साताऱ्यात राष्ट्रवादीला घरभेद्यांचा फटका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

निष्ठावंतांना डावलल्याचाही परिणाम, डॉ. पतंगरावांचे संबंध पथ्यावर

निष्ठावंतांना डावलल्याचाही परिणाम, डॉ. पतंगरावांचे संबंध पथ्यावर
सातारा - बालेकिल्ल्यातच पक्षाची मते फुटल्याने सांगली- सातारा विधान परिषद मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार उदयनराजे भोसलेंची साथ घेत कॉंग्रेसने "राष्ट्रवादी'ची "शिट्टी' वाजविली. पक्षातील निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवाराला आमदार करण्याचा राष्ट्रवादीतील काही नेत्यांचा डाव त्यांच्याच मतदारांनी धुळीला मिळविला, तर माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे वैयक्तिक संबंध मोहनरावांच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडून गेले. पक्षनिष्ठा, पक्षाचे नेते व त्यांच्या प्रतिष्ठेपेक्षाही अवांतर बाबीला महत्त्व देण्याकडे मतदारांचा कल राहिल्याचेही निकालाने सिद्ध केले आहे.

ही निवडणूक दोन्ही कॉंग्रेससाठी प्रतिष्ठेची होती. उमेदवारी देताना झालेली "राष्ट्रवादी'ची चूक निकालानंतर नेत्यांच्या डोक्‍यात शिरली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या निवडणुकीसाठी सुरवातीलाच स्वबळाचा निर्णय घेतला. तो मोहनराव कदमांच्या उमेदवारीमुळे कॉंग्रेसच्या पथ्यावर पडला. राष्ट्रवादीची सांगली व साताऱ्यातील एकूण मते जास्त होती. त्यामुळे शेवटपर्यंत राष्ट्रवादीच्या बाजूनेच सर्वांचा अंदाज राहिला. प्रत्यक्षात कॉंग्रेसने त्यांचे उमेदवार मोहनराव कदम यांचा उमेदवारी अर्ज लवकर भरून मतदारांना टोकण देऊन अडकवून ठेवले. राष्ट्रवादीने आयात उमेदवार दिल्याचा राग सर्वच निष्ठावंतांना होता; पण ही खदखद उघडपणे बाहेर आली नाही. मतदानातून त्या भावना व्यक्त झाल्या. त्यासाठी कॉंग्रेसकडून मतदारांना मोठे पाठबळ मिळाले. मते फुटू नयेत म्हणून राष्ट्रवादीकडून "टूर'चे आयोजन झाले; परंतु काही मतदारांनी "राष्ट्रवादी'च्याच मागे "टुरटुर' लावली. राष्ट्रवादीकडे सातारा जिल्ह्यात तब्बल 192 इतकी जास्त मते असल्याने ही मते बेरजेत धरून राष्ट्रवादी पुढे चालली. हा गाफीलपणा नडला. पुढे उदयनराजे गट, राजेंद्र यादव, कऱ्हाडच्या नगरसेवकांची मते कॉंग्रेसकडे जाण्याच्या अंदाजामुळे जिल्ह्यात हाच आकडा 161 वर आला. "राष्ट्रवादी'ची फुटलेल्या मतात खासदार उदयनराजे भोसले यांचा सिंहाचा वाटा आहे. "राष्ट्रवादी'तील जबाबदारांनी कदम गटावर "रहिम' केल्याने कॉंग्रेसकडे मतांचा "पूर' गेला, तर काहींनी राष्ट्रवादीला "खंडाळ्या'चा घाटच दाखविला. कऱ्हाडमध्ये तर कॉंग्रेसशी "प्रीतिसंगम' झाला.

शेखर गोरे हे आयात उमेदवार असल्याने आमदारही नाराज होते. त्याची परिणिती "राष्ट्रवादी'ची "पलटण' कॉंग्रेसबरोबर राहिली. पतंगराव कदम, मोहनराव कदम यांचे संबंध, ऋणानुबंध जिल्ह्यातील आमदार, मतदारांशी आहेत. त्याचाही थेट फायदा कदम गटाला झाला. शिवाय, "राष्ट्रवादी'वर नाराज असलेले माजी आमदार विलासराव पाटील उंडाळकर, आमदार शंभूराज देसाई, मोहिते गटाची मदतही कदमांना झाली. लक्ष्मी कऱ्हाडकर, डी. एम. बावळेकर यांनीही कदमांचा हात पकडला. राष्ट्रवादीतच घरभेदी निघाल्याने शेखर गोरेंची धुळदाण झाली. या पराभवामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटविण्याआधीच त्यांची पक्षातील कारकिर्दीला धक्‍का बसला. यातून सावरून ते पक्षातच कार्यरत राहणार, की पुन्हा दुसऱ्या पक्षात जाणार याचे उत्तर काळाच्या पोटात दडले आहे.

पराभवाचे धनी कोण होणार?
शेखर गोरेंच्या पराभवाचे खापर एकमेकांवर फोडण्याचे काम आता सांगली व साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सुरू आहे. आमची 192 मते असून, संशयित मते वजा जाता 161 मते आमच्या उमेदवाराला मिळाली असल्याचा दावा साताऱ्यातील नेते करत आहेत, तर दुसरीकडे सांगलीतील पक्षाची सर्वच्या सर्व मते गोरेंच्या पारड्यात पडल्याचे सांगत साताऱ्यातच मते फुटल्याचा आरोप जयंत पाटील करत असल्याने पराभवाचे खापर एकमेकांवर फोडण्याचे राजकारण सध्या राष्ट्रवादीत सुरू झाले आहे.

Web Title: vidhan parishad election result