Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्रीपदाबाबत आदित्य ठाकरे म्हणाले,...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

सर्वसामान्यांचा आवाज विधानसभेपर्यंत पोहचवण्यासह बेरोजगारी मुक्त, कर्जमुक्त, दुष्काळमुक्त, प्रदुषणमुक्त नवा महाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न आहे. माझी लढाई ही मुख्यमंत्रीपदासाठी अथवा स्वार्थासाठी नाही. 

- आदित्य ठाकरे

गडहिंग्लज - माझी लढाई ही मुख्यमंत्रीपदासाठी अथवा स्वार्थासाठी नाही. मुख्यमंत्रीपदाची मुळीच इच्छा नसून केवळ सेवेसाठीच विधानभवनात पोहचण्याची लढाई आहे, असे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

महायुतीचे कागलचे उमेदवार संजय घाटगे व चंदगडचे उमेदवार संग्राम कुपेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी श्री. ठाकरे यांच्या हस्ते प्रचाराचा प्रारंभ केला.

सर्वसामान्यांचा आवाज विधानसभेपर्यंत पोहचवण्यासह बेरोजगारी मुक्त, कर्जमुक्त, दुष्काळमुक्त, प्रदुषणमुक्त नवा महाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न आहे. 

- आदित्य ठाकरे

खासदार संजय मंडलिक, श्री. घाटगे, श्री. कुपेकर, अंबरीश घाटगे, संजय पवार, विजय देवणे, उत्तम कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. म. दुं. श्रेष्ठी विद्यालयाच्या मैदानावर हा मेळावा झाला. 

श्री. ठाकरे म्हणाले, ""पंधरा वर्षात आघाडीने राज्याला मागे नेले आहे. पाच वर्षात महायुती सरकारने विविध क्षेत्रात दमदार कामगिरी केली. सत्ता असो किंवा नसो शिवसेना नेहमी लोकांच्या सेवेत राहिली आहे. पाच वर्षे शिवसेना सत्तेत होती. परंतु, सरकारची चूक दाखवण्यासह जनतेच्या अन्यायाविरूद्ध रस्त्यावर उतरण्यासही मागेपुढे पाहिले नाही.'' 

समरजित घाटगे याचे नाव न घेता टोला

कागल मतदारसंघाच्या विकासासाठी मंत्री चंद्रकांत पाटील व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्या पाठीशी असल्याचे काहीजण सांगत आहेत. पाटील व फडणवीस हे पक्षनिष्ठा पाळणारे नेते आहेत. यामुळे त्यांच्या नावाने त्यांनी  मते मागू नयेत. काही तरी अफवा पसरवून जनतेची दिशाभूल करू नये. 

- आदित्य ठाकरे

खासदार मंडलिक म्हणाले, ""शिवसेना शब्द पाळणारा पक्ष आहे. कधीच हा पक्ष विश्‍वासघात करीत नाही. कागलमधील सर्वच उमेदवारांनी सदाशिवराव मंडलिक यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले. उशिरा का होईना सर्वांना उपरती झाली याचा आनंद आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेच्या उमेदवारांना लाखोंच्या मतांनी विजयी करा.'' 

श्री. कुपेकर, श्री. घाटगे यांनीही चंदगड व कागल मतदारसंघाच्या विकासासाठी आणि प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी विजयाचे आवाहन केले. यावेळी गडहिंग्लज, कागल, चंदगड व आजरा तालुक्‍यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुकाप्रमुख दिलीप माने यांनी सूत्रसंचालन केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Aditya Thackeray comment