Vidhan Sabha 2019 : कोल्हापूर दक्षिणमध्ये जवाहर केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड

Voting in Kolhapur
Voting in Kolhapur

कोल्हापूर - कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जवाहर नगर हायस्कूल केंद्रावरील मतदान यंत्र तब्बल सव्वा तासाहून अधिक काळासाठी बंद राहिले. मतदार रांगेत थांबून होते. यंत्र बदलण्याची प्रक्रिया ही अतिशय संथ असल्याने मतदारांकडून नाराजी व्यक्त होत होती. 

जवाहरनगर शास्त्रीनगर प्रभागात जवाहरनगर हायस्कूल येथील केंद्रात एकूण चार ठिकाणी मतदान करण्याची व्यवस्था आहे. पैकी एका केंद्रातील यंत्र  सुरुच झाले नाही. परिणामी मतदार रांगेत थांबून होते. मतदान यंत्र बदलण्यासाठी तब्बल एक तासानंतर पर्यायी व्यवस्था पोहोचली. त्यानंतर मतदान यंत्र बदलले. साधारण साडेआठ पावणेनऊच्या सुमारास मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू झाली.

दरम्यान या हायस्कूल मधील इतर केंद्रावरही बटन दाबल्यानंतर तातडीने डीप आवाज येत नाही. तसेच व्हीव्हीपॅटवर ज्या उमेदवाराला मतदान केले आहे. त्यांचा फोटो आणि नावही दिसण्यास उशीर होत आहे. एकंदरीतच या सर्व केंद्रावर मतदारांनी नाराजी व्यक्त केली.

प्रशासकीय पोलिंग एजंटांना बसण्याची कोणतीही व्यवस्था प्रशासनाने केलेली नाही. या कर्मचाऱ्यांनी स्वतःच्याच टेबल-खुर्च्या गोळा करून रस्त्यावर बसण्याची व्यवस्था केली आहे. पाऊस आल्यास यांची कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही.

मतदारांना घरपोच मतदार स्लीप देण्यात प्रशासन कमी पडले आहे. परिणामी सरकारी पोलिंग एजंटाकडे गेल्याशिवाय मतदान कोठे करायचे हे समजून येत नाही. पावसामुळे हे एजंट इतरत्र विखुरल्याने मतदान करण्यावर मर्यादा येणार आहेत.

दरम्यान, बहुतेक निवडणुकांमध्ये सकाळच्या सत्रात अत्यंत संथ गतीने मतदान होते. पण पावसाच्या वातावरणामुळे मतदान केंद्रांवर सकाळी सातपासूनच रांगा लागल्या आहेत. एक ते सव्वा तास रांगेत थांबून मतदान करावे लागत आहे.

सकाळी पावसाळी वातावरण असल्याने मतदानाला गर्दी होईल की नाही याविषयी चिंतेचे वातावरण होते. मात्र सकाळी फिरायला आलेले लोक पहिल्याच टप्प्यात मतदानाला आले.  अनेक मतदान केंद्रावर साडेसात आठ वाजण्याच्या सुमारास पन्नास - साठ लोक मतदानासाठी रांगेत होते असे चित्र उपनगरीय भागात पाहायला मिळाले.

पहिल्या टप्प्यात रुईकर कॉलनी, महाडिक वसाहत, मुक्त सैनिक वसाहत, ताराबाई पार्क येथील मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा होत्या. त्यामुळे संथ गतीने होणाऱ्या मतदानाची परंपरा मोडली गेली आहे, तर याउलट स्थिती ज्या झोपडपट्टी भागात सकाळच्या सत्रात मतदानासाठी रांगा असतात तिथे मात्र संथ गतीने मतदान होत असल्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com