Vidhan Sabha 2019 : सांगलीत आठ मतदारसंघात तब्बल 125 उमेदवारांचे अर्ज 

Vidhan Sabha 2019 : सांगलीत आठ मतदारसंघात तब्बल 125 उमेदवारांचे अर्ज 

सांगली - जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात तब्बल 125 उमेदवारानी 165 अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व मतदार संघातून मोठ्या प्रमाणावर म्हणजे 82 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यात काही प्रमुख उमेदवारांसह त्यांचे पर्यायी अर्जांचाही त्यात समावेश आहे.

उद्या (ता. 5) सकाळी अकरा वाजता सबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्जाची छाननी सुरु होईल. संपूर्ण अर्जाची छाननी झाल्यानंतर ही प्रक्रीया थांबेल. उमेदवारी अर्ज माघारीसाठी केवळ सोमवारची एकमेव दिवस असणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्तिप्रदर्शन करण्यात आले. 
भाजपकडून आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार विलासराव जगताप, राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार सुमन पाटील, मानसिंगराव नाईक, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम, विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील, शिवसेनेकडून आमदार अनिल बाबर, माजी मंत्री अजितराव घोरपडे, गौरव नायकवडी आणि संजय विभुते याशिवाय खानापूर - आटपाडीसाठी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. दिग्गजांनी अर्ज दाखल केल्याने निवडणूकीत चुरस होणार आहे. 

विधानसभेसाठी पहिल्या तीन दिवसात उमेदवारी अर्ज भरण्यास धावपळ दिसली नाही. शेवटच्या दोन दिवसात अर्ज दाखलसाठी राजकीय पक्षांच्या उमेदवारांची धांदल उडाली. जिल्हाधिकारी कार्यालयासह संबधित तहसिल कार्यालय परिसराला उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी शक्तीप्रदर्शन केल्याने जत्रेचं स्वरूप आले. वाजत-गाजत आणि फटाक्‍याची अतिषबाजी आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला.

पलूस - कडेगावमधून कॉंग्रेसचे आमदार विश्वजीत कदम, तासगाव-कवठेमहांकाळमधून शिवसेनेकडून अजितराव घोरपडे, जतमधून अपक्ष डॉ. रविंद्र आरळी यांनी शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल केला. सांगलीतून भाजपमधून बंडखोरी करीत झेडपी सदस्य शिवाजी डोंगरे यांनी अर्ज भरला. शिराळ्यातून झेडपीचे माजी सदस्य सम्राट महाडिक यांनी अर्ज दाखल केला. 

आठ मतदारसंघातून शेवटच्या दिवशी 82 उमेदवारी अर्ज दाखल झाले. आजअखेर 125 जणांचा समावेश आहे. मिरज व पलूस-कडेगामधून प्रत्येकी सर्वाधिक 20 जणांनी अर्ज दाखल केले. सांगली विधानसभेसाठी 15, इस्लामपूर- 12, शिराळा-13, पलूस-कडेगाव 20, खानापूर-आटपाडी 18, तासगाव-कवठेमहांकाळ 10 आणि जतमधून 17 अर्ज दाखल झाले. सोमवारी (ता. 7) माघारीची मुदत असून त्या दिवशी अंतिम चित्र स्पष्ट होईल. 

जिल्ह्यात भाजप सांगली, मिरज, शिराळा आणि जत चार विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. याठिकाणी विद्यमान आमदारांनाच भाजपकडून उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे इस्लामपूर, शिराळा आणि तासगाव-कवठेमहांकाळ तर काँग्रेसने पलूस - कडेगाव, जत आणि सांगली याठिकाणी उमेदवार उभे केले आहेत.

विद्यमान आमदारांपुढे दिग्गजांनी आव्हान निर्माण केल्याने निवडणूक रंगतदार होण्याची शक्‍यता आहे. सांगली विधानसभेसाठी आमदार सुधीर गाडगीळ सलग दुसऱ्यांदा नशीब आजमावताहेत. कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचे आव्हान असेल. मिरजेतून सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे सलग तिसऱ्यांदा लढणार असून हॅटट्रिकच्या तयारीत आहेत. कॉंग्रेसच्या वाट्याला असलेली जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडल्याने येथून माजी नगरसेविका देवमाने लढत आहेत. 

इस्लामपूमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना शिवसेनेचे गौरव नायकवडी यांचे आव्हान असून भाजपचे निशिकांत पाटील यांनी बंडखोरी केल्याने तिरंगी लढतीची चिन्हे आहेत. बहुजन वंचितकडून एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शाकीर तांबोळी निवडणुकीच्या मैदानात आहेत. शिराळ्यातून भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्यात काट्याची लढत होईल. गत निवडणुकीत कॉंग्रेसकडून लढलेले प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी भाजपचे कमळ हातात घेतले आहे, त्यामुळे आमदार नाईक यांना देशमुखांचे बळ मिळणार आहे. 

पलूस - कडेगावमध्ये कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कदम आणि शिवसेनेचे संजय विभुते यांच्यात लढत आहे. आमदार कदम व भाजपचे संग्रामसिंह देशमुखांत चुरशीच्या लढत अपेक्षीत होती. जागावाटपात ती सेनेकडे गेल्याने देशमुखांनी माघारीचा निर्णय घेतला. खानापूर-आटपाडीमध्ये विद्यमान सेनेचे आमदार बाबर यांच्याविरोधात सर्वपक्षीय उमेदवार माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्यात पारंपारीत लढत आहे. तासगाव-कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील आणि जागा शिवसेनेला मिळाल्याने माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी सेनेकडून अर्ज दाखल झाला. जतमधून भाजपचे आमदार जगताप, कॉंग्रेसचे विक्रम सावंत आणि सर्वपक्षीय उमेदवार डॉ. रविंद्र आरळी यांच्यात तिरंगी लढतीची चिन्हे आहेत. आमदार जगताप यांना पक्षांतर्गत बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com