Vidhan Sabha 2019 : सांगली जिल्ह्यात भाजपचा आत्मघाती निर्णय

शेखर जोशी
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

सांगलीच्या जनतेने छप्पर फाडके यश दिल्यानंतरही भाजपने जागावाटपात येथे स्वत:चा आत्मघात करून घेतल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. तीन ठिकाणी भाजपकडे सक्षम उमेदवार असताना आणि सेनेकडे उमेदवार नसताना हे मतदारसंघ त्यांच्या झोळीत टाकले आहेत. यामध्ये दोघांकडे ना कसले लॉजिक ना राजकीय चातुर्य ! असे वाटप करून अप्रत्यक्ष काँग्रेस व राष्ट्रवादीला तीन ठिकाणी निवडणूक सोपी केली आहे.

सांगलीच्या जनतेने छप्पर फाडके यश दिल्यानंतरही भाजपने जागावाटपात येथे स्वत:चा आत्मघात करून घेतल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. तीन ठिकाणी भाजपकडे सक्षम उमेदवार असताना आणि सेनेकडे उमेदवार नसताना हे मतदारसंघ त्यांच्या झोळीत टाकले आहेत. यामध्ये दोघांकडे ना कसले लॉजिक ना राजकीय चातुर्य ! असे वाटप करून अप्रत्यक्ष काँग्रेस व राष्ट्रवादीला तीन ठिकाणी निवडणूक सोपी केली आहे.

भाजपने सांगलीच्या जागा सोडून राज्यात काही मोक्‍याच्या जागा पदरात पाडून घेतल्या असतीलही, पण ज्या सांगलीतून त्यांना पश्‍चिम महाराष्ट्रात घुसता आले त्या ठिकाणी त्यांनी आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. पाच वर्षे मशागत केली पीक घ्यायची वेळ आल्यावर शिवार सोडून ते सेनेच्या हवाली केल्याने भाजपमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

यापैकी काही मातब्बर नेत्यांनी तर लढतच नाही, अशी भूमिका घेत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा परिषद, महापालिका, महत्त्वाच्या नगरपालिका आणि खासदारकी भाजपकडे आहेत. तीन मतदार संघात राष्ट्रवादी व  काँग्रेसला घाम फोडतील असे उमेदवार भाजपकडे आहेत, मात्र त्यांना आता शिवसेनेत जाऊन लढा, असा सल्ला भाजप नेतृत्वाने दिला आहे. 

सांगली जिल्ह्यात शिवसेनेची ताकद तशी भाजपच्या तुलनेत नाही. खानापूर मतदार संघात आमदार अनिल बाबर यांचाच काय तो गट. बाकी आबादीआबाद आहे. शिवसेना येथे अनेक वर्षे लढत आली आहे, पण बाबर यांचा अपवाद वगळल्यास सेनेला कधीच येथे खाते उघडता आले नाही, हा इतिहास आहे. भाजपचे गेल्या पाच वर्षांत चित्र शंभर टक्के पालटले आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या गडाला सुरुंग लावत भाजपने इथे मोठी मुसंडी मारली. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला. आयात नेत्यांना पक्षात घेऊन ताकद दिली हे खरे असले तरी आता पक्ष बाळसे धरू लागला होता. या सर्वांना विधानसभेच्या उमेदवारीचा शब्द दिला होता. परवाच मुख्यमंत्र्यांनी जनादेशही मागितला, मात्र युतीच्या तहात भाजप सारे गमावून बसली.

आता विद्यमान आमदार असलेल्या चारच जागा भाजपला मिळाल्या आहेत. तासगाव - कवठेमहांकाळ, पलूस - कडेगाव आणि इस्लामपूर या तीन जागांवर शिवसेनेने आपल्याकडे घेतले असून सेना येत्या दोन दिवसांत येथे उमेदवारांचा शोध घेऊन मग रणांगणात बाण  सोडणार आहे. पलूस - कडेगाव, तासगाव - कवठेमहांकाळ व इस्लामपूर या तीनही मतदार संघांकडे राज्याचे लक्ष होते. इथे हाय व्होल्टेज ड्रामा होईल, असे सांगितले जात होते. 

तासगावात आर. आर. आबांच्या गडाला सुरुंग लागणार का? पलूस - कडेगावला पतंगराव कदम यांचे चिरंजीव आमदार विश्‍वजित कदम यांना धक्का देणे शक्‍य होईल का? इस्लामपूरला जयंत पाटील यांना रोखण्यात यश येईल का, असे अनेक प्रश्‍न या निवडणुकीत समोर आले  होते. अत्यंत ताकदीने येथे तयारी करण्यात आली होती. आबांच्या गडाला आव्हान द्यायला माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी कंबर कसली होती.

जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी विश्‍वजित कदमांविरुद्ध शड्डू ठोकला होता. इस्लामपुरात एकजूट नसली तरी निशिकांत पाटील यांनी जयंतरावांना टक्‍कर देण्याची चांगली तयारी केली होती. कारण त्यांनी थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून येत इतिहास घडविला होता. मुख्यमंत्र्यांनीही इस्लामपूरला त्यांना रसद पुरवून जयंत पाटील यांना मतदारसंघातच अडकविण्यासाठी व्यूहरचना केली होती. मात्र या साऱ्यावर एका झटक्‍यात पाणी पडल्याची भावना बळावली आहे. 

कोल्हापुरात शिवसेनेने आपल्या पदरात आठ उमेदवार पाडून घेतले, सांगलीच्याबाबतीत मात्र चंद्रकांत पाटील किंवा सुभाष देशमुख यांनी लक्ष दिले नाही. जे चार विद्यमान आमदार होते तेवढेच पुरेत अशी आश्‍चर्यकारक भूमिका घेत, भाजप लिमिटेड केली आहे. आता भाजप कार्यकर्त्यांत या जागांच्या बदल्यात कोठे मांडवली झाली इतक्‍या वाईट स्तरावर या चर्चेचा सूर आहे.

पलूस - कडेगावला तर भाजपकडून मैदानात उतरणाऱ्या संग्रामसिंह यांनी अडीच वर्षे संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. ते स्वत: जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असल्याने येथे काँग्रेसच्या विश्‍वजित कदम यांच्यासमोर तगडे आव्हान त्यांचे मानले जात होते. मात्र आता ते शिवसेनेत जाऊन  लढणार काय, बंडखोरी करणार ? असा सवाल आहे.

एकूण भाजपला सांगली जिल्ह्याने यश देऊनही त्यांनी भरीव असे सांगलीसाठी काही केले नाही आणि आता तर येथे आपला पक्षही चार जागांवर लिमिटेड करून टाकला आहे. शिवसेनेशी युती करतानाही सक्षम उमेदवार या  निकषांवर विचार अपेक्षित होता. येथे मात्र तसा विचार न झाल्याने सेनेचा तोटा होणार नाही, पण भाजपला भविष्यात पश्‍चातापाची वेळ येऊ शकते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Sangli District report