Vidhan Sabha 2019 : काँग्रेसची पहिली यादी 15 सप्टेंबरपूर्वी ?

Vidhan Sabha 2019 : काँग्रेसची पहिली यादी 15 सप्टेंबरपूर्वी ?

कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची उद्या होणारी घोषणा लांबणीवर पडली आहे. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीचीच बैठक अजून न झाल्याने हा निर्णय लांबला आहे. 15 सप्टेंबरपूर्वी ही बैठक होऊन त्यात पहिली यादी जाहीर होण्याची शक्‍यता आहे. 

या निवडणुकीसाठी पक्षाने मतदारसंघनिहाय इच्छुकांच्या मुलाखती महिन्यापूर्वी घेतल्या आहेत. त्यानंतर ही यादी पक्षाच्या छाननी समितीसमोर सादर करण्यात आली. छाननी समितीची बैठक दोन दिवसांपूर्वी दिल्लीत झाली. त्यात मतदारसंघनिहाय उमेदवारांच्या नावांवर प्राथमिक चर्चा झाली आहे. तथापि, विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या आघाडीचा निर्णय झाला असला तरी अंतिम जागा वाटप झालेले नाही. या आघाडीत अन्य कोणत्या घटक पक्षांना सामावून घ्यायचे याचाही निर्णय प्रलंबित आहे. तोपर्यंत नावे जाहीर करणे उचित नसल्याने हा निर्णय लांबला आहे. 

राष्ट्रवादीसोबत आघाडी करताना स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणत्याही परिस्थितीत या आघाडीत पाहिजे, असा आग्रह काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी यापूर्वीच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे धरला आहे. किंबहुना, पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेस कमिटीत झालेल्या मेळाव्यातही श्री. पाटील यांनी ही मागणी जाहीरपणे केली आहे. पक्षाच्यावतीने जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांत इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत.

काँग्रेसच्या वाट्याला जिल्ह्यातील दहा पैकी किमान सात जागा मिळतील, उर्वरित तीन जागा राष्ट्रवादीला देण्याचा प्रस्ताव असला तरी राष्ट्रवादीकडून अन्य एका जागेचा आग्रह आहे. त्यात शिरोळची जागा राष्ट्रवादीकडून मागितली जाण्याची शक्‍यता आहे. आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आघाडीत घेतल्यास ही जागा त्यांना सोडावी लागणार आहे. यासंदर्भात अंतिम निर्णय न झाल्याने काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची यादी लांबणीवर पडली आहे. 

संभाव्य यादीत पी. एन., ऋतुराज 
काँग्रेसच्या संभाव्य यादीत करवीरमधून माजी आमदार पी. एन. पाटील व कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ऋतुराज पाटील यांची नावे निश्‍चित आहेत. या दोन मतदारसंघांतून इच्छुकांची संख्याच कमी असल्याने हा निर्णय तातडीने घेतला जाईल.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com