Vidhan Sabha 2019 : कोल्हापुरात शिवसेना उमेदवारांना धास्ती भाजपची

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर - कागलसह शिरोळ, हातकणंगले मतदारसंघांत भाजपकडून झालेली बंडखोरी आणि इतर मतदारसंघांत प्रचारापासून अपवाद सोडला तर लांब असलेले भाजपचे कार्यकर्ते, यामुळे शिवसेना उमेदवारांच्या पोटात गोळा आला आहे. अशा परिस्थितीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात येऊन यात दुरुस्ती करावी, यासाठी त्यांच्याशी अनेक उमेदवारांचा संपर्क सुरू आहे.

कोल्हापूर - कागलसह शिरोळ, हातकणंगले मतदारसंघांत भाजपकडून झालेली बंडखोरी आणि इतर मतदारसंघांत प्रचारापासून अपवाद सोडला तर लांब असलेले भाजपचे कार्यकर्ते, यामुळे शिवसेना उमेदवारांच्या पोटात गोळा आला आहे. अशा परिस्थितीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात येऊन यात दुरुस्ती करावी, यासाठी त्यांच्याशी अनेक उमेदवारांचा संपर्क सुरू आहे.

जिल्ह्यात शिवसेनेचे सहा तर भाजपचे दोन असे युतीचे आठ आमदार आहेत. यावेळी युतीची घोषणा होण्यापूर्वीच सेनेने सहा विद्यमान आमदारांसह कागल व चंदगडच्या उमेदवारांची घोषणा करून ए बी फॉर्मचे वाटपही केले. त्यामुळे विधानसभेची उमेदवारी मिळेल, या आशेवर भाजपत गेलेले समरजितसिंह घाटगे यांनी कागलमधून बंडखोरी केली. शिरोळमध्येही ‘गोकुळ’चे संचालक अनिल यादव, हातकणंगलेत भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अशोक माने यांनी ‘जनसुराज्य’ची उमेदवारी घेत बंडाचे निशाण फडकवले. त्यामुळे या तीन मतदारसंघांत शिवसेनेला भाजपची मदत मिळणार का नाही, याविषयी साशंकता आहे. 

कोल्हापूर उत्तरमध्ये शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांचा राग अजूनही आहे. श्री. क्षीरसागर यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेचे पडसाद अधूनमधून उमटतात, त्याचबरोबर श्री. क्षीरसागर आणि श्री. पाटील यांच्यातही फारसे सख्य नाही. त्यांचा अर्ज भरतानाही भाजपचे पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव सोडून प्रमुख नेते अनुपस्थित राहिले. त्यामुळे श्री. क्षीरसागर यांच्या गोटात अस्वस्थता आहे. या मतदारसंघात भाजपची किमान ४० ते ४५ हजार मते आहेत. 

राधानगरीतही भाजपचे राहुल देसाई यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला आहे. या मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांनीही एकवेळ पालकमंत्री पाटील यांनाच आव्हान देण्याची भाषा केली होती, त्यातूनही भाजपत नाराजी आहे. तरीही श्री. आबिटकर यांनी गुरुवारी पालकमंत्री पाटील यांची भेट घेऊन मदतीची विनंती केली आहे. 

चंदगडमध्ये सेनेचे उमेदवार संग्राम कुपेकर यांचा अर्ज भरताना भाजपच्या तीन तालुक्‍यातील अध्यक्षांनी दांडी मारली आहे. ‘जनसुराज्य’ भाजप आघाडीत नसल्याचे पालकमंत्री पाटील यांनीच जाहीर केल्याने त्यांच्याकडून शाहूवाडीत शिवसेनेचे उमेदवार आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांच्याविरोधात स्वतः माजी मंत्री विनय कोरे यांनीच अर्ज भरला आहे.

करवीरमध्ये भाजपची ताकद प्रबळ नसली तरी त्या ठिकाणीही भाजप प्रचारात सक्रिय नाही. या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय राहावे, यासाठी शिवसेना उमेदवारांचा पालकमंत्री पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. पालकमंत्री पाटील हेच विधानसभेच्या रिंगणात कोथरूड मतदारसंघात अडकून पडले आहेत, त्यामुळे ते जिल्ह्यातील युतीच्या प्रचारासाठी किती वेळ देतात याविषयी साशंकता आहे. एकूणच शिवसेना उमेदवारांच्या पोटात गोळा आला आहे. 

शिवसेनाही प्रचारापासून लांब
कोल्हापुरातील इचलकरंजी व कोल्हापूर दक्षिण हे मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आहेत. इचलकरंजीत आमदार सुरेश हाळवणकर यांच्या मागे शिवसेनेची ताकद दिसते; पण दक्षिणमधील भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्या प्रचारापासून शिवसेनेचे तालुकाप्रमुख व कार्यकर्ते अजूनही लांबच आहेत. ‘आमचं ठरलंय’ हा लोकसभा निवडणुकीचा फॉर्म्युला दक्षिणमध्ये दिसत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Shivsena candidates have fear of BJP