Vidhan Sabha 2019 : कोल्हापुरातील 'या' मतदारसंघाचा निकाल सर्वप्रथम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

इचलकरंजी मतदारसंघात २५४ मतदार केंद्रे असून १५ टेबलवर मतमोजणी होईल. त्यामुळे इचलकरंजीचा निकाल दुपारी अडीचपर्यंत जाहीर होईल.

कोल्हापूर - विधानसभेसाठी जिल्ह्यात काल (ता. २१) चुरशीने आणि ईर्ष्येने झालेल्या मतदानानंतर आता मतमोजणीकडे लक्ष लागले आहे. गुरुवारी (ता. २४) सकाळी आठपासून मतमोजणी सुरू होईल. पहिला निकाल इचलकरंजी मतदारसंघाचा, तर शेवटचा निकाल कागल मतदारसंघाचा जाहीर होण्याची शक्‍यता आहे. 

इचलकरंजी मतदारसंघात २५४ मतदार केंद्रे असून १५ टेबलवर मतमोजणी होईल. त्यामुळे इचलकरंजीचा निकाल दुपारी अडीचपर्यंत जाहीर होईल. कागलमध्ये ३५३ मतदान केंद्राची मतमोजणी १५ टेबलवर होणार असून, दुपारी चारपर्यंत संपूर्ण निकाल जाहीर होईल. 

जिल्ह्यातील दहाही मतदारसंघातील मतमोजणीसाठी तब्बल १३ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये सुमारे १२०० अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ते मतदारसंघ केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी म्हणून कार्यरत राहतील. आज सकाळपासूनच मतमोजणीसाठी ज्या-त्या मतमोजणी केंद्रातील तयारी केली जात होती. जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघाचा निकाल दुपारी तीनपर्यंत जाहीर होण्याची शक्‍यता आहे.  

जिल्ह्यात ७४.०८ टक्के मतदान
कोल्हापूर : चुरस, ईर्ष्या आणि नेत्यांच्या प्रतिष्ठेची असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात सोमवारी ७४.०८ टक्के सरासरी मतदान झाले. करवीर मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ८३.९३ टक्के नोंद झाली. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात सर्वांत कमी ६०.८७ टक्के मतदान झाले. 

काल एकूण १५ लाख ८५ हजार ३८६ पुरुष मतदारांपैकी ११ लाख ९४ हजार ५६३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १५ लाख ७ हजार ५७६ पैकी १० लाख ९६ हजार ६२५ महिलांनी मतदान केले. जिल्ह्यातील एकूण ३० लाख ९३ हजार ४३ मतदारांपैकी २२ लाख ९१ हजार २०९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

मतदारसंघ    मतमोजणी फेऱ्या     टेबल संख्या   ठिकाण
चंदगड    १९    २०    पॅव्हेलियन हॉल, गडहिंग्लज
राधानगरी    २२    २०    तालुका क्रीडा संकुल, 
मौनी विद्यापीठ, गारगोटी
कागल    २४    १५    जवाहर नवोदय विद्यालय, 
मौजे सांगाव रोड, कागल
कोल्हापूर दक्षिण    १७    २०    शासकीय गोदाम हॉल, 
राजाराम तलावाजवळ, सरनोबतवाडी
करवीर    १८    २०   शासकीय गोदाम, रमण मळा, 
कसबा बावडा
कोल्हापूर उत्तर    १६    २०    शासकीय गोदाम हॉल डी, 
राजाराम तलावाजवळ, सरनोबतवाडी
शाहूवाडी    १६    २१    जुने शासकीय गोदाम, तहसील कार्यालय, शाहूवाडी
हातकणंगले    १७    २०    शासकीय गोदाम, 
नवीन प्रशासकीय इमारत, हातकणंगले
इचलकरंजी    १३    २१    राजीव गांधी भवन, कापड मार्केटसमोर, इचलकरंजी
शिरोळ    २०    १५    तहसील कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत (पहिला मजला), शिरोळ
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 The result of Ichalkaraji constituency in Kolhapur is first