वाहनांच्या कागदपत्रांचा त्रास संपला!

Mobile-Digital-Locker
Mobile-Digital-Locker

सातारा - केंद्र शासनाने नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार मोबाईलमध्ये डिजिटल लॉकर (DigiLocker) या ॲपमध्ये ठेवण्यात आलेली कागदपत्रांच्या प्रतीही पोलिस व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी ग्राह्य धरायच्या आहेत. कागदपत्रे गाडीसोबत बाळगण्यासाठी वाहनधारकांना करावी लागत असलेली तारेवरची कसरत व ती कागदपत्रे खराब किंवा गहाळ होण्याची भीती आता संपलेली आहे.

कोणत्याही रस्त्यावर जाताना वाहतूक पोलिस किंवा उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी कधी अडवतील, अशी धास्ती प्रत्येक वाहनचालकाच्या मनात कायम असते. पकडल्यानंतर पहिला प्रश्‍न असतो कागदपत्र दाखवा. याच प्रश्‍नामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा उभा राहतो. त्यातही दुचाकी चालकांना याची भीती जास्त असते. त्याला कारणही तसेच असते.

दुचाकीमध्ये कागदपत्र सुरक्षित राहतील अशी व्यवस्था नसते. वाहनाच्या डिक्कीत किंवा खिशात कागदपत्रे ठेवावी लागतात. अनेकांच्या वाहनांना डिक्की नसते. त्यामुळे खिशात ठेवल्यावर कागदपत्रे खराब होण्याची किंवा गहाळ होण्याची शक्‍यता असते. त्यातच इन्शुरन्स, पियुसी ही सर्व कागदपत्रे खिशात सामावणे अवघड होते. त्यामुळे अनेकजण कागदपत्र जवळ बाळगण्यात टाळाटाळ करायचे. त्यामुळे अनेकजण डुप्लिकेट कॉपी तयार करून ती जवळ बाळगतात. परंतु, ही डुप्लिकेट कॉपी पोलिसांकडून ग्राह्य धरली जात नसायची. त्यामुळे गाडीची कागदपत्रे व वाहन चालविण्याचा परवाना सांभाळणे वाहनधारकांसमोर मोठी कटकट होती. त्यातच पोलिसांनी थांबविले की, हमखास दंड भरावा लागत होता. वाहनधारकांची ही चिंता केंद्र व राज्य शासनाने मिटविली आहे. डिजिटल लॉकरवरील वाहनाची कागदपत्रे व वाहन चालविण्याचा परवाना ग्राह्य धरण्यास केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व महामार्ग मंत्रालयाने परवानगी दिली आहे. यामध्ये पोलिस व उपप्रादेशिक परिवहन विभागाने आता ओरिजनल कागदपत्रांचा आग्रह धरू नये, कागदपत्रे नसल्यास संबंधिताने डिजिटल लॉकरमधील कागदपत्रे दाखविल्यास कागदपत्रे नसल्याबाबतची कारवाई करू नये, असे निर्देश दिले आहेत.

त्यानुसार राज्य परिवहन आयुक्तांनीही याबाबतच्या निर्देशांचे सर्वांनी पालन करावे, असे आदेश काढले आहेत. त्यामुळे वाहनांची कागदपत्रे जवळ बाळगण्याची कटकट व जवळ बाळगल्यावर खराब होण्याची चिंता मिटणार आहे. तसेच ही कागदपत्रे जप्त होण्याची भीतीही राहिलेली नाही. त्यामुळे मोबाईलमधील डिजिटल लॉकरमध्ये कागदपत्रे अपलोड करून वाहनधारकांना संभाव्य कारवाई टाळता येणार आहे.

तपासणीची प्रणालीही यावी
डिजिटल लॉकर कागदपत्रांमुळे वाहनचालकांची सोय झाली आहे. परंतु, या ॲपवर अपलोड केलेली कागदपत्रे तपासण्याची प्रणालीही शासनाने लवकरच सुरू करावी, अशी अपेक्षा असल्याचे वाहतूक मित्र मधुकर शेंबडे यांनी व्यक्त केली.

शंका आल्यास तपासणी करणार
डिजिटल लॉकरवरील वाहनांची कागदपत्रे व वाहन चालविण्याचा परवाना ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे ओरिजनल कागदपत्रे जवळ बाळगण्याची आवश्‍यकता नाही. मात्र, एखाद्या कागदपत्राबाबत शंका आल्यास त्याची आमच्याकडे असलेल्या कागदपत्रांबरोबर तपासणी करण्यात येईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी सांगितले.

...असे मिळवा डिजिटल लॉकर
गुगल प्ले स्टोअरवर DigiLocker असे टाइप केल्यावर हे ॲप दिसते. ते डाउनलोड करायचे. त्यानंतर त्याचा युजरआयडी व पासवर्ड सेट करायचा. युजरआयडी व पासवर्ड दरवेळी टाकण्याचा त्रास वाचविण्यासाठी चार अंकी क्रमांक पिन म्हणून ठेवण्याची सुविधाही या ॲपमध्ये आहे. या ॲपवर आधार क्रमांक लिंक केल्यास विविध कार्यालयांनी दिलेली कागदपत्रे आपल्याला डाउनलोड करता येतात किंवा आपल्याला मिळालेली कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधाही ॲपवर आहे. वाहनाबरोबरच आपली शालेय व अन्य कागदपत्रेही या ॲपवर सुरक्षित ठेवता येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com