...तर हिंदू अल्पसंख्याक होतील - तोगडिया

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

एकीकडे आपण पाकिस्तानबरोबर लढत आहोत; परंतु भिवंडी, मालेगावमधील पाक धार्जिण्या मुस्लिमांवर मात्र कारवाई केली जात नाही. देशाच्या सुरक्षेसाठी अशा देशविघातक मुस्लिमांवरही कारवाई केली पाहिजे. 

पंढरपूर - दिवसेंदिवस भारतातील हिंदूंची संख्या कमी होऊ लागली आहे. अशीच संख्या कमी होत राहिली तर देशात हिंदू अल्पसंख्याक व्हायला वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन विश्‍व हिंदू परिषेदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी केले. 

येथील मृदंगाचार्य (कै.) शंकरराव मंगळवेढेकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. तोगडिया बोलत होते. माजी आमदार सुधाकर परिचारक अध्यक्षस्थानी होते. या वेळी आमदार प्रशांत परिचारक, भागवताचार्य वा. ना. उत्पात, संत तुकाराम महाराजांचे वंशज बाळासाहेब देहूकर, विश्‍व हिंदू परिषदचे एकनाथ शेटे, संजय मुद्राळे, विवेकराव कुलकर्णी, जिल्हा संघचालक माधवराव मिरासदार, मोहन मंगळवेढेकर, धरित्री जोशी व्यासपीठावर उपस्थित होते. (कै.) मंगळवेढेकर यांच्या हिंदुत्व निष्ठ कार्याचा डॉ. तोगडिया यांनी गौरव करून त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमास आपल्याला येता आले याचा विशेष आनंद व्यक्त केला. 

डॉ. तोगडिया म्हणाले, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या पद्धतीने काही देशातील मुस्लिमांना अमेरिकेच्या सुरक्षेसाठी एका आदेशाने प्रवेश बंदी केली. त्या पद्धतीने भारतातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना केल्या पाहिजेत. दुर्दैवाने आपल्या देशात काश्‍मीरसह कुठेच अशी उपाययोजना केली जात नाही. संविधान आणि कायदे बदलून हिंदू युवकांना रोजगार, सुरक्षा, समृद्ध कृषी व्यवस्था देणारी राज्य व्यवस्था स्थापित केली पाहिजे. आपल्या देशाला शत्रू राष्ट्रांनी घेरले आहे. तीन कोटी बांगलादेशी नागरिक आपल्या देशात बेकायदा रहात आहेत. परंतु, त्यांच्यावर आपण कारवाई करत नाही. आपले मित्र कोण, शत्रू कोण याचा विचार करून कठोर पावले उचलली पाहिजेत. 

एकीकडे आपण पाकिस्तानबरोबर लढत आहोत; परंतु भिवंडी, मालेगावमधील पाक धार्जिण्या मुस्लिमांवर मात्र कारवाई केली जात नाही. देशाच्या सुरक्षेसाठी अशा देशविघातक मुस्लिमांवरही कारवाई केली पाहिजे. 

या वेळी डॉ. तोगडिया यांना वीणा व तलवार देऊन सत्कार करण्यात आला. मोहन मंगळवेढेकर यांनी प्रास्ताविक केले. (कै.) मंगळवेढेकर यांच्या जीवन कार्याची माहिती असलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन डॉ. तोगडिया यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या जीवनावर आधारीत संक्षिप्त माहितीपट दाखवण्यात आला. शांताराम कुलकर्णी व डॉ. वर्षा काणे यांनी सूत्रसंचालन केले. हेमंत उत्पात यांनी गायिलेल्या वंदे मातरम्‌ गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. 

"ठाकरे व फडणवीस दोघेही समजदार' 
हिंदू एकत्र आले पाहिजेत असे आपण म्हणता; परंतु मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप व शिवसेना स्वतंत्रपणे लढत आहेत. त्या विषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना डॉ. तोगडिया म्हणाले, दोघे सख्या भावाप्रमाणे आहेत. राजकारणात थोडेफार मतभेद होत असतात. उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस दोघेही समजदार आहेत. त्यामुळे लोक समजून घेतील. केंद्रात आणि राज्यात हिंदुत्वाचा नारा देऊन सत्तेवर आलेली सरकार आहेत. ती आपल्या अपेक्षेप्रमाणे काम करत नाहीत काय? या प्रश्‍नाला उत्तर देताना डॉ. तोगडिया म्हणाले, आज सरकारच्या कामाचे मूल्यांकन करण्याचा आपला विषय नाही. ज्यावेळी करू त्यावेळी त्या विषयी बोलू.

Web Title: VHP leader Pravin Togdia talked about hindu community