Vidhan Sabha 2019 : घरे ७, मतदार २२ अन्‌ विकास सात कोस दूर! (व्हिडिओ)

चिकेवाडी (ता. भुदरगड) :  या गावातील या घराचे रूपांतर विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदान केंद्रात केले जाते.
चिकेवाडी (ता. भुदरगड) : या गावातील या घराचे रूपांतर विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदान केंद्रात केले जाते.

कोल्हापूर - सात घरे, लोकसंख्या ३०, मतदार २२ आणि विकास मात्र सात कोस दूर, अशा अवस्थेतले चिक्केवाडी (ता. भुदरगड) हे गाव विधानसभा निवडणुकीला नेहमीप्रमाणे सामोरे जात आहे. जिल्ह्यातील सर्वांत कमी मतदार असलेले मतदान केंद्र अशी या गावाची प्रशासकीय पातळीवर ओळख आहे आणि शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचवला असे भाषणात ठणकावून म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधी किंवा शासनाच्या अधिकाऱ्यांनी एकदा या गावात जाऊन इथल्या गावकऱ्यांसोबत फक्त एक दिवस अनुभवण्याची गरज आहे. विधानसभा निवडणुकीचा जिल्ह्यात सर्वत्र गदारोळ सुरू आहे; पण चिक्केवाडी परिसरात उमेदवार पोचलेला नाही. प्रचाराचे पोस्टर नाही, कुठे झेंडा फडकत नाही आणि फक्त बावीस मतदारांसाठी या गावात येत्या काही दिवसांत कोणी पोहोचण्याची शक्‍यता नाही.

भुदरगड तालुका जरुर डोंगराळ आहे. दाट झाडी झुडपाचा आहे. वळणावळणाच्या लाल मातीच्या रस्त्याचा आहे; पण राजकीय दृष्ट्या खूप खूप जागरूक आहे. इथलं राजकारण सतत खदखदत ठेवणे हा तर इथल्या काही राजकीय नेत्यांचा फंडाच आहे. जिल्ह्यातील प्रमुख राजकीय घडामोडीत या तालुक्‍याचा सहभाग महत्वाची भूमिका बजावणार आहे; पण स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचा विचार केला तर राजकीय व प्रशासकीय पातळीवरील सर्वांनीच एकदा एक प्रातिनिधिक गाव म्हणून चिक्केवाडीला आपले पाय लावण्याची गरज आहे.

गारगोटी कडगाव पाटगाव यामार्गे चिक्केवाडीला जाता येते. चिक्केवाडीच्या शेजारीच चिक्केवाडीचा इतिहासकालीन रांगणा किल्ला आहे. हा किल्ला म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याच्या ऐतिहासिक वैभवाचा ठेवा आहे. या किल्ल्याजवळच अवघ्या सात घरांचे चिक्केवाडी हे गाव आहे. त्या गावातले लोक म्हणतात आम्ही या रांगणा किल्ल्याचे राखणदार. लाड आणि शिंदे अशा दोन घरांची सात कुटुंबात विभागलेली ही वस्ती आहे. पाटगाव भटवाडीपासून तीन खळखळते नाले आणि दोन्ही बाजूला दाट झाडी यातून चिक्केवाडीचा मार्ग जातो.

भटवाडी सोडलं तर पुढे चिक्केवाडीपर्यंत माणसाचे दर्शन होत नाही. या मार्गावरच्या दाट जंगलात अस्वलाचा खूप वावर आहे. त्यामुळे या गावातल्या लोकांनी दिवस मावळण्यापूर्वीच आपल्या घराकडे पोहोचायचं अशी जणू पिढ्यानपिढ्या सवयच लावून घेतलेली आहे. तीन वर्षांपूर्वीपर्यंत या गावात किंवा या गावापासून काही अंतर लांब असलेल्या तांब्याची वाडी, भटवाडी, आडे, तळे लाईटची सोय नव्हती. रॉकेलच्या दिव्याच्या उजेडात रात्र काढली जात होती.

तांब्याच्या वाडीतून नजर बाजूला टाकली ती समोर पाटगाव धरणाचा निळाशार जलाशय नजरेस येतो; पण प्रत्यक्षात तांब्याच्या वाडीत मात्र आजही डोंगरातून येणाऱ्या झऱ्याच्या पाण्याचा वापर होतो. हीच परिस्थिती चिकेवाडीतली. तीन वर्षांपूर्वी या गावात लाईट आली; पण गावाची एकूण अवस्था पाहता या गावातल्या तरुणांनी पोटासाठी कोल्हापूर किंवा मुंबईची वाट धरली. या गावातले बहुसंख्य तरुण कोल्हापुरात, मुंबई हॉटेलात काम करतात किंवा कोल्हापुरात सातेरी टी स्टॉल या नावाने चहाचा गाडा चालवतात.

