Vidhan Sabha 2019 : सत्यजित कदम "ताराराणी'कडून लढणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

कोल्हापूर - माजी खासदार धनंजय महाडिक भाजपमध्ये गेले असले तरी ताराराणी आघाडी विसर्जित करणार नाही. या आघाडीकडूनच कोल्हापूर उत्तरमधून आपण निवडणूक लढविणार असल्याचे नगरसेवक सत्यजित कदम यांनी आज "सकाळ'ला सांगितले. बुधवारी (ता. 2) कार्यकर्त्यांचा मेळावा, तसेच गुरुवारी (ता. 3) अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

कदम गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार होते. त्यांना 48 हजारांहून अधिक मते मिळाली होती. धनंजय महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर महापालिकेतील ताराराणी आघाडी विसर्जित होण्याची चिन्हे होती. या आघाडीचे 19 नगरसेवक आहेत. गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीतही कदम यांनी ताराराणी आघाडी पक्ष म्हणून स्वतंत्र स्वागत कक्ष उभारला होता. 

कदम यांचे आमदार सतेज पाटील यांच्याशी राजकीय वैर आहे. कदम हे महाडिक गटाचे कट्टर समजले जातात. गेल्या निवडणुकीत त्यांना कॉंग्रेसचे तिकीट मिळाले. यावेळी सतेज पाटील हे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे कदम हे कॉंग्रेसकडून लढणार नाहीत, हे स्पष्ट आहे. साडेचार वर्षात आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विरोधातही त्यांनी आघाडी उघडली. वापरात नसलेल्या जागेवर ले-आऊट टाकून गैरव्यवहार कसा झाला, हे त्यांनी उघड केले. क्षीरसागर व कदम यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. 

महापालिकेच्या 2015 च्या निवडणुकीत भाजप, तसेच ताराराणी आघाडी एकत्रित लढली. आघाडीला नाव ताराराणींचे असले तरी महाडिक गटाचे नगरसेवक म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले गेले. निवडणुकीत ताराराणी आघाडीचे 19, तर भाजपचे 13 नगरसेवक विजयी झाले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Satyajeet Kadam fight from Tararani in Kolhapur North