Vidhan Sabha 2019 : सांगली जिल्ह्यात भाजपच्या तिघांचे बंड 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

सांगली - भाजपला जिल्ह्यातील बंडखोरी रोखण्यात अपयश आले असून शिराळा, जत, इस्लामपूर विधानसभा मतदार संघात बंडखोरी झाली आहे. सांगली मतदार संघातून जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे यांनी अर्ज मागे घेतल्याने एकमेव बंडोबा थंड झाले. आता शिराळा आणि जत मतदार संघातील बंडखोरीने भाजप उमेदवारांचे टेन्शन वाढवले आहे. 

सांगली - भाजपला जिल्ह्यातील बंडखोरी रोखण्यात अपयश आले असून शिराळा, जत, इस्लामपूर विधानसभा मतदार संघात बंडखोरी झाली आहे. सांगली मतदार संघातून जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे यांनी अर्ज मागे घेतल्याने एकमेव बंडोबा थंड झाले. आता शिराळा आणि जत मतदार संघातील बंडखोरीने भाजप उमेदवारांचे टेन्शन वाढवले आहे. 

जतमध्ये डाॅ. रवींद्र आरळी यांचे बंड

सर्वाधिक चुरशीच्या जत विधानसभा मतदार संघात डॉ. रवींद्र आरळी यांनी बंड केले आहे. ते स्थानिक विकास आघाडीचे उमेदवार म्हणून लढतील. आमदार विलासराव जगताप यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या गटाचे ते उमेदवार झाले आहेत. जातीय समीकरणे, कोरी पाटी आणि दुसऱ्या फळीतील नेत्यांची साथ यामुळे आरळी यांचे बंड ताकदीचे ठरू शकते, अशी चर्चा आहे. 

शिराळ्यात सम्राट महाडिक यांचे बंड

शिराळा मतदार संघात दिवंगत नानासाहेब महाडिक यांचे चिरंजीव सम्राट महाडिक यांनी बंड केले आहे. त्यांनी भाजपची उमेदवारी मागितली होती. भाजप आमदार शिवाजीराव नाईक यांच्याविरोधात त्यांची बंडखोरी डोकेदुखी ठरणारी असेल. त्यांच्या माघारीसाठी राज्य पातळीवरून ताकद लावण्यात आली होती. या मतदार संघात कॉंग्रेस नेते सत्यजीत देशमुख यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर भाजपचे पारडे जड मानले जात होते. आता बंडखोरीने चिंता वाढली आहे. 

इस्लामपूरात निशिकांत पाटील यांची बंडखोरी

इस्लामपूर मतदार संघात शिवसेनेकडून गौरव नायकवडी मैदानात आहेत. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या विरोधात एकास एक उमेदवारीचे प्रयत्न सुरु होते, मात्र तेथे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी बंडखोरी केली आहे. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी संघर्षातून त्यांनी बंड केले असून त्याचा शिवसेनेला त्रास होणार हे नक्की आहे. 

शिवाजी डोंगरेंची मनधरणी

दरम्यान, सांगली मतदार संघातून शिवाजी डोंगरे यांची मनधरणी करण्यात भाजप नेत्यांना यश आले आहे. ते भाजपमध्ये असले तरी त्यांनी कॉंग्रेस नेते, दिवंगत मदन पाटील यांच्या विचारांचा मी वारस आहे, असे सांगत अर्ज दाखल केला होता. त्यामुळे त्यांच्या बंडाविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. त्यांनी माघारी घेतली आहे, आता ते पक्षासोबतच राहतात का, याचा निर्णय बाकी आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 BJP three activists rebels in Sangli district