Vidhan Sabha 2019 : सांगलीत ‘हाउसफुल्ल’ भाजपचे आघाडीसमोर आव्हान

शेखर जोशी
रविवार, 22 सप्टेंबर 2019

विधानसभेचा मुहूर्त एकदाचा ठरला...आता तीस दिवस प्रत्येक चेंडू (क्षण) महत्त्वाचा! आजच्या घडीला जिल्ह्यात सर्वांत बलाढ्य पक्ष म्हणून भाजपचीच हवा आहे. महाजनादेश यात्रेने यात रंग भरले असले तरी ही निवडणूक वेगळी आहे. कारण सत्ताधारी म्हणून भाजपच्या कारभारावर जनता मतयंत्रातून आपले मत नोंदविणार आहे, तर २०१४ ला सत्ताधारी असलेले दोन्ही काँग्रेस पक्ष विरोधकाच्या भूमिकेतून रान उठवणार आहेत...

विधानसभेचा मुहूर्त एकदाचा ठरला...आता तीस दिवस प्रत्येक चेंडू (क्षण) महत्त्वाचा! आजच्या घडीला जिल्ह्यात सर्वांत बलाढ्य पक्ष म्हणून भाजपचीच हवा आहे. महाजनादेश यात्रेने यात रंग भरले असले तरी ही निवडणूक वेगळी आहे. कारण सत्ताधारी म्हणून भाजपच्या कारभारावर जनता मतयंत्रातून आपले मत नोंदविणार आहे, तर २०१४ ला सत्ताधारी असलेले दोन्ही काँग्रेस पक्ष विरोधकाच्या भूमिकेतून रान उठवणार आहेत...

गेल्या पाच वर्षांच्या भाजपच्या (शिवसेना सत्तेत दिसलीच नाही.) कारभाराचा फैसला करणारी ही निवडणूक. याआधीच्या  तिमाही, सहामाही परीक्षेत भाजप पास झाला आहे. वर्षापूर्वीच्या पालिका निवडणुकीत भाजप काठावर पास झाला. लोकसभेचे यशही डिस्टिंक्‍शनचे. यशाचे फायदे तसेच तोटेही असतात. बंडखोरांनी डोके वर काढले आहे. लोकसभेला पलूस-कडेगाव वगळता सर्व मतदारसंघांत भाजपने आघाडी घेतली. आता भाजपचे चार आणि शिवसेनेचा एक असे पाच आमदारांचे संख्याबळ टिकवावेच लागेल.

गेल्या पाच वर्षांत काही घटनांनी जिल्ह्याची राजकीय समीकरणे बदलत गेली. मराठा आरक्षणासाठी झालेल्या भव्य मोर्चांनी सरकारची चिंता वाढवली होती. त्यानंतर झालेल्या भीमा-कोरेगाव घटनेचे पडसाद येथे दिसले. जिल्ह्यात दोन गटांत तणावाचे वातावरण होते. पण अशी वादळे झेलतानाही जिल्ह्यातील जनतेने संयम ठेवून एकतेचे दर्शन घडविले. सांगलीच्या राजकीय क्षितिजावरून दिग्गज नेत्यांची अचानक 
एक्‍झिट झाल्यानेही काँग्रेस व राष्ट्रवादीला हादरा बसला.

आर. आर. पाटील, मदन पाटील, पतंगराव कदम असे तगडे नेते आता आघाडीकडे नाहीत. शिवाजीराव देशमुखांच्या जाण्याने तर अल्पावधीत शिराळा तालुकाच काँग्रेसमुक्‍तीकडे वाटचाल करीत आहे. सत्यजित देशमुख यांच्या भाजप प्रवेशामुळे लोकसभेला मागे पडलेल्या आमदार शिवाजीराव नाईकांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या पाच वर्षांत मोहनराव कदम, सदाभाऊ खोत आणि पृथ्वीराज देशमुख विधान परिषदेवर आमदार झाले. खासदार संजय पाटील कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष झाले, तर सुरेश खाडे भाजपचे पहिले कॅबिनेट मंत्री म्हणून शेवटच्या टप्प्यात तरी सांगलीला मंत्रिपदाची लॉटरी लागली. खोत जरी राज्यमंत्री असले तरी भाजपला मंत्रिपद नसल्याची खंत वाटत होती ती पक्षाने अशी शेवटी पूर्ण केली. पण मिरज तालुक्‍याला अलीकडच्या काळात पहिल्यांदाच कॅबिनेट पद मिळाले. याच वर्षांत जयंत पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष झाले, तर भाजपचे शेखर इनामदार प्रदेश उपाध्यक्ष झाले.

