Vidhan Sabha 2019 : खासदार संभाजीराजे प्रचारापासून दूरच 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर - लोकसभेच्या निवडणुकीत "जखम भळभळतेय' म्हणत एक - दोन तालुक्‍यात अखेरच्या टप्प्यात प्रचारात उतरताना तरुणांसोबत नदीत पोहण्याचा आनंद लुटलेले राज्यसभा सदस्य खासदार संभाजीराजे विधानसभेच्या प्रचारापासून दूरच आहेत.

कोल्हापूर - लोकसभेच्या निवडणुकीत "जखम भळभळतेय' म्हणत एक - दोन तालुक्‍यात अखेरच्या टप्प्यात प्रचारात उतरताना तरुणांसोबत नदीत पोहण्याचा आनंद लुटलेले राज्यसभा सदस्य खासदार संभाजीराजे विधानसभेच्या प्रचारापासून दूरच आहेत. लोकसभेप्रमाणे याही निवडणुकीत त्यांची भूमिका स्पष्ट नाही, त्यामुळे ते भाजपच्या प्रचारातही नाहीत आणि विरोधातही. 

लोकसभेच्या 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या संभाजीराजे यांचा पराभव झाला. तो जिव्हारी लागल्याने त्यांनी राजकारणापासून फारकतच घेतल्यासारखी स्थिती होती. दरम्यानच्या मुदतीत त्यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने राज्यभर आपली ओळख निर्माण केली.

गड - किल्ले यांचे संवर्धन करण्याच्या कामाला त्यांनी वाहून घेतले. त्यामुळे राज्यातील तरुणांच्या गळ्यातील ते ताईत बनले होते. त्यांची अचानक वाढलेली ही "क्रेझ' पाहून 2016 मध्ये शिवराज्याभिषेकानंतर भाजपने त्यांना आपल्या जाळ्यात ओढले. राज्यसभेवर राष्ट्रपतींच्या कोट्यातून त्यांना खासदारकी बहाल केली. राजर्षी शांहूंचे वारसच आपल्याकडे घेण्यात यानिमित्ताने भाजपला यश आले. 

त्यानंतर अलीकडेच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ते युतीच्या प्रचारात मैदानात उतरून सक्रिय राहतील अशी शक्‍यता होती. पण ऐन निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात "2009 च्या पराभवाची जखम अजून भळभळतयं' म्हणत त्यांनी एका तालुक्‍यात तरुणांसोबत पोहण्याचा आनंद लुटत भूमिका स्पष्ट केली, पण हाही त्यांचा सहभाग तेवढ्यापुरताच मर्यादित राहीला. आता विधानसभेची निवडणूक सुरू आहे, त्यांच्याच घरात कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसची उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू होत्या, तथापि निवडणूक न लढण्याचा निर्णय झाल्याने हा प्रयत्न असफल झाला.

त्यानंतर छत्रपती घराण्याचे कुटुंबप्रमुख श्रीमंत शाहू महाराज यांनी अलीकडेच थेट काँग्रेस उमेदवारांच्या व्यासपीठावर जाऊन युती सरकारवर टीका केली. दुसरीकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रयत्नातून राज्यसभा सदस्यत्त्व मिळालेल्या म्हणजे अर्थातच भाजपच्या कोट्यातून हे पद मिळालेल्या खासदार संभाजीराजे यांची भूमिका मात्र गुलदस्त्यात आहे. किंबहुना या निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ आली तरीही ते प्रचारापासूनच दूर आहेत. त्यांच्या या भूमिकेची उलटसुलट चर्चा सुरू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 MP Sambhaji Raje away from campaigning