Vidhan Sabha 2019 : सत्ताधाऱ्यांना शरद पवारांनी विचारला हा प्रश्न

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

गडांवर छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार तळपली, तेथे आता हे छमछम सुरू करणार, बार सुरू करणार आणि वर आम्हाला विचारताय तुम्ही काय केले म्हणून ? कसं आणि कुणासाठी राज्य करताय ? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विचारला.  

तासगाव  - महाराष्ट्रातील गड - किल्ल्यांवर हॉटेल सुरू करण्याचा निर्णय तुम्ही घेतला. गडांवर छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार तळपली, तेथे आता हे छमछम सुरू करणार, बार सुरू करणार आणि वर आम्हाला विचारताय तुम्ही काय केले म्हणून ? कसं आणि कुणासाठी राज्य करताय ? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विचारला.  

मणेराजुरी ( ता. तासगाव) येथे तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुमनताई पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत श्री. पवार बोलत होते. आमदार सुमनताई पाटील, आमदार विश्वजित कदम, रोहित पाटील अरुण लाड, अविनाश पाटील उपस्थित होते.

शरद पवार यांनी आपल्या २५ मिनिटाच्या भाषणात केंद्र आणि राज्य सरकारवर तीव्र शब्दात टीका केली.  महाराष्ट्रात पंतप्रधान येवोत अथवा गृहमंत्री येवोत ते भाषणात एकच गोष्ट बोलतात ते म्हणजे शरद पवार, शरद पवार ! मला त्यांची कधी कधी काळजी वाटते , हे दोघे झोपेत ही शरद पवार, शरद पवार म्हणत चावळून उठतात की काय असे वाटते, अशा शब्दात श्री. पवार यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा याची खिल्ली उडवली.

श्री. पवार म्हणाले, सत्तेचा वापर लोकांच्या कल्याणासाठी करायचा असतो. याचे विस्मरण या मंडळींना झाले आहे. राज्यातील वीस जिल्ह्यामध्ये मी फिरलो सर्वत्र लोक अस्वस्थ आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत आजपर्यंत १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. उद्योग बंद पडत आहेत, नोकऱ्या जात आहेत. देशासमोर, राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे यांच्याकडे नाहीत. मात्र परवा अमित शहा आले त्यांनी आम्हाला प्रश्न विचारला, तुम्ही काय केले म्हणून?  गेली पाच वर्षे केंद्रात आणि राज्यात तुम्ही सत्तेत आहात. तुम्ही काय दिवे लावलेत आम्ही पाहतोय आणि आम्हालाच विचारताय? तुम्ही काय केले म्हणुन ? बरं आम्ही विचारल्यावर ते म्हणतात, अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारू, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिलमध्ये स्मारक उभारू. मात्र गेल्या तीन वर्षात एक इंचही काम पुढे सरकत नाही.

सरकारने चांगले काय केले ?  असे विचारले की सांगतात,  ३७० कलम दूर केले. आता म्हणतात परत लावून दाखवा. कोणताही प्रश्न विचारा उत्तर एकच ३७०. शेती बद्दल विचारा उत्तर 370. उद्योग बंद का पडत आहेत उत्तर ३७०. तरुणांना काम नाही उत्तर ३७०. मान्य आहे तुम्ही ३७० कलम दूर केले. आमची काही तक्रार नाही, पण त्यापेक्षा ही अनेक प्रश्न आहेत. त्यांची सोडवणूक करण्यासाठी सत्तेचा वापर व्हायला हवा, असे श्री पवार म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 NCP chief Sharad Pawar comment in Tasgaon