पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शेतकरी मित्र व्हावे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

सांगली - जिल्ह्यातील शेतकरी, मजुरांचा आर्थिक कणा म्हणून दुग्धोत्पादनाकडे पाहिले जाते. प्रत्येक पशुवैद्यकीय अधिकारी त्या कुटुंबीयांचा प्रमुख आधार आहे. त्यांनी शेतकऱ्यांचा मित्र म्हणून काम करावे. त्यामुळे केवळ कुटुंबाचे नव्हे तर देशाचा उलाढाल वाढणार आहे, असे प्रतिपादन विविध वक्‍त्यांनी आज येथे केले. 

सांगली - जिल्ह्यातील शेतकरी, मजुरांचा आर्थिक कणा म्हणून दुग्धोत्पादनाकडे पाहिले जाते. प्रत्येक पशुवैद्यकीय अधिकारी त्या कुटुंबीयांचा प्रमुख आधार आहे. त्यांनी शेतकऱ्यांचा मित्र म्हणून काम करावे. त्यामुळे केवळ कुटुंबाचे नव्हे तर देशाचा उलाढाल वाढणार आहे, असे प्रतिपादन विविध वक्‍त्यांनी आज येथे केले. 

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे "ऍसकॅड' अंतर्गत जिल्ह्यातील पशुधन अधिकाऱ्यांची कार्यशाळा झाली. अध्यक्षा स्नेहल पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. कृषी, पशुसंवर्धन सभापती संजीवकुमार सावंत अध्यक्षस्थानी होते. किफायतशीर दुग्ध व्यवसाय, स्वच्छ दुग्धोत्पादन या विषयावर डॉ. श्‍याम लोंढे, डॉ. सुरेंद्र भरमे यांनी मार्गदर्शन केले. 

अध्यक्षा स्नेहल पाटील म्हणाल्या, ""पशुंचे आजार जाणून घेऊन उपचार तुम्ही करता. शेतकरी कुटुंबे त्यांच्या मुक्‍या प्राण्यांवर जीवापाड प्रेम करतात. त्या कुटुंबीयांचा तुम्ही आधार आहात. तुम्ही ठरवले तर त्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य तुम्ही आणू शकता.'' 

सभापती सावंत म्हणाले, ""जिल्ह्यातील शेतकरी चांगले दुग्धोत्पादन घेतोय. भविष्यात गुणवत्तापूर्ण दुधाला मागणी वाढेल. शेतकऱ्यात प्रबोधनाची मुख्य जबाबदारी विभाग अन्‌ पशुवैद्यकीयांची आहे. माडग्याळी शेळीचा प्रकल्प जतला होण्यासाठी पाठपुरावा केला. तो डॉ. सावंत पुढे सुरू ठेवतील.'' अतिरिक्त सीईओ दिलीप पाटील यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामांमुळेच शेतकरी तग धरून असल्याचे स्पष्ट केले. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय सावंत यांनी प्रास्ताविकात विभागातील कामाचा आढावा घेतला. 

बल्क कुलरला प्राधान्य हवे - डॉ. लोंढे 
डॉ. श्‍याम लोंढे म्हणाले, ""दुधाच्या उत्पादनवाढीसह गुणवत्तेत वाढ करावयाची असेल तर "बल्क कुलर'ला दूध संस्थांनी प्राधान्य दिले पाहिजे. यामुळे दूध उत्पादकांना अधिक लाभ होण्याबरोबरच ग्राहकांना देखील उत्तम गुणवत्तेचे दूध व दुग्धजन्य पदार्थ मिळू शकतील. यासाठी गावागावातील सर्व दूध संस्थांनी मान, प्रतिष्ठा बाजूला ठेवून एकत्र येऊन गावात बल्क कुलर बसवून आधुनिक दुग्ध व्यवसायाचा मार्ग स्वीकारावा. त्यामुळे सर्वांचीच प्रगती होईल. सर्व दूध संस्था बल्क कुलरद्वारे दूध संकलित करून उच्चतम गुणवत्तेचे दूध पुरवतील.'' 

Web Title: Veterinary officer, farmers should be friends