Vidhan Sabha 2019 : भाजपची कोल्हापूर उत्तरमध्ये बंडखोरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर - आमदार राजेश क्षीरसागर यांनी दहा वर्षांत कधीच भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेतले नाही. नगरसेवकांना निधी दिला नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर वाटेल ते आरोप केले. महापालिकेच्या राजकारणात भाजपविरोधी भूमिका घेतली.

कोल्हापूर - आमदार राजेश क्षीरसागर यांनी दहा वर्षांत कधीच भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेतले नाही. नगरसेवकांना निधी दिला नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर वाटेल ते आरोप केले. महापालिकेच्या राजकारणात भाजपविरोधी भूमिका घेतली. अशा क्षीरसागरांचा प्रचार काही झाले तरी करणार नाही. त्यामुळे आम्हाला वेगळा मतदारसंघ द्या, तेथे आम्ही प्रचाराला जातो, अशी भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी घेतली. 

पक्ष कार्यालयात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक यांची बैठक झाली. या वेळी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांची ही बंडखोरी रोखण्याचे आव्हान आता असणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यापाठोपाठ भाजपमध्येही युतीवरून कुरबुरी सुरू आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले होते. त्यावेळी राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी निवडणूक लढवली.

या निवडणुकीपासून क्षीरसागर आणि भाजपमधील अंतर वाढत गेले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती झाल्याने शिवसेनेचे आमदार क्षीरसागर तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. या वेळी मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी आज पक्षाच्या कार्यालयात बैठक झाली. महेश जाधव अध्यक्षस्थानी होते. कार्यकर्त्यांनी उद्विग्नतेतून भूमिका मांडल्या.

आमदार क्षीरसागर यांनी त्यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात कधीही भाजपच्या कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेतले नाही. ते कधी पक्षाच्या कार्यालयातही आले नाहीत. पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रत्येक वेळी त्यांनी डावलले. महापालिकेत भाजपच्या विरोधात भूमिका घेतली. शिवसेनेचे नगरसेवकही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तालावर नाचत असतात. क्षीरसागर यांनी पालकमंत्री पाटील यांच्यावर खोटे आणि बेछूट आरोप केले.

या वेळी त्यांनी मंत्री पाटील यांनी त्यांना केलेल्या मदतीचे भानही त्यांनी ठेवले नाही. त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांना त्यांच्याविषयी आत्मीयता वाटत नाही. म्हणूनच आम्ही क्षीरसागर यांचा प्रचार करणार नाही. पक्षाने आम्हाला दुसऱ्या मतदारसंघात पाठवावे. तेथे आम्ही प्रचाराचे काम करू, असे कार्यकर्त्यांनी सांगितले. महेश जाधव यांनी तुमच्या सर्वांच्या भावना प्रदेशाध्यक्षांपर्यंत पोचवू. ते जो निर्णय देतील त्याप्रमाणे काम करूया, असे सांगितले. 

बैठकीला नगरसेवक अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील, अशोक देसाई, विजय जाधव, हेमंत आराध्ये, हर्षद कुंभोजकर, गणेश देसाई यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

खासदार मंडलिकांची भूमिका अयोग्य 
या वेळी एक पदाधिकारी म्हणाला, की लोकसभा निवडणूक झाल्यानंतर दहा दिवस होत नाहीत तोपर्यंत खासदार संजय मंडसिक यांनी मुश्रीफ हे मोदींपेक्षा काकणभर सरस असल्याचे विधान केले. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळेच ते निवडून आले. पण, दक्षिण विधानसभा मतदारसंघात ते भाजपच्या विरोधात काम करणार आहेत. प्रा. मंडलिकांची ही भूमिका योग्य नाही. पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांना याबाबत विचारले पाहिजे. 

कार्यकर्त्यांचा राग शिवसेनेवर नाही तर व्यक्तीवर आहे. मात्र, राज्यात युतीचे सरकार येण्यासाठी प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांचा राग शांत केला जाईल. कोणत्याही परिस्थितीत भाजप युती धर्माचे पालन करणारच. 
- राहुल चिकोडे,
जिल्हाध्यक्ष, भाजप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 BJP Rebellion in Kolhapur Uttar