Vidhan Sabha 2019 : मोदी - फडणवीस हे महाखोटारडे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाखोटारडे आहेत. खोटे बोलणे एवढेच त्यांच्याकडे भांडवल आहे. त्यामुळे युवकांनी मोदी - मोदी करत आयुष्य बरबाद करून घेऊ नये

सांगली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाखोटारडे आहेत. खोटे बोलणे एवढेच त्यांच्याकडे भांडवल आहे. त्यामुळे युवकांनी मोदी - मोदी करत आयुष्य बरबाद करून घेऊ नये, असे आवाहन कर्नाटकचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी येथे केले. 

Vidhan Sabha 2019 : महाराष्ट्राला पाणी देण्याचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन खोटे 

सांगली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ वारणा मंगल कार्यालयात धनगर समाजाचा मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार रामहरी रूपनवर, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, जयश्री पाटील, कर्नाटकातील काँग्रेस नेते वीरकुमार पाटील, काका पाटील, प्रकाश राठोड, लक्ष्मणराव चेंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

सिद्धरामय्या म्हणाले,""मोदी, फडणवीस आणि उद्धव ठाकरे सबका साथ सबका विकास म्हणत असले तरी विकास शून्य आहे. दलित, अल्पसंख्याक, मागासवर्गीय विकासाचा विचार सरकार करत नाही. भाजप केवळ उच्चस्तरीय लोकांचा विचार करते. सत्तेचा पुरेपूर वापर करणारे भाजप सरकार विकासावर काहीच बोलत नाही. देशाच्या घटनेची पायमल्ली त्यांच्याकडून सुरू आहे. घटनेतील समान संधी त्यांना मान्य नसून घटनाविरोधी कारभार सुरू आहे. मागासवर्गीयांच्या न्यायासाठी नेमलेल्या मंडल आयोगाना भाजपचा आजही विरोध आहे.'' 

ते पुढे म्हणाले,""मागील निवडणुकीत मोदी, फडणवीस यांनी धनगर समाजाला एसटीचे आरक्षण देण्याचे जाहीरनाम्यात सांगितले होते. त्यांनी आरक्षण न देता धनगर समाजाचा अपमान केला आहे. त्यामुळे धनगर समाजाला याबाबत संताप असेल तर त्यांनी भाजपला मतदान करू नये. महापुराच्या काळात मोदी अमेरिकेत ट्रम्पच्या प्रचाराला गेले होते. पाच वर्षांत त्यांना काहीच करता आले नाही. दुष्काळमुक्त महाराष्ट्राची घोषणा अमलात आली नाही. खोटे बोलून पुन्हा राज्यात सत्तेत येण्याचा प्रयत्न हाणून पाडा.'' 

उमेदवार पृथ्वीराज म्हणाले,""सांगलीतून मला निवडून दिले तर धनगर आरक्षणासाठी विधानसभेत आवाज उठवला जाईल. मौनी आमदाराप्रमाणे गप्प राहणार नाही.'' 

नगरसेवक विष्णू माने, मनोज सरगर यांनी मनोगत व्यक्त केले. हारूण शिकलगार, संजय बजाज, सतीश साखळकर, सुरेश पाटील, जे. के. बापू जाधव, प्रकाश मुळके आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Narendra Modi, Devendra Fadnavis are cheater