‘ब्लॅक फिल्म’वर कारवाई वाढण्याची चिन्हे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जून 2019

कारवाया थंडावल्या होत्या!
जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या कारवाया अनेकदा करण्यात आल्या आहेत. संबंधित वाहनांच्या फिल्मही तातडीने काढण्यात आल्या. परंतु, सध्या अशा प्रकारच्या कारवाया थंडावल्या आहेत. अतिरिक्त महासंचालकांच्या आदेशामुळे पुन्हा या कारवायांना वेग येण्याची शक्‍यता आहे.

सातारा - चारचाकी वाहनांच्या काचांना ‘ब्लॅक फिल्म’ लावण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असली तरीही अनेक वाहने अद्यापही तशा स्थितीत फिरत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे अशा वाहनांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक विनय कारगावकर यांनी सर्व पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. त्यामुळे काळ्या काचांवरील कारवाई वाढण्याची शक्‍यता आहे.

वाहनांना काळ्या काचा लावल्यामुळे आत कोण बसले आहे, ते काय करत आहेत, हे समोर येत नाही. त्याचा गैरफायदा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती घेत असल्याचे अनेकदा समोर आले. खून, बलात्कार, दरोडा याबरोबर दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्यांनी काळ्या काचांचा आडोसा घेतला होता. त्यामुळे अशा फिल्मिंगवर बंदी आणण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने देशातील अशा सर्व फिल्मिंग तातडीने उतरविण्याचा व त्या बसविण्याला प्रतिबंध करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार पोलिस महासंचालकांनीही सर्व पोलिस आयुक्त व अधीक्षकांना काळ्या काचांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

या कारवाया होत असताना व्हीआयपी व्यक्तींना वगळले जात असल्याचे समोर आले. त्यानंतर कोणाला वगळायचे, याबाबतचा निर्णय घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने झेड व झेड प्लस सुरक्षा असलेल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांना केवळ यातून वगळण्याचे निर्देश दिले होते.

या निर्देशानंतर राज्यामध्ये काळ्या काचांची वाहने दिसणे अपेक्षित नव्हते. तरीही बऱ्याच वाहनांवर काळ्या काचा आढळून येतात. खासगी व्यक्तींबरोबरच शासकीय व निमशासकीय वाहनांच्या काचांनाही अशा प्रकारे फिल्मिंग लावलेले असते. त्यामुळे शासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन होत नसल्याचेच समोर आले. त्यामुळे अतिरिक्त महासंचालकांनी अशा वाहनांवर मोटर वाहन कायद्यानुसार तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश त्यांनी सर्व पोलिस आयुक्त व अधीक्षकांना दिले आहेत. तसेच अशा वाहनांच्या काचांवर लावण्यात आलेल्या काळ्या फिल्म तत्काळ काढण्यात याव्यात, असेही या आदेशात नमूद केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vehicle Black Film Crime Police Court