कॉंग्रेसमध्ये बंडखोरी; मानेंचे माघारी नाट्य

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

सांगली - कॉंग्रेस बंडखोर शेखर माने यांच्या माघारी नाट्याने सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीतील आज माघारीचा अखेरचा दिवस चांगलाच रंगला. माने राजी झाले मात्र ते वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात पोचले नसल्याने त्यांचा अर्ज राहिला. त्यांनी माघार घेतली आहे असा दावा कॉंग्रेसजन आणि त्यांचे नेते विशाल पाटील यांनी केला असला, तरी माने यांनी आपले पत्ते गुलदस्त्यात ठेवलेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर गोरे व कॉंग्रेसचे उमेदवार मोहनराव कदम यांच्यातील या काट्याच्या लढाईत मानेंच्या नाट्यामुळे कॉंग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.

सांगली - कॉंग्रेस बंडखोर शेखर माने यांच्या माघारी नाट्याने सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीतील आज माघारीचा अखेरचा दिवस चांगलाच रंगला. माने राजी झाले मात्र ते वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात पोचले नसल्याने त्यांचा अर्ज राहिला. त्यांनी माघार घेतली आहे असा दावा कॉंग्रेसजन आणि त्यांचे नेते विशाल पाटील यांनी केला असला, तरी माने यांनी आपले पत्ते गुलदस्त्यात ठेवलेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर गोरे व कॉंग्रेसचे उमेदवार मोहनराव कदम यांच्यातील या काट्याच्या लढाईत मानेंच्या नाट्यामुळे कॉंग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.

आज माघारीच्या अखेरच्या दिवस होता. माने यांच्याबरोबरच भाजपचे युवराज बावडेकर यांच्या अर्जाकडे सर्वांचे लक्ष होते. बावडेकर यांचा अर्ज मागे घ्यायचा निर्णय भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ व जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी जाहीर केला. त्यानुसार दुपारी साडेबाराच्या सुमारास बावडेकर यांनी माघार घेतली. माने यांच्या माघारीबाबत उलटसुटल चर्चा सुरू होत्या. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे दूत म्हणून माजी मंत्री सतेज पाटील यांनी सांगलीत वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्याशी खलबते केली. काल सायंकाळपर्यंत हे सत्र सुरूच होते. रात्री उशिरा चव्हाण यांच्या वतीने कऱ्हाडचे आमदार आनंदराव पाटील व कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी कारखान्यावर चर्चेला सुरवात केली. काही एक मुद्द्यावर एकमत झाल्यानंतर सर्व जण सांगलीतील पतंगराव कदम यांच्या बंगल्यावर आले. तेथे विशाल पाटील यांनी माघारीचा निर्णय जाहीर केला.

दरम्यान, श्री. माने अर्ज माघारीसाठी परस्पर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. बरोबर तीन वाजून आठ मिनिटांनी ते कार्यालयात पोचले. मात्र, माघारीची मुदत संपल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी शेखर गायकवाड यांनी जाहीर केले. माने यांच्या पाठोपाठ आनंदराव पाटील व पृथ्वीराज पाटील हेही जिल्हाधिकारी कार्यालयात आले. बराच वेळ ते निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात बसून होते. मात्र, माने यांचा अर्ज राहिला तो राहिलाच.

या वेळी उपस्थित पत्रकारांनी माने यांना माघारीबाबत विचारलेल्या प्रश्‍नांबाबत माने यांनी मौन बाळगले. समर्थक मतदारांशी चर्चा करतो, असे सांगत त्यांनी काढता पाय घेतला. त्यांच्या या भूमिकेने माने हे लढणार, की कदमांना पाठिंबा जाहीर करणार, याबाबतचा संभ्रम कायम राहिला आहे.

निवडणुकीत चौघे जण रिंगणात
या निवडणुकीच्या रिंगणात शेखर गोरे (राष्ट्रवादी), मोहनराव श्रीपतराव कदम (कॉंग्रेस), शेखर माने (अपक्ष), मोहनराव गुलाबराव कदम (अपक्ष) असे चौघे रिंगणात असतील. मतदारांना पसंतीक्रम नोंदवून मत द्यायचे आहे. मतदारांपर्यंत पोचून आपल्यालाच प्रथम पसंतीचे मत मिळावे, यासाठी जसे प्रयत्न होतील, तसेच पुढची पसंती मिळावी, यासाठी सर्वांचे प्रयत्न असतील.

कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. मात्र, पक्षाविरोधात आम्ही कोणतेही पाऊल उचलणार नाही. माने यांचा अर्ज तांत्रिक कारणास्तव अर्ज राहिला आहे. आम्ही पूर्ण ताकदीने कॉंग्रेस उमेदवारांच्या पाठीशी राहू.
- विशाल पाटील, अध्यक्ष, वसंतदादा साखर कारखाना, सांगली

नेत्यांच्या विनंतीला मान देऊन मी माघारीचा निर्णय घेतला होता. मात्र, कुणाच्या तरी दुर्दैवाने माझा अर्ज वेळेत न पोचल्याने राहिला आहे. त्यामुळे आता पुढचा निर्णय काय असावा याचा निर्णय मी मला बळ दिलेल्या मतदारांशी चर्चा करून घेणार आहे.
- शेखर माने, अपक्ष उमेदवार

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी थेट झालेल्या चर्चेनुसार शेखर माने माघारीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकीत
कॉंग्रेस एकसंधपणे लढेल.
- पृथ्वीराज पाटील, शहर जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस

Web Title: vidhan parisha election sangli