Vidhan Sabha 2019 : हातकणंगलेत हाय होल्टेज लढत

सदानंद पाटील
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर जिल्ह्यातील अनुसूचित जातींसाठी राखीव असणाऱ्या हातकणंगले मतदारसंघात सर्वाधिक उलथापालथ सुरू आहे. पक्षापेक्षा गट-तट किती महत्त्वाचे आहेत, हे या मतदारसंघात गेल्याशिवाय समजत नाही.

कोल्हापूर - जिल्ह्यातील अनुसूचित जातींसाठी राखीव असणाऱ्या हातकणंगले मतदारसंघात सर्वाधिक उलथापालथ सुरू आहे. पक्षापेक्षा गट-तट किती महत्त्वाचे आहेत, हे या मतदारसंघात गेल्याशिवाय समजत नाही. वर्षानुवर्षे या मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिले होते; मात्र त्यानंतर जनसुराज्य व मागील दोन निवडणुकांत शिवसेनेने बाजी मारली. नेहमीच दुरंगी किंवा तिरंगी असणारी निवडणूक यावेळी पंचरंगी असल्याने फार चुरशीची बनली आहे. पुढील ४८ तासांत घडणाऱ्या घडामोडीच विजयी  उमेदवार ठरवणार, हे मात्र निश्‍चित. 

राज्यातील हाताच्या बोटावर असणाऱ्या राखीव मतदारसंघात हातकणंगलेचा  समावेश आहे. या तालुक्‍यातील राजकारणावर जयवंतराव आवळे, महादेवराव महाडिक, विनय कोरे, प्रकाश आवाडे, खासदार धैर्यशील माने, निवेदिता माने, माजी खासदार राजू शेट्टी यांचा प्रभाव आहेच. तसेच मराठा मतांचा गठ्ठा, राखीव मतांचा गठ्ठा यांच्यासह शिवसेनेचीही ताकद येथे लक्षणीय आहे. या निवडणुकीच्या अगोदरच्या निवडणुकांचा इतिहास पाहिला, तर कायम दुरंगी आणि तिरंगी लढती झाल्या. आवळे, महाडिक, आवाडे, माने हे काँग्रेस व आघाडीचे नेतृत्व करत असताना त्यांच्यात अंतर्गत कुरबुरी असली, तरी पक्ष म्हणून ताकद होती. यावेळी मात्र ही सर्व ताकद विखुरल्याने निवडणूक रंगतदार बनली आहे. 

या मतदारसंघातून शिवसेना पहिल्यांदाच डॉ. सुजित मिणचेकर यांच्या माध्यमातून हॅट्ट्रिक करण्यासाठी सरसावली आहे. डॉ. मिणचेकर यांचे सर्वपक्षीय संबंध सर्वश्रुत आहेत. याचा त्यांना जेवढा फायदा आहे, तेवढा तोटाही असल्याचे या निवडणुकीत दिसत आहे. पक्षांतर्गत छुप्या आणि थेट विरोधाला त्यांना सामोरे जावे लागत आहे. जयवंतराव आवळे यांचे पुत्र राजूबाबा हे दुसऱ्यांदा काँग्रेसकडून मैदानात आहेत. काँग्रेसची मोठी वोट बॅंक या ठिकाणी आहे. मात्र यावेळी त्यांच्यासोबत प्रकाश आवाडे नाहीत. उलट आवाडे यांनीच किरण कांबळे यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसच्या वोट बॅंकेला धक्‍का बसला आहे.

ऐनवेळी ज्यांनी रंगत निर्माण केली आहे, ते जनसुराज्य पक्षाचे उमेदवार डॉ. अशोकराव माने यांनी. भाजपचे जिल्हा परिषद सदस्य असताना त्याचा राजीनामा देत त्यांनी विधानसभेच्या मैदानात उडी घेतली. खरेतर त्यांना जनसुराज्यची उमेदवारी घेण्यात भाजपच्याही काही नेत्यांचा समावेश आहे. माने यांना उमेदवारी दिल्याने जनसुराज्यच्या राजीव किसन आवळे यांनी बंडखोरी केली आहे. त्याचा फटका माने यांना बसणार आहे. या बंडखोरीची भरपाई माने हे सेना-भाजपातून करताना दिसत आहेत. 

बहुजन वंचितचे गठ्ठा मतदान 
या मतदारसंघात बहुजन वंचित विकास आघाडीचे गठ्ठा मतदान असून आघाडीकडून एस. पी. कांबळे नशीब आजमावत आहेत. स्वाभिमानी संघटनेचे मतदानही लक्षणीय आहे. विविध मतदारसंघांत सुरू असलेल्या तडजोडीचे पडसाद येथे उमटू लागल्याने ही निवडणूक भाकीतांच्या पुढे पोहोचली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Fighting high-voltage in Hatkanangale