याने विषाणू निर्माण होतात. तसेच, हवामानात बदल झाल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि आजारांना निमंत्रण मिळते. पावसाळ्यातील रानभाज्यांत पौष्टिकता आणि रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते. या ऋतूत निरोगी राहण्यासाठी दिवसभरातील आहारात किमान एकदा रानभाजीचा समावेश असावा. ते आरोग्यास उत्तम आहे. 
- डॉ. चंद्रकांत कोरडे, मिरजगाव 

सध्या कशातही भेसळ आढळते. रासायनिक खते आणि औषधांचा मारा प्रत्येक फळ वा भाजीपाल्यावर असतो. मात्र, खास पावसाळ्यात सहज उपलब्ध होणाऱ्या आणि मोफत मिळणाऱ्या निरनिराळ्या रानभाज्या शंभर टक्के शुद्ध असतात. या दिवसांत या रानभाज्या खाणे आरोग्यास चांगले आहे. 
- भीमराव शिंदे, 
निसर्गप्रेमी, माहिजळगाव
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vegetables in the rain