Vidhan Sabha 2019 : कोल्हापुरात पाच ठिकाणी भाजपमध्येच बंडखोरी अटळ 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

कोल्हापूर - विधानसभेच्या तोंडावर कॉंग्रेस, राष्ट्रवादीतील अनेकांना पक्षात घेऊन मेगाभरती केलेल्या भाजपमध्येच पाच मतदारसंघात बंडखोरी अटळ आहे. आता नाही तर भविष्यात कधीच संधी मिळणार नाही, असे चित्र निर्माण झाल्याने कागलसह राधानगरी, चंदगड, शिरोळ, हातकणंगले मतदार संघातील भाजपावासिय रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. 

कोल्हापूर - विधानसभेच्या तोंडावर कॉंग्रेस, राष्ट्रवादीतील अनेकांना पक्षात घेऊन मेगाभरती केलेल्या भाजपमध्येच पाच मतदारसंघात बंडखोरी अटळ आहे. आता नाही तर भविष्यात कधीच संधी मिळणार नाही, असे चित्र निर्माण झाल्याने कागलसह राधानगरी, चंदगड, शिरोळ, हातकणंगले मतदार संघातील भाजपावासिय रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. 

वर्षभर राज्यात भाजपमध्ये मेगाभरती सुरू आहे. ज्याठिकाणी भाजपचे आमदार आहेत, त्या मतदार संघातही राज्यातील अनेकांचा भाजप प्रवेश झाला आहे. त्यावरून भाजप, सेना युती होणार नाही, असे संकेत मिळत होते. कोल्हापूर जिल्ह्यात तर युती झाल्यास निम्म्या जागांवर भाजपने हक्क सांगितला होता. 2009 मध्ये युती होती, त्यावेळी सेनेला नऊ तर भाजपला इचलकरंजीची एकमेव जागा मिळाली होती. हाच फॉर्म्युला कायम ठेवत शिवसेनेने काल जिल्ह्यातील दहापैकी आठ मतदार संघातील उमेदवारांना थेट ए बी फॉर्मच दिले. त्यात विद्यमान सहा आमदारांचा समावेश आहे. कागल व चंदगडच्या जागांची अदलाबदल होण्याची शक्‍यता होती किंवा उमेदवारच बदलले जातील असे वाटत होते. पण युतीची अधिकृत्त घोषणा होण्यापुर्वीच शिवसेनेने धक्का दिल्याने या मतदारसंघात भाजपाकडून इच्छुक असलेल्यांसमोर बंडखोरी हाच पर्याय शिल्लक राहीला आहे. 

निवडणुकीच्या तोंडावर शिरोळमधून काँग्रेसचे अनिल यादव, चंदगडमध्ये माजी मंत्री भरमू पाटील, राधानगरीत काँग्रेसचे राहूल देसाई, कागलमध्ये समरजितसिंह घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हातकणंगलेची जागा भाजपला मिळेल म्हणून जिल्हा परिषद सदस्य अशोक माने यांनीही तयारी सुरू केली होती. त्याचबरोबर आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या कन्या नंदिनी बाभूळकर याही चंदगडमधून भाजपाकडून लढण्यास इच्छुक होत्या. पण शिवसेनेने भाजापचे आमदार असलेले इचलकरंजी व कोल्हापूर दक्षिण हे दोनच मतदार संघ भाजपला देण्यार असल्याचे अप्रत्यक्षरित्या दाखवून दिले. त्यामुळे विधानसभा डोळ्यासमोर ठेवून भाजपमध्ये गेलेल्या इतर मतदार संघातील इच्छुकांसमोर बंडखोरीशिवाय पर्याय राहिलेला नाही. 

अपक्ष म्हणून रिंगणात 
भाजपकडून इच्छुक असलेले बहुंताशी उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. जि. प. सदस्य अशोक माने हे प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी आघाडीकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. इतर चार मतदार संघात पर्यायी पक्षच नसल्याने या मतदार संघातील इच्छुकांसमोर अपक्ष लढण्याशिवाय पर्याय नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Rebellion in BJP five places in Kolhapur