आज दुपारी तीनच्या सुमारास या गावात पोचलो. भटवाडीपासून साधारण पाच किलोमीटर अंतरावर रस्त्याकडेला एका मोठ्या जनावराचा सांगाडा पडला होता. गावातल्या कृष्णा शिंदे यांना विचारले असता त्यांनी पंधरा-वीस दिवसापूर्वी वाघाने किंवा बिबट्याने म्हशीचा फडशा पाडला आणि आता तिथे फक्त हाडे उरली असे सांगून हा प्रकार आपल्याला नवा नाही असा सहजपणे खुलासा केला.

गावात पोचलो गावात फक्त राजाराम शिंदे आणि कृष्णा शिंदे हे दोघेच एका घराच्या पडवीत बसलेले. आम्ही त्यांना विचारले, गावातली माणसं कुठे गेली? त्यांनी सांगितले, ‘‘गावची लोकसंख्या तीस-पस्तीस असली तरी सध्या या गावात आम्ही फक्त १४ जणच राहतो. आमच्या दोघांची तब्येत जरा बिघडली आहे; पण बाकीचे सगळे जण वनखात्याच्या मजुरीवर गेलेले आहेत. अशा कामातून मिळणारी मजुरी आणि आमची गुंठ्या गुंठ्यात विभागली गेलेली  शेती यावरच आमची गुजराण सुरू आहे. मी विचारलं, ‘‘गावात तुम्ही सगळे पंचावन्न-साठ वयावरचे, बाकीचे तरुण लहान मुले कुठे आहेत?’’ राजाराम शिंदे यांनी हतबलतेने उत्तर दिले.

ते म्हणाले, ‘‘आताची पोरं  या वातावरणात कशी राहतील आणि समजा राहिलीच तर त्यांच्या पोरांना आम्ही कुठल्या शाळेत घालायचं? कारण इथून शाळा दहा किलोमीटर लांब अंतरावर आहे आणि अशा शाळेत जंगलातून पोरापोरींनी जाणं कसं शक्‍य आहे. त्यामुळे आमची पोरं शक्‍यतो हॉटेलात मिळेल ते काम करण्यासाठी कोल्हापूरला आणि मुंबईला गेली आहेत आणि तिथेच काम करीत आहेत. तिथेच खोल्या घेऊन राहिली आहेत. त्यातून काही जे पैसे उरतील ते तीन-चार महिन्यांतून एकदा ते आम्हाला पाठवतात अशी आमची जगण्याची पद्धत आहे.’’

इथल्या सात घरांपैकी कृष्णा शिंदे यांच्या घराच्या पडवीत प्रत्येक निवडणुकीसाठी तात्पुरते मतदान केंद्र उभारले जाते. निवडणुकीच्या आदल्या दिवशी कर्मचारी खांद्यावरून मतदान यंत्रे व इतर साहित्य घेऊन या गावात येतात. या गावात मतदानाची ड्युटी लागली, की कर्मचारी हडबडून जातात. ड्युटीला यायचं म्हटल्यावर सोबत सर्व सर्व खाण्यापिण्याचे साहित्य घेऊन येतात. रात्री बऱ्यापैकी पडवीचा एक भाग बंदिस्त करतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता मतदानाच्या प्रक्रियेला सुरवात करतात.

त्या गावातील २२ मतदारांपैकी बारा मतदार गावात राहतात. बाकीचे मतदार हॉटेलात कामाच्या निमित्ताने कोल्हापूर किंवा मुंबईत राहतात. कोल्हापुरातल्या मतदारांना उमेदवार भाड्याचे पैसे देऊन मतदानासाठी आणण्याचा प्रयत्न करतात. अवघ्या २२ जणांची ही मतदान प्रक्रिया अर्ध्या-पाऊण तासात संपते आणि तिथून पुढे मतदानाची वेळ संपेपर्यंत सर्व मतदान कर्मचाऱ्यांना या मतदान केंद्राच्या पडवीतच बसून राहावे लागते.

२२ मतदारांसाठी एवढ्या लांब कुठे जायचे?
या निवडणुकीचा प्रचार भुदरगड तालुक्‍यात दणक्‍यात सुरू आहे. प्रकाश आबिटकर विरुद्ध के. पी. पाटील ही लढत राज्यात लक्षवेधी ठरेल अशी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्‍यातल्या शेवटच्या गावात मात्र निवडणुकीचे अस्तित्व याक्षणी शून्य आहे. किंबहुना या २२ मतदारांसाठी एवढ्या लांब कुठे जायचे अशीच भावना उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांत आहे. त्यामुळे चिकेवाडी भटवाडी गावाच्या परिसरात अजूनही राजकीय शांतताच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com