Vidhan Sabha 2019 : बालेकिल्ला राखण्याचे ‘राष्ट्रवादी’समोर आव्हान

Satara-District
Satara-District

विधानसभा 2019 : सातारा जिल्ह्यात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच, काँग्रेसचे दोन आणि शिवसेनेचा एक आमदार निवडून आला. आता भाजपने जिल्ह्यावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व मोडीत काढण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी महसूलमंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आणि ‘राष्ट्रवादी’तील दिग्गजांना भाजपमध्ये घेण्याचा सपाटा लावल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अबाधित राहणार का, असा प्रश्‍न आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच जिल्ह्यातील राजकारणात वेगवान हालचाली होत आहेत. साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना भाजपमध्ये घेऊन भाजपने ‘राष्ट्रवादी’ला धक्का दिला आहे. त्यांच्यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हेही भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांनी भाजपकडे वाई, फलटण आणि कुलाबा मतदारसंघांची मागणी केली आहे. यातून जिल्ह्यांतील तीन मतदारसंघांवर आपले प्रभुत्व दाखवत सभापतिपद कायम राखण्याची खेळी आहे. शिवसेना आणि भाजप जिल्ह्यात आयात उमेदवारांच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’चा बालेकिल्ला तोडण्याच्या प्रयत्नांत आहेत. जिल्ह्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असली, तरी काँग्रेसची ताकद घटू लागली आहे. सध्या काँग्रेसची अवस्था सेनापती नसलेल्या फौजेप्रमाणे आहे.

सातारा जावळी मतदारसंघात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यामुळे येथील इच्छुक असलेले भाजपचे नेते दीपक पवार यांचा पत्ता कट झाला आहे. त्यांना पश्‍चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्षपद देऊन राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला आहे. खासदार उदयनराजे भोसले कोणाचे नाव सुचविणार यावर ‘राष्ट्रवादी’चा येथील उमेदवार ठरणार आहे. 

वाई- महाबळेश्‍वर- खंडाळा मतदारसंघात यावेळेस काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार मदन भोसले इच्छुक आहेत. ‘राष्ट्रवादी’कडून आमदार मकरंद पाटील रिंगणात असणार आहेत. पण, आता विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनीही येथून लढण्याची इच्छा व्यक्त केल्याने मकरंद पाटलांची अडचण होणार आहे. पण भाजपचा उमेदवार कोण, मदन भोसले की रामराजे, यावर लढतीचे चित्र ठरेल.

कऱ्हाड दक्षिणेत यावेळेस काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजपचे नेते अतुल भोसले यांसह विलासराव पाटील उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह पाटील रिंगणात असतील. येथे आमदार बाळासाहेब पाटील आणि उंडाळकर गटाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल. 

कोरेगाव मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला असला तरी येथून भाजपच्या महेश शिंदे यांनी तयारी चालवली आहे. ‘राष्ट्रवादी’कडून आमदार शशिकांत शिंदे यांना ऐनवेळी सातारा जावळीतून पाठविल्यास कोरेगावात ‘राष्ट्रवादी’ला उमेदवार शोधावा लागेल. येथून रोहित पवार किंवा अजित पवार यांच्या नावाची चर्चा आहे.

फलटण मतदारसंघ राखीव असून, येथे ‘राष्ट्रवादी’चे आमदार दीपक चव्हाण तिसऱ्यांदा इच्छुक असले, तरी भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर कोणाला उमेदवारी देणार, यावर सर्व गणिते अवलंबून आहेत. शिवसेनेने दिगंबर आगवणे यांच्यासाठी गळ टाकला आहे. रामराजे नाईक-निंबाळकर यांची भूमिकाही महत्त्वाची आहे.

माण मतदारसंघात सर्वपक्षीय आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे हटावचा नारा दिला आहे; पण या आघाडीपासून दूर राहात आमदार गोरेंचे बंधू शेखर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. ते येथून निवडणूक लढणार आहेत. आता युतीच्या वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने सर्वपक्षीयांच्या आघाडीचा उमेदवार कोण हेही महत्त्वाचे आहे. 

पाटणला पारंपरिक विरोधकांत लढत होते. यावेळेसही शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई आणि ‘राष्ट्रवादी’चे सत्यजितसिंह पाटणकर यांच्यातच लढत होणार आहे. देसाई यांनी सत्तेच्या माध्यमातून केलेली कामे व ठेवलेला संपर्क पाहता त्यांचे पारडे जड आहे. त्यामुळे येथील जनता कोणाच्या पारड्यात यश टाकणार याची उत्सुकता आहे. 

एकूणच ‘राष्ट्रवादी’च्या बालेकिल्ल्यात यावेळेस चार आमदार निवडून आणण्याचा विडा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उचलला आहे, त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साथ आहे. पक्षाची ताकद वाढावी, यासाठी युतीच्या माध्यमातून जिल्ह्यात तब्बल पाच राज्यमंत्रिपदे दिली आहेत. त्याच्या जोरावर युती साताऱ्याचा बालेकिल्ला तोडण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com