बाधीताचा वावर औरंगाबादला, पत्रे ठोकले सांगलीतील अपार्टमेंटला 

जयसिंग कुंभार
Thursday, 30 July 2020

कोरोना आपत्ती नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांचा हेतू समजून घेतला नाही तर ते एक कर्मकांड होते.

सांगली : कोरोना आपत्ती नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांचा हेतू समजून घेतला नाही तर ते एक कर्मकांड होते. सध्या महापालिका क्षेत्रात कोरोना बाधीत रुग्णाच्या घराला पत्रे ठोकून बंदिस्त करणे या कर्मकांडाचा असाच अतिरेक होतो आहे. कधी कधी हे रोग रेड्याला आणि उपचार पखालीला या म्हणीप्रमाणे होतेय. त्याचा हा किस्सा. 

औरंगाबाद येथे कार्यरत औषध प्रतिनिधी कोविड बाधीत म्हणून जाहीर झाले. त्यांच्या पत्नी विश्रामबागमधील आपल्या माहेरी राहतात. मात्र त्यांचा टपाली पत्ता विश्रामबागमधील राजमती अपार्टमेंटचा. आठ दिवसापुर्वी ते मिरजेतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. त्यावेळी केस पेपरला राजमती अपार्टमेंटचा टपाली पत्ता त्यांनी नमूद केला होता.

कोरोना बाधेनंतर रुग्णालयाने महापालिकेच्या यंत्रणेला त्यांचा तो पत्ता कळवला. त्यानंतर आरोग्य किंवा स्वच्छता यंत्रणेच्या आधी पत्रे ठेकेदाराने तत्काळ त्या पत्त्यावर म्हणजे राजमती अपार्टमेंटकडे लवाजम्यासह धाव घेतली. तेव्हा अपार्टमेंटमधील रहिवाशांना आपले शेजारी कोरोना बाधीत असल्याचे समजले. रहिवाशांनी ते रुग्ण किंवा त्यांचे कुटुंबिय सध्या इकडे राहत नसल्याचे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अपार्टमेंटचे सीसीटीव्ही फुटेज दाखवण्याचीही त्यांनी तयारी दर्शवली. मात्र पत्रे ठेकेदार हुकमाचे अंमलदार. त्यांनी पत्रे ठोकले. या पत्र्यांमधून अलगद इकडे तिकडे जाता येईल अशी विनंतीही त्यांनी केली. एक कोरोना कर्मकांड पार पडले. 

"" संबंधित रुग्ण इकडे फिरकत नाहीत ही वस्तुस्थिती अधिकाऱ्यांनी मान्य केली नाही; असो आता कोविड प्रतिबंधित क्षेत्र म्हणून पत्रे ठोकले त्याप्रमाणे आता अपार्टमेंट परिसरात स्वच्छता, निर्जंतुकरण, औषध फवारणीची जबाबदारी महापालिकेची नाही का?'' 
रमेश आरवाडे, रहिवासी राजमती अपार्टमेंट 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Victim shifted to Aurangabad and letters were sent Sangli