Vidhan Sabha 2019 : कोल्हापुरात जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्या 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीनिमित्त गेली पंधरा दिवस सुरु असलेल्या जाहीर प्रचाराची सांगता शनिवारी (ता. 19) सायंकाळी पाच वाजता झाली. जाहीर प्रचार थांबत असतानाच काळोख्या रात्रीतील घडामोडी आणि खलबतांना मात्र वेग आला आहे.

कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीनिमित्त गेली पंधरा दिवस सुरु असलेल्या जाहीर प्रचाराची सांगता शनिवारी (ता. 19) सायंकाळी पाच वाजता झाली. जाहीर प्रचार थांबत असतानाच काळोख्या रात्रीतील घडामोडी आणि खलबतांना मात्र वेग आला आहे. आज प्रचाराच्या सांगते निमित्त शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, जनसुराज्य शक्‍ती, शेतकरी संघटना व अपक्ष उमेदवारांनी जाहीर सभा घेवून तसेच पदयात्रा, विजयी संकल्प मेळावे, निर्धार यात्रा व रॅली काढून मतदारांवर हाबकी डाव टाकण्याचा प्रयत्न केला. पुढील दोन दिवस चोरी चोरी, चुपके चुपके प्रचार होणार आहे. 

विधानसभा निवडणुकीची घोषणा आणि उमेदवारी अर्ज माघारीनंतर जिल्ह्यातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले. तेथून पुढे प्रचाराचा एकच धुरळा उडाला. जिल्ह्यातील दहाही मतदार संघात उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचा धडाका उडवून दिला. भाजप, शिवसेनेसाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, मंत्री चंद्रकांत पाटील या स्टार प्रचारांनी सभा घेतल्या. यात आघाडीवर टीकचे झोड उठवण्यात आली. 

आघाडीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार अमोल कोल्हे व प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सभा घेतल्या. राज्य आणि केंद्र शासनाच्या कारभाराचे त्यांनी वाभाडे काढले. तर माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा व माजी केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य  शिंदे यांच्याही कार्यक्रमांचे आयोजन काँग्रेस पक्षाकडून करण्यात आले होते. 

गेले पंधरा दिवस सुरु असलेल्या या जाहीर प्रचाराची सांगता आज सायंकाळी झाली. तत्पूर्वी आघाडी व युतीच्या उमेदवारांनी शहरात आणि गावागावात पदयात्रा, प्रचार फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले होते. यात सर्वच ठिकाणी महिलांची संख्या लक्षणीय होती. गेली दोन, तीन दिवस या प्रचार फेऱ्या आणि रॅलीचे नियोजन करण्यात येत होते. बहुतांश उमेदवारांचे पूर्वनियोजन हे यशस्वी झाल्याचे दिसून आले. सर्वच उमेदवारांच्या पदयात्रा आणि रॅलींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

जाहीर प्रचाराची सांगता झाल्यानंतर पाच वाजलेपासून गाठीभेटींना वेग आला आहे. घरोघरी जावून मतदानाचे नियोजन करण्यात येत आहे. परगावी असणाऱ्या मतदारांची व्यवस्था पाहिली जात आहे. अजूनही कोणाचा पाठिंबा मिळू शकतो का, समज, गैरसमज बाजुला सारुन काही मतांचा टक्‍का वाढवता आला तर, यासाठीही प्रयत्न सुरु आहेत. 
 
रात्रीच्या घडामोडी निर्णायक 
दिवसाचा सरळ, साधा प्रचार रात्री मात्र वेगळ्या वळणावर जात आहे. काहीतरी शब्द देवून, पैसे देवून, दम देवून मतासाठी जे काही करता येईल, ते करण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून सुरु आहे. रात्र वैऱ्याची आहे, जागते रहो, असा नारा देत रात्री जागू लागल्या आहेत. आपले मतदान बाजुला जाणार नाही, आमिषाला बळी पडणार नाही याची खबरदारी घेतानाच विरोधी उमेदवाराची मते आपल्याकडे खेचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. 
 
पावसाच्या हजेरीने उडाली दैना 
गेले चार दिवस पावसाने जोर धरला आहे. शनिवारीही प्रचाराचा अखेरच दिवस असताना पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील बहुतांश मतदार संघातील उमेदवारांनी रॅली, पदयात्रा, मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले होते. मात्र दुपारनंतर पावसाला सुरुवात झाल्याने या प्रचार फेऱ्यांची पुरी दैना उडाली. काही ठिकाणी तर अर्ध्यावरतीच या प्रचार फेऱ्या, पदयात्रा थांबवण्याची वेळ आली. 

जयंत पाटील यांनाही फटका 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे नेसरी येथे आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांच्या प्रचारासाठी हेलीकॉप्टरने आले. मात्र पावसाच्या तडाख्यामुळे पाटील यांना बेकनाळच्या तळीमाळावर उतरण्याची वेळ आली. या ठिकाणाहून पाटील हे कार्यकर्त्याच्या दुचाकी व नंतर चारचाकी वाहनाने सभास्थळाकडे रवाना झाले. जिल्ह्यात अशा प्रकारेच पावसामुळे प्रचाराची तारंबळा उडाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 election open campaign stops in Kolhapur