Vidhan Sabha 2019 : काँग्रेसने जाहीर केले कोल्हापुरातील दोन उमेदवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

कोल्हापूर - काँग्रेसने आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. गेल्या काही दिवसांपासून ही यादी तयार असल्याच्या बातम्या येत होत्या. या ५१ उमेदवारांच्या यादीत कोल्हापुरातील कोल्हापूर दक्षिण आणि करवीर या दोन जागांवरील उमदेवारांची घोषणा झाली आहे. 

कोल्हापूर - काँग्रेसने आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. गेल्या काही दिवसांपासून ही यादी तयार असल्याच्या बातम्या येत होत्या. या ५१ उमेदवारांच्या यादीत कोल्हापुरातील कोल्हापूर दक्षिण आणि करवीर या दोन जागांवरील उमदेवारांची घोषणा झाली आहे. 

करवीरमध्ये पुन्हा पाटील-नरके लढत
शिवसेनेने आज, कोल्हापुरातील सर्व सहा विद्यमान उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले. युतीची घोषणा होण्यापूर्वीच शिवसेनेने कोल्हापुरातील उमेदवारी जाहीर केली. त्यात करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या नावाचा समावेश आहे.

दरम्यान, त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी आणि काँग्रेसचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते पी.एन. पाटील यांची उमेदवारी काँग्रेसने आजच जाहीर केली. एकेकाळी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे अतिशय जवळचे मित्र असणाऱ्या पी.एन. पाटील यांचा नरके यांनी सलग दोन निवडणुकांमध्ये पराभव केला होता. आता पुन्हा पी.एन. पाटील विरुद्ध चंद्रदीप नरके, अशीच लढत करवीरमध्ये पहायला मिळणार आहे.

ऋतुराज पाटील यांनाच उमेदवारी
कोल्हापुरातील कोल्हापूर दक्षिण या विधानसभा मतदार संघासाठी अपेक्षेप्रमाणे ऋतुराज पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली. तर, करवीर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. एन. पाटील यांचे नाव जाहीर झाले आहे. कोल्हापूर दक्षिण हा, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा मतदारसंघ होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आमदार अमल महाडिक यांनी त्यांचा पराभव केला होता. या निवडणुकीतही सतेज पाटील याच मतदारसंघातून रिंगणात उतरण्याच्या तयारीत होते. पण, काँग्रसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील सध्या विधान परिषदेवर आहेत. काँग्रेसला विधानपरिषदेतील संख्याबळ कमी करायचे नाही. त्यामुळे सतेज यांना विधानसभेची उमेदवारी नाकारण्यात आली. त्यांच्या जागी त्याचे पुतणे आणि संजय पाटील यांचे चिरंजीव ऋतुराज यांच्या उमेवारीसाठी आग्रह धरण्यात आला होता. अखेर अपेक्षेप्रमाणे ऋतुराज यांचेच नाव कोल्हापूर दक्षिणसाठी निश्चित झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Congress announces two candidates in Kolhapur