सांगली व्हाया महाबळेश्‍वर-कोल्हापूर

सांगली व्हाया महाबळेश्‍वर-कोल्हापूर

सांगली - सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची खलबते सांगलीबाहेरच रंगली. राष्ट्रवादीचे सदस्य महाबळेश्‍वरात, कॉंग्रेसचे कोल्हापुरातील हॉटेल सयाजीवर, तर बंडखोर शेखर माने गटाचे सदस्य कोल्हापुरात अयोध्या हॉटेलवर होते. आज सकाळपासून दुपारी अडीचपर्यंत हे सर्व मतदार वाहनांच्या ताफ्यांनी सांगलीत दाखल झाले. या सर्व मतदारांची लाइन लावून देण्यात जिल्हा, राज्य व दिल्लीपर्यंतच्या नेत्यांना रात्रीचा दिवस करावा लागला.

गेल्या आठवडाभरापासून जिल्हाभरातील मतदारांना "खूश' करून सहलींवर पाठवले होते. कॉंग्रेसची सहल पणजी-गोव्याला होती, तर राष्ट्रवादीची हैदराबादला होती. काल या सहलींची सांगता होऊन सर्व जण सांगलीच्या दिशेने निघाले होते. राष्ट्रवादीची यंत्रणा काल सकाळपासून गतिमान झाली.

दोन्ही जिल्ह्यांतील तब्बल 280 मतदारांना महाबळेश्‍वरमध्ये पाचारण करण्यात आले. तेथील ड्रिमलॅंड हॉटेलवर काल दुपारी अडीचपासून खलबते सुरू होती. दस्तुरखुद्द माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार शशिकांत शिंदे, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर अशी राष्ट्रवादी नेत्यांची फौज दाखल होती. सायंकाळी चारच्या सुमारास जयंत पाटीलही महाबळेश्‍वरमध्ये दाखल झाले. राष्ट्रवादीत निर्माण झालेले संभ्रमाचे वातावरण निवळण्यासाठी श्री. पवार यांनी नेहमीच्या शैलीत या निवडणुकीत शेखर गोरे नव्हे, तर अजित पवार उभे आहेत, याची जाणीव करून दिली. दहा-दहा मतदारांचे गट... त्यावर निरीक्षक म्हणून प्रमुख मतदार आणि कार्यकर्ता... अशी सर्व व्यूहरचना तिथे झाली. मतपत्रिकेवर पसंती क्रमांक एकच नोंदवायचा आणि तो संख्येत कुणी नोंदवायचा आणि रोमन लिपीत कोणी नोंदवायचा, याची योग्य भाषेत समज देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत हा खेळ सुरू होता. आज सकाळी सांगली जिल्ह्यातील मतदार महाबळेश्‍वरमधून निघाले. वाटेत इस्लामपूरमध्ये चहापाणी झाल्यानंतर ते सांगलीत राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात दाखल झाले. आमदार सुमन पाटील उपस्थित होत्या. सकाळपासून प्रत्येकी पाच-पाचच्या गटाने राष्ट्रवादीचे मतदार जिल्हाधिकारी कार्यालयात मतदानासाठी येत होते. हा सिलसिला सायंकाळी चारपर्यंत सुरूच होता.

कॉंग्रेसचे मतदार कालपासूनच कोल्हापूरमध्ये दाखल झाले होते. हॉटेल सयाजीवर त्यांचा ठिय्या होता, तर तिथून जवळच अयोध्या हॉटेलवर कॉंग्रेस बंडखोर शेखर माने गटाच्या सदस्यांचा ठिय्या होता. त्याचवेळी सांगलीत मानेंच्या सदस्यांना वश करण्यासाठी कदम गटातील दिग्गज नेत्यांची सांगलीपासून मुंबई-दिल्लीपर्यंत यंत्रणा कार्यरत होती. या प्रयत्नांना यश येणार, असाच कयास कॉंग्रेसच्या गोटात होता. रात्री उशिरा विश्‍वजित कदम, गौतम पवार, विशाल पाटील, शेखर माने यांच्यात खलबते झाली; मात्र त्या चर्चेत निवडणुकीचे मुद्देच उरले नव्हते. स्वाभिमानी आघाडीच्या सदस्यांबरोबरच विश्‍वजित यांनी स्वतंत्रपणे खलबते केली. सकाळी त्यांनी माजी आमदार संभाजी पवार यांचीही भेट घेतली. त्या भेटीचे फलीत म्हणून दुपारी स्वाभिमानी आघाडीचे दहा सदस्य श्री. कदम यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयात मतदानासाठी आले.

  • कॉंग्रेस व काही राष्ट्रवादीच्या 32 नगरसेवकांचे मोहनरावांसोबत शक्तिप्रदर्शन
  • राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शक्तिप्रदर्शन टाळले; त्यांचे निवडक लोकच उपस्थित
  • राष्ट्रवादीच्या काही मतदारांना पसंती क्रमांक इंग्रजी, मराठी, रोमन संख्येत नोंदवण्याच्या सूचना
  • प्रतीक-विशाल पाटील बंधूंनी मतदान प्रक्रियेपासून अलिप्त राहणेच केले पसंत
  • उपमहापौरांसह नऊ नगरसेवकांसह शेखर माने यांचे मतदान केंद्रावर आगमन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com