Vidhan Sabha 2019 : तासगाव कवठेमहांकाळमध्ये पाच उमेदवार रिंगणात

रवींद्र माने
Monday, 7 October 2019

तासगाव - तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात अर्ज माघारीनंतर शेवटच्या दिवशी पाच उमेदवार मैदानात राहिले, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी दुरंगी लढत सुरू झाली आहे. गेली दहा वर्ष ताब्यात असलेला किल्ला टिकवण्याचे आव्हान राष्ट्रवादीसमोर उभे ठाकले आहे.

तासगाव - तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात अर्ज माघारीनंतर शेवटच्या दिवशी पाच उमेदवार मैदानात राहिले, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी दुरंगी लढत सुरू झाली आहे. गेली दहा वर्ष ताब्यात असलेला किल्ला टिकवण्याचे आव्हान राष्ट्रवादीसमोर उभे ठाकले आहे.

वंचित आघाडीचा अर्ज मागे 
आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता, अखेरच्या क्षणी वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत शेजाळ यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुमनताई पाटील आणि शिवसेनेचे अजितराव घोरपडे यांच्यात लढत आता निश्चित झाली आहे. याशिवाय बळीराजा पक्षाचे बाळासाहेब पवार, बहुजन समाज पार्टीचे शंकर माने तर सुमन पाटील असे पाच उमेदवार आपले नशीब आजमावून पहाणार आहेत. मात्र लढत होणार ती राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशीच दुरंगी ! 

तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा हा नवा मतदारसंघ तयार झाल्यापासून येथे राष्ट्रवादीचे वर्चस्व राहीले आहे. 2014 च्या निवडणूकीत 23 हजार मतांनी आर. आर. पाटील निवडून आले होते. त्यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होऊन सुमनताई पाटील यांनी या मतदार संघाचे नेतृत्व केले आहे. दोन्ही तालुक्यातील पाणी योजनांची कामे आणि स्वतःची मतपेटी ह्या राष्ट्रवादीच्या जमेच्या बाजू आहेत. मात्र पाच वर्षात राजकारणाच्या पुलाखालून खूप पाणी गेले आहे. झालेल्या लोकसभा निवडणुकीत 39 हजार मतांचे मताधिक्य भाजपला मिळाल्याने राष्ट्रवादीच्या दृष्टीने ही निवडणूक अस्तित्वाची अशी असणार आहे. आबांच्यानंतर किल्ला राखण्याची मोठी जबाबदारी सुमनताई पाटील यांच्यावर आहे.

या पार्श्वभूमीवर नव्या मतदारसंघातील अजितराव घोरपडे यांची ही दुसरी निवडणूक आहे. गेल्या निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर त्यांचा पराभव झाला होता. यावेळी ते शिवसेनेतून आपले नशीब आजमावत आहेत. त्याच्या साथीला खासदार संजयकाका पाटील यांची ताकद असणार आहे. अजितराव घोरपडे आणि संजयकाका यांचे दोघांचेही कवठेमहांकाळ तालुक्यात मजबूत गट आहेत, शिवाय घोरपडे यांची स्वतः ची मतपेटी आहे. यापूर्वी त्यांनी याच तालुक्यातून निवडणूक जिंकली असल्याने त्यांचे ते होमपीच आहे. ही त्यांची मोठी जमेची बाजू आहे.

तासगाव तालुक्यात मात्र त्यांची सारी भिस्त संजयकाकांवर असणार आहे. लोकसभेच्या मिळालेल्या मताधिक्यामुळे भाजपच्या दृष्टीने सोपी अशी ही निवडणूक असणार आहे.   
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Five candidates in Tasgaon