आता विकासाच्या पातळीवर काय झाले?  ड्रायपोर्टची घोषणा झाली. कृषी - उद्योगांना चालना मिळण्यासाठी ते होणे गरजेचे आहे. चार नव्या महामार्गांचे काम जिल्ह्यात गतीने सुरू आहे. यामध्ये पेठ ते म्हैसाळ असा नागपूरशी जोडणारा मार्ग महत्त्वपूर्ण आहे, यामुळे चार तालुके महामार्गावर येत आहेत. कोकणलाही जोडणारा महामार्ग होतो आहे.

जिल्ह्यातील रेल्वेनेही कात टाकली, डबल ट्रॅक आणि कोल्हापूर-मिरज मार्गाचे विद्युतीकरण अशी कामे झाली. मात्र, जिल्ह्यात एकही नवा उद्योग आला नाही. सिंचन योजनांची कामे प्रदीर्घकाळ सुरू आहेत. त्याची फळे आता लोकांना मिळू लागली आहेत; मात्र अजूनही बांधापर्यंत पाणी गेले असे म्हणता येणार नाही. दुष्काळी भागाचे प्रश्‍न आहेत तसेच २०१९च्या महापुराने येथील संपन्न तालुक्‍यांचाही चिखल करून टाकला.

विरोधकांसाठी या निवडणुकीत हे भाजपला नामोहरम करण्यासाठी हे महत्त्वाचे हत्यार असेल. पाच वर्षांत विरोधकांना आव्हान असे देता आलेच नाही. आंदोलनाच्या पातळीवरही सामसूम राहिली. काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधकाच्या भूमिकेत गेली असे म्हणता येणार नाही. जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटात शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी सामील झाले हीच काय ती बेरीज म्हणता येईल.

सत्ताधारी भाजप मात्र राजकीय आघाडीवर बरीच बेरीज करणारी ठरली.  सत्यजित देशमुख, वैभव शिंदे, वैभव नायकवडी यांच्यासह बहुतेक काँग्रेस-राष्ट्रवादीचे दुसऱ्या फळीतील नेते आता भाजपवासी झाले आहेत. अजूनही होत आहेत. शिवसेनेसोबतची युती राहील की नाही हे लवकरच कळेल पण तुटली तर खानापुरात आमदार अनिल बाबर यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष असेल. त्यानंतर सदाशिवराव पाटलांची भूमिका ठरेल.

जत आणि इस्लामपूर मतदार संघात इच्छुकांची संख्या जास्त असल्याने तिथला निर्णय ऐनवेळी होईल.  तासगाव-कवठेमहांकाळमध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे नाव निश्‍चित मानले जातेय. इस्लामपूर आणि जतचा तिढा कायम आहे. युतीच्या जागावाटपात घोडे अडल्यास भाजपसमोर पेचप्रसंग उभा राहू शकतो. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठी जिल्ह्यातील कामगिरी महत्त्वाचा विषय राहील. इस्लामूर, तासगाव व शिराळा तीन मतदार संघात राष्ट्रवादीला मोठी संधी आहे. काँग्रेसमात्र खूप बॅकफूटवर गेली आहे.

वसंतदादा घराण्याची मोठी पिछेहाट झाली आहे. आमदार विश्‍वजित कदम यांनी काँग्रेसमधेच राहण्याचा निर्णय घेतला, ही जिल्हा काँग्रेससाठी सर्वात जमेची बाजू आहे. आता दोन्ही काँग्रेसमधील गटातटाच्या  राजकारणाच्या अंगवळणी पडलेल्या सवयींचे भाजपमध्ये जाऊन काय होते हे पहायचे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Housefull BJP challenge to Congress-NCP in Sangli