कोल्हापूर जिल्ह्यात धक्कादायक निकालाची शक्‍यता; शिवसेना बॅकफूटवर ?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 October 2019

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्हीही मतदारसंघांवर शिवसेनेने कब्जा मिळवला; पण हाच ‘ट्रेंड’ विधानसभेला राहील, अशी शक्‍यता दिसत नाही. युतीत आठ जागा सेनेला आणि दोन जागा भाजपला आहेत. यापैकी दोन-तीन जागांवर युतीचा विजय मानला जातो.

कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीच्या निकालात जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांत धक्कादायक निकाल लागण्याची शक्‍यता आहे. मतदारसंघनिहाय मतदानानंतर घेतलेल्या आढाव्यात भारतीय जनता पक्ष बंडखोरांमुळे शिवसेना ‘बॅकफूटवर’ जाईल, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ‘अच्छे दिन’ येतील, असा अंदाज आहे. भाजपसमोर मात्र आहे त्या दोन जागा राखण्याचे आव्हान असेल. 

जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांत आज चुरशीने मतदान झाले. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेने सहा, तर भाजपने दोन, अशा आठ जागा जिंकल्या होत्या. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात एकही जागा काँग्रेसला जिंकता आली नव्हती, तर राष्ट्रवादीने दोन जागा जिंकून लाज राखली होती. त्यावेळी शिवसेना, भाजपसह दोन्ही काँग्रेस स्वतंत्र लढले होते. यावेळी मात्र आघाडी आणि युतीही झाली असली तरी पाच मतदारसंघांतील भाजप बंडखोरांमुळे सेनेच्याच किमान चार जागा धोक्‍यात आहेत. गेल्यावेळी सेनेने जिंकलेल्या पाचपैकी एका मतदारसंघात अपक्ष, तर एका मतदारसंघात ‘जनसुराज्य’ची हवा आहे; तर उर्वरित तीन मतदारसंघ काँग्रेसकडे जातील.  

मतदान संपल्यानंतर मतदारसंघनिहाय आढावा घेतला असता युतीच्या उमेदवारांसमोर काँग्रेस-राष्ट्रवादीने तगडे आव्हान उभे केल्याचे दिसून आले आहे. गेल्या निवडणुकीत एकही जागा न जिंकलेल्या काँग्रेसला किमान तीन ठिकाणी विजयाची खात्री आहे, तर राष्ट्रवादीही तीन जागा जिंकेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. या सहा जागांपैकी पाच ठिकाणचे सेनेचे, तर एका ठिकाणी भाजपचे उमेदवार अडचणीत आले आहेत.

राष्ट्रवादीच्या एका बंडखोरामुळे आघाडीने मित्रपक्षाला सोडलेली जागा धोक्‍यात आल्याचे बोलले जाते. एका मतदारसंघात भाजपसमोर अपक्ष उमेदवाराने चांगली लढत दिल्याने ही जागा भाजपला राखणे आव्हान असेल. भाजपची दुसरी जागाही काँग्रेस, राष्ट्रवादीची एकत्रित ताकद आणि त्यांना मिळालेला शिवसेनेचा छुपा पाठिंबा, यामुळे अडचणीत आली आहे.

शिवसेनेच्या आणखी एका जागेवर ‘जनसुराज्य’चे तगडे आव्हान उभे आहे. या मतदारसंघात काँग्रेसला उमेदवारच मिळाला नाही, तर राष्ट्रवादीची छुपी मदत मात्र सेनेच्या मागे आहे. त्याचवेळी काँग्रेसची ताकद ‘जनसुराज्य’सोबत दिसत आहे. त्यातून फटका अर्थातच सेनेच्या उमेदवाराला बसण्याची शक्‍यता आहे. 

राष्ट्रवादीने यावेळीही तीन जागा लढवल्या. यापैकी किमान दोन जागांवर त्यांना विजय अपेक्षित आहे. एका जागेवरील राष्ट्रवादीच्या दिग्गज उमेदवाराला विरोधी उमेदवारांची मतविभागणी किती होईल, यावरच विजयापर्यंत पोहचणे शक्‍य आहे. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्हीही मतदारसंघांवर शिवसेनेने कब्जा मिळवला; पण हाच ‘ट्रेंड’ विधानसभेला राहील, अशी शक्‍यता दिसत नाही. युतीत आठ जागा सेनेला आणि दोन जागा भाजपला आहेत. यापैकी दोन-तीन जागांवर युतीचा विजय मानला जातो. त्यामुळे या निवडणुकीत आघाडीपेक्षा युतीच्यादृष्टीनेच धक्कादायक निकाल लागेल, असा अंदाज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 shocking results Possibility in Kolhapur district Shiv sena on Bacfoot