युती झाल्यास सेनेला अच्छे दिन

निवास चौगले
रविवार, 6 मे 2018

विनय कोरेंचा प्रश्‍न मोठा
सद्य:स्थितीत १० पैकी शिवसेनेचे ६, भाजपचे २, तर राष्ट्रवादीचे २ आमदार आहेत. युती झाली, तर सध्या असलेल्या सहाही जागांवर शिवसेनेकडूनच हक्क सांगितला जाईल आणि त्याला भाजपलाही समर्थन द्यावे लागेल. शाहूवाडीत माजी मंत्री विनय कोरे भाजपसोबत असल्याने त्यांचे काय करायचे, हा प्रश्‍न अाहे.

कोल्हापूर - विधान परिषदेच्या सहा जागांसाठी शिवसेना-भारतीय जनता पार्टीची छुपी का असेना युती झाली. येणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीतही नाही-नाही म्हणत ही युती होण्याचे संकेत मिळत आहेत. ही युती झालीच, तर कोल्हापूर जिल्ह्यात सेनेलाच ‘अच्छे दिन’ येतील. याउलट विधानसभेची उमेदवारी देतो म्हणून पक्षात घेतलेल्यांची बंडखोरी रोखण्याचे आवाहन भाजपसमोर असेल. 

चार वर्षांतील देशभरातील पोटनिवडणुकीत भाजपविरोधात लागलेला निकाल पाहता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप-सेना युती अपरिहार्य आहे. त्याची सुरुवात विधान परिषद निवडणुकीपासून सुरुवात झाली.

राधानगरी, कागलात बंडखोरी
राधानगरीत काँग्रेसचे माजी आमदार बजरंग देसाई यांचे पुत्र राहुल हे भाजपत आहेत, त्यांना विधानसभेच्या उमेदवारीचा ‘शब्द’ दिल्याचे समजते. याच मतदारसंघातील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील हेही मध्यंतरी भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. दोन्ही काँग्रेसच्या आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे, राष्ट्रवादीकडून के. पी. पाटील हेच उमेदवार असतील. विद्यमान आमदार शिवसेनेचे प्रकाश आबिटकर असल्याने भाजपला ही जागा सोडावी लागेल त्यातून राहुल देसाई व ए. वाय. यांच्यापैकी एकाची बंडखोरी निश्‍चित आहे. कागलमध्ये पक्षापेक्षा एकास एक उमेदवार देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, त्यातून ‘म्हाडा’चे समरजितसिंह घाटगे यांना उमेदवारी दिली, तर माजी आमदार संजय घाटगे यांची बंडखोरी निश्‍चित आहे, या दोघांपैकी कोणालाही एकाला उमेदवारी दिली, तर एकाचे बंड अटळ आहे. शिरोळमध्येही अशीच स्थिती आहे. सेनेला जागा दिली, तर अनिल यादव बंडखोरी करणार हे नक्की आहे.

काही ठिकाणी उमेदवारांचा शोध 
करवीर, कोल्हापूर उत्तर, हातकणंगले मतदारसंघात भाजपला प्रबळ उमेदवार शोधावा लागेल. इचलकरंजी व कोल्हापूर दक्षिण हे सध्या भाजपकडे आहेत. युती झाली तर सेनेच्या मदतीमुळे इचलकरंजीत फारशी अडचण भाजपला नाही; पण दक्षिणेत मात्र सेनेची ताकदही प्रभावी नसल्याने व विरोधी आमदार सतेज पाटील यांनी पुन्हा रणशिंग फुंकून संपर्क सुरू केल्याने भाजपसमोर आव्हान असेल. चंदगडमध्ये कुपेकर विरुद्ध कुपेकर असाच संघर्ष आहे. मध्यंतरी राष्ट्रवादीच्या आमदार संध्यादेवी कुपेकर भाजपत जातील, अशी चर्चा होती, ती थांबली आणि आता त्यांच्या कन्या नंदिती बाभूळकर भाजपच्या उमेदवारच असतील, अशी चर्चा आहे. 

लोकसभेत महाडिकांचा मार्ग खडतर 
जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. हातकणंगलेतून सद्य:स्थितीत खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात भाजपकडे अद्याप प्रबळ उमेदवार नाही. 

दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीची मदत श्री. शेट्टी यांनाच मिळणार असल्याने व श्री. शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या मनात स्वतःची अशी वेगळी ‘इमेज’ तयार केली आहे. कोल्हापुरात मात्र राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांचा मार्ग खडतर असेल. युती झाली, तर प्रा. संजय मंडलिक उमेदवार असतील 
आणि युतीची ताकद त्यांच्या मागे असेल. दुसरीकडे राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ श्री. महाडिक यांना मदत करतील का? हा प्रश्‍न आहे.

Web Title: vidhan parishad election Yuti Shivsena BJP